संघर्ष कळणेवासीयांचा

मानसिंग राजाराम देसाई. वय वर्षे अंदाजे ६० च्या आसपास. कळणे खनिज विरोधी लढ्यात १०३ दिवस तुरुंगवास भोगणारे सामान्य शेतकरी. गुन्हा एवढाच कि  स्वतःच्या शाश्वत व पारंपरिक उपजीविकेचे साधन वाचविण्यासाठी खनिज प्रकल्पाला केलेला विरोध. मुजोर खाण कंपनीने सर्वच राजकीय पक्षांना आपल्या दावणीला बांधून घेतले. परंतु स्वतःच्या रोजीरोटीचा साधन हिसकावून घेतलेल्या कंपनीला मानसिंग अजूनही विकले गेले नाही . गेली ११ वर्षे त्यांचा संघर्ष तत्वनिष्ठेने सुरुच आहे.

     श्री.देसाई हे कळणे-धवडकी येथील रहिवाशी. एक सामान्य अल्पभूधारक शेतकरी. आता कळणे खनिज प्रकल्प आहे त्या डोंगरात त्यांच्या कुटुंबाची ६ एकर वडिलोपार्जित जमीन आहे. तसेच प्रकल्पाच्या खालच्या बाजूला शेतीची जमीन आहे. या जमिनीत त्यांची गावठी काजूची बाग असून अलिकडेच त्यांनी काजू कलमांची लागवड केली होती. तसेच काही भागात ते पावसाळी भातशेती, नाचणी आदी पिके घेतायत. २००८ मध्ये जेव्हा आपल्या जमिनीच्या भागात खाण प्रकल्प येतोय, याची कुणकुण लागली तेव्हा ते हवालदिल झाले. नंतर गावाने प्रकल्प विरोधात लढा उभा केला. तेव्हा स्वतःचे जगण्याचे साधन असलेल्या जमिनीच्या संरक्षणासाठी ते पुढाकाराने लढ्यात सामील झाले . ग्रामस्थांच्या तीव्र संघर्षानंतर १९ मार्च २००९ च्या पहाटे कंपनीने सुरक्षा रक्षक उभे करून जमिनीत मशिनरी घुसवल्या. या यंत्रांच्या आवाजाने गाव जागे झाले आणि ग्रामस्थ रस्त्यावर आले. उद्रेक झाला तेव्हा एक सुरक्षा रक्षक जीव वाचविण्यासाठी पळत होता. मोटारीत चढत असताना पडून जखमी झाला. माणुसकीच्या धर्माने आंदोलकांनीच त्याला आरोग्य केंद्रात नेले. नंतर बातमी येऊन धडकली की, त्याचा मृत्यू झाला. कंपनीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तब्बल १६ आंदोलकांवर खुनाचा गुन्हा दाखल केला. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला. सत्ताधा-यांचे राजकीय विरोधक ग्रामस्थांना पाठिंबा द्यायला आले. पर्यावरणवादी कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था, पत्रकार, लेखक, डॉक्टर, वकील असे सर्वच लोक आंदोलनाशी जोडले गेले . पण अधिकारी व सत्ताधारी मात्र त्यांच्यावर भारी पडले. प्रत्यक्ष उत्खनन सुरु झाले. सुरक्षा रक्षकाच्या मृत्यूशी काडीचाही संबंध नसलेले १६ जण तब्बल ३ महिने तुरुंगात राहिले. त्यांच्या सुटकेसाठी बायका मुलांनी, ग्रामस्थांनी मंदिरात ठिय्या मांडला. पोलीस बळाच्या वापरामुळे ग्रामस्थांचा धीर खचला. आंदोलनाची धग ग्रामस्थांच्या मनात कायम राहिली. पण रोजची रोजीरोटी शोधण्यात तेही व्यस्त झाले. पाठिंब्यासाठी आलेले अनेक राजकीय पुढारी कार्यकर्ते मागे फिरले. सोईनुसार भूमिका बदलून अनेकांनी त्याच प्रकल्पात रोजगारही शोधला. पर्यावरण वाचविण्यासाठी आलेले कार्यकर्तेही दुस-या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी निघून गेले.

       सर्वच बदलून गेले, पण मानी मानसिंग बदलले नाहीत. कंपनीने त्यांच्या जमिनीत अतिक्रमण केले . उत्खनन करुन खनिज काढले. खालच्या जमिनीत मातीचा भराव केला आणि कालच्या दुर्घटनेत तर त्यांची उरली -सुरली जमीनही मातीच्या भरावाने नापीक झाली. सर्व उध्वस्त होत गेले मात्र त्यांची नैतिक भूमिका आजही बदलली नाही.

