बॅ.बाळासाहेब खर्डेकर – वेंगुर्ल्याच्या शैक्षणिक विकासाचे अध्वर्यू

भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर गेली अनेक वर्षे वेंगुर्ल्याच्या विकासासाठी कोणत्याही राजकीय पुढा-यांची नजर पडली नव्हती असेच म्हणावे लागेल. सन १९५२ मध्ये नगर वाचनालयाच्या एका कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बॅ. खर्डेकर वेंगुर्ला येथे येतात. वेंगुर्ल्याच्या परिसराची त्यांना भुरळ पडते. निसर्ग संपन्न परिसर, स्वच्छ विस्तीर्ण सागर किनारा, गोड, निःस्वार्थी निर्मळ मनाची कोकणी माणसे, नारळा-पोफळीच्या बागा, आंब्याचा गोड स्वाद या सर्वांची भूरळ त्यांच्या मनामध्ये घर करुन राहते. इथेच त्यांच्या मनामध्ये वेंगुर्ल्यासाठी शैक्षणिक द्वार खुले करण्याचे स्वप्न घर करुन बसले असावे. तिथूनच त्यांच्या प्रयत्नाला सुरुवात होते. पण हे काम सामान्यांसाठी किती कठीण होते त्याची कल्पनाच केलेली बरी.

     मध्ये खूप काही गोष्टी घडून जातात. १९६१ उजाडेपर्यंत वेंगुर्ल्यामध्ये होणारे महाविद्यालय अडचणीच्या गर्दीत सापडते. महाविद्यालय वेंगुर्ल्यामध्ये की सावंतवाडी मध्ये अशा प्रकारचा एक घोळ निर्माण होतो. वेंगुर्ल्यातील महाविद्यालय होणार नाही हे जवळजवळ निश्चित झाले असताना सुदैवाने बॅ.बाळासाहेब खर्डेकर यांच्यापर्यंत ही गोष्ट येते. बाळासाहेब तातडीने आपल्या सर्व अनुभवांनिशी आणि शक्तीनिशी याकामी राजदरबारी प्रयत्न करतात व वेंगुर्ल्याला आर्ट्स आणि कॉमर्स कॉलेजच्या परवानगीचे पत्र मिळवतात. त्याच बरोबर सावंतवाडीमध्येही आर्ट्स आणि सायन्स कॉलेजला परवानगी मिळते. खरेतर ही एक विलक्षण घटना होती.

     येथेच बॅ.बाळासाहेब खर्डेकर हे वेंगुर्ल्याच्या शैक्षणिक विकासाचे मूळ आधार ठरतात. इतिहासामध्ये याची नोंद सुवर्णाक्षराने होईल. महाविद्यालयासाठी हवी असणारी विस्तीर्ण जागा आणि त्याचा प्रश्न उभा राहिला नसेल असे कसे म्हणता येईल? योगायोगाने मुंबईतील परंतु मूळचे वेंगुर्ल्यातील दानशूर व्यक्तिमत्व असलेले श्री. दाभोळकर यांच्या आलिशान बंगल्याचे रुपांतर वेंगुर्ल्याचे बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयअसे होते ही खूप भाग्याची घटना होती. वेंगुर्ल्याची प्रगती शैक्षणिक विकासाशी जोडलेली होती. उच्च शिक्षणाच्या आधारावर पुढील पिढी घडणार होती. बॅ. बाळासाहेब नसते तर विविधतेने नटलेल्या या प्रदेशामध्ये कधीकाळी उच्च शिक्षणाची सोय झाली असती हे एक कोडेच होते. तरीही वेंगुर्ल्यामध्ये महाविद्यालय होणे खूप अडचणीचे होते. परंतु, बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांच्या प्रयत्नांमुळेच वेंगुर्ल्यात महाविद्यालय सुरु होऊ शकले असे म्हणता येईल.

     तसे पाहिले तर बॅ. खर्डेकर हे अतिशय खानदानी कुटुंबात जन्माला आले होते. त्यांनी इंग्लंड, इटली, स्वित्झर्लंड, फ्रान्स, स्पेन या ठिकाणी आपले जीवन काहीकाळ व्यतीत केले होते. १९३२ साली ते विलायतेला गेले. केंब्रिज विद्यापीठा -मधून बॅरिस्टरपदवी घेतल्यावर १९३७ साली त्यांनी भारतामध्ये वास्तव्य करण्याच्या आणि शैक्षणिक कार्य करण्याच्या उद्देशाने येण्याचे निश्चित केले. १९३७ साली साईक्स लॉ कॉलेजचे अधिव्याख्याता तर राजाराम कॉलेजचे प्राचार्य म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. वेंगुर्ल्यात येण्यापूर्वी कोल्हापुरातील गोपाळ कृष्ण गोखले कॉलेजचे प्राचार्य आणि १९६१ मध्ये वेंगुर्ल्यात कॉलेजची स्थापना झाल्यावर त्यांनी प्राचार्य पदाची जबाबदारी स्वीकारली. त्यांचा व्यासंग खूप मोठा असल्याने आणि राजकीय अभ्यास असल्याने १९५२ साली स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत त्यांची कोल्हापूरमधून लोकसभेवर निवड झाली. ते लोकसभेवर खूप मोठ्या मतांनी निवडून गेले.

       बाळासाहेब, नेहरु आणि गांधींना मानत असत. पण गोपाळकृष्ण गोखले, न्या. रानडे यांच्याकडे त्यांचा ओढा होता. रविद्रनाथ टागोर त्यांना गुरु समान होते. (म्हणून टागोरांची एकमेव प्रतिमा त्यांच्या दिवाण खान्यात असलेली दिसून येते) भारतीय राजकीय मंडळींनी आणि छत्रपती शाहू नंतरच्या पिढीने त्यांच्यामधील बुद्धीचा आणि अलौकिक गुणांचा आदर केला नसल्याचे दुःख त्यांना सलत असल्याचे दिसून येते.

         स्वातंत्र्यानंतर कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनापूर्व समितीचे ते सक्रिय सभासद असताना विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरू पदासाठी त्यांचा विचार केला गेला नव्हता याचे शल्य त्यांना होते. बाळासाहेबांनी आयुष्यभर कधीही तडजोड स्वीकारली नाही. राजकीय जीवनात, राजकारणात असलेल्या तडजोडी, कुरघोड्या त्यांच्या सात्विक, प्रेमळ, निःस्वार्थ मनाला कधीच मानवणा-या नव्हत्या.

     बाळासाहेबांचा टेनिस, हॉकी आणि क्रिकेट या खेळांमध्ये त्यांचा हातखंडा होता. त्यांनी ठरवले असते तर ते परदेशामधील कुठल्याही देशांमध्ये जाऊन ऐषारामी जीवन जगू शकले असते. परंतु, वेंगुर्ल्याच्या शैक्षणिक विकासामध्ये त्यांचे ऐतिहासिक योगदान लाभायचे होते म्हणून असेल, त्यांनी शेवटी मातृभूमीमध्ये येण्याचे ठरवले. बाळासाहेब शेवट पर्यंत अविवाहित राहिले. १ ऑगस्ट १९०३ ते २६ डिसेंबर १९६३ असे अवघे ६० वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले.                      मधुकर मातोंडकर, सावंतवाडी.

(संकल्पना- मिंगेल डिसोझा  सहाय्य-संजय परब )

 

Leave a Reply

Close Menu