     कंपनीच्या अतिक्रमणाविरोधात प्रशासनाकडे अर्ज-विनंत्या ते करत राहिले. सुरवातीला सोबत असलेल्या बाधितांनी नंतर साथ सोडली. रोजचा खर्चही परवडत नसताना जमिनीच्या हक्कासाठी, न्यायासाठी आजही ते लढत आहेत. अनेकदा तडजोडीची आमंत्रणे त्यांना आली, पण माऊलीच्या मंदिरात शप्पथ घेतलीय जीव गेला तरी चालेल न्यायासाठी लढेन, पण वाकणार नाहीकालच्या दुर्घटनेने मात्र त्यांच्या उरल्या सुरल्या अस्तित्वालाच हादरा बसला. सर्व शेती पाण्यात वाहून गेली. जमीन नापीक झाली. पण न्यायाची आशा त्यांना आजही आहे .

    आंदोलनातील कार्यकर्ते म्हणून फोटोच्या फ्रेममध्ये येणा-या पांढरपेशा आंदोलनात मानसिंग सारखे भूमिनिष्ठ शेतकरी झाकोळून गेले खरे, पण आज ११ वर्षांनीही कोणी कळणे आंदोलन व प्रकल्पाची चर्चा करतो तेव्हा मानसिंग देसाईंच्या नावाशिवाय ती चर्चा अपुरी असते. मग ती मायनिंग विरोधकांची असो वा समर्थकांची.

        २९ जुलै रोजी कळणे खाणीचा बांध फुटून हाहाकार उडाला आणि कळणेत सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या पुढा-यांनी हजेरी लावली. बाधित शेतक-यांना धीर देताना सगळ्यांना कळवळा आला. मात्र आज आठवडा होत आला तरी ना पंचनामे पूर्ण झाले, ना कसली मदत पोहचली, ना कंपनीचा जबाबदार माणूस कळणेत आला. मग एका फोनवर कंपनीचा माणूस कळणेत येईल एवढी धमक राजकीय पुढा-यांमध्ये नाही का? असा संतप्त सवाल कळणेतील बाधित शेतकरी विचारत आहेत.

     दरम्यान, पुढा-यांची आश्वासने केवळ पोकळ बाता ठरु नये. आमचा हक्क हिरावला जात आहे, या हक्कासाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारावाच लागेल, असा इशाराही आता शेतक-यांनी दिला आहे.

     पाण्याच्या लोंढ्यात जमीन, शेती-बागायतीची कोट्यावधींची  हानी झाली. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे केवळ सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र ज्या ग्रामस्थांनी २००९ ला भविष्यातील धोका ओळखून कहाणीला विरोध केला होता, त्याच खाणीने ग्रामस्थांच्या उपजीविकेचा घास गिळून टाकला. यावेळी आलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सत्ताधारीही  कळणेत पोहचले होते. तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना-भाजपने तर रान उठवले होते. पुढे कळणे खाण हा मुद्दा शिवसेना-भाजपच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यातील ठळक मुद्दाही होता. पण आज परिस्थिती अशी आहे कि शिवसेना -भाजपच्या केंद्र व राज्यातील सत्तेच्या सात वर्षाच्या काळात खाण बंद होण्याची चर्चाच जवळपास बंद झाली.

     २९ जुलैला दरडी कोसळून स्थानिकांच्या अस्तित्वावरच संकट कोसळले. या घटनेनंतर लगेच खासदार, आमदार कळणेत पोहचले. यावेळी दोघांनीही स्थानिकांना दिलासा देताना चुकीच्या पद्धतीने खाणीतील उत्खनन झाल्याने दुर्घटना होऊन स्थानिकांचे नुकसान झाले आहे. स्थानिकांना संपूर्ण भरपाई व खाण बंद व्हायलाच हवी. ती भरपाई सुद्धा कंपनीकडून वसूल व्हायला हवी, असा मुद्दा मांडला. त्याचवेळी काँग्रेस वगळता राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, मनसे आदींचे नेते कळणेत पोहचले.

    २००९ मध्ये पालकमंत्री असलेल्या नारायण राणेंनी मायनिंगचे समर्थन केले होते. त्यावेळी कळणेतील जनसुनावणी उधळून लावण्यासाठी त्यांचेच कार्यकर्ते कळणेत आले होते. आज राणे केंद्रात मंत्री आहेत. त्यांच्या पक्षाचे पदाधिकारीही कळणेत येऊन स्थानिकांच्या नुकसानी बद्दल सहानुभूती दाखवून गेले. शिवसेना तर राज्यात सत्तेत आहे, एका फोनवर कंपनीच्या मालकाला कळणेत ते आणू शकतात. पण तसे केले गेले नाही.

    एकूणच पर्यावरणाचा प्रश्न चिंताजनक बनला आहे. अशावेळी सामाजिक व पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील बनलेल्या कळणे प्रकरणाबद्दलची असलेली एवढी अनास्थाभविष्यातील सामाजिक असंतोषाला जन्म देईल, असा इशारा स्थानिकांमधून दिला जात आहे.                   पगार गांवकर, दोडामार्ग  ९४२०२०९२६५

 

Leave a Reply

Close Menu