शाळा बंद, कोरोनामुळे सर्वत्र अनिश्चिततेचे सावट, त्यात दहावी-बारावी परीक्षा नक्की होणार अशा आशयाच्या बातम्या साधारण आठवड्याने त्यावेळी पेपरात वाचायला मिळत होत्या. कालांतराने ठराविक अभ्यासक्रमावर परीक्षा घेतली जाणार असे वारंवार सांगितले गेले. पण प्रत्यक्षात परिस्थितीने दोन्ही परीक्षा काही झाल्या नाहीत. दरम्यान, दहावी-बारावीतील ही मुले मात्र, अक्षरशः अनेक अपेक्षांच्या ओझ्याखाली दबली गेली. त्यांना आज आवाज नसेल पण त्यांची मानसिक अवस्था ही खरंच आपण विचारात घेतली पाहिजे. परीक्षा होणार म्हणून अभ्यास करताना एकीकडे कोरोनामुळे कित्येक नातलगांच्या नोक-या गेलेल्या त्यांनी अनुभवल्या. जे आपण उद्दिष्ट्य ठरविले आहे त्यात पर्याय जरी चार ठेवले तरी कोरोनाची परिस्थिती आणि त्यातून रोजगार मिळण्याची संधी यातील अंतर मात्र, कोसो दूर असण्याची मानसिकता या मुलांमध्ये निर्माण झाली आहे. 

     मार्क चांगले मिळायला हवेत म्हणून वर्षभर अभ्यास करुनही जेव्हा परीक्षा न देताच रिझल्ट लागणार आहे हे समजताच कितीतरी मुले नैराशाच्या खाईत लोटली. कशाच्या आधारावर मार्क दिले जातील हे समजेपर्यंत जेव्हा रिझल्ट लागला आणि सिधुदुर्गचा १०० टक्के निकाल जाहीर झाला, तेव्हा कोरोनामुळे मिळालेले मार्क म्हणून या मार्कांना शिक्का बसला. खरंतर यामध्ये या मुलांचा काहीच दोष नाही. जेथे सर्वच जग थांबले आहे तिथे शिक्षण व्यवस्था अपवाद कशी ठरणार

       जिल्ह्यातील ग्रामविकास आणि शैक्षणिक चळवळीत आपले मोठे योगदान देणारी भगिरथ ग्रामविकास संस्था ही आम्ही बॅचलरया उपक्रमात सन २०१२ साली सहभागी झाली. परिस्थिती गंभीर, पण निर्धार खंबीरअसणा-या दहावी-बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक मदत पोहचली पाहिजे यासाठी ही चळवळ उभी राहिली. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमुळे मार्गक्रमण करीत यश मिळविणा-या विद्यार्थ्यांकडे समाजाचे म्हणावे तसे लक्ष जात नाही, अशा विद्यार्थ्यांना समाजापुढे आणत त्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून दिशा देण्याचे काम ही चळवळ करते. यामध्ये तरुण भारत, भगिरथ ग्रामविकास, सेवासहयोग आणि आम्ही बॅचलर हा व्हॉटस्अॅप ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने गेली १५ वर्षे सुरु असणारा हा जिल्ह्यातील एकमेव शैक्षणिक उपक्रम आहे.     

     कोकणात भगिरथ ग्रामविकास संस्थेने कायमच तरुणाईला दिशादर्शकाचे काम उत्तमप्रकारे केले आहे. कौशल्याभिमुख शिक्षण घेण्याचा आग्रह आणि त्यातून आपल्या गावातच रोजागाराभिमुख व्यवसाय करण्याची संधी त्यांनी अनेकांना दिली आहे. जी मुले पुढे काय करायचे या संभ्रमावस्थेत आहेत अशांनी जरुर तेव्हा वरील संस्थांची किवा सेवाभावी व्यक्तींची मदत किवा मार्गदर्शन घेण्यासाठी नक्की पुढे यावे. 

     सद्यस्थितीत १ वर्षापेक्षा अधिक काळापासून शिक्षणाचे नुकसानच झाले आहे. आता शाळा सुरु न करणे हे धोक्याचे असल्याबाबत संसदीय समितीने इशाराच दिलेला आहे. गणित, विज्ञान आणि भाषा या मुलभूत ज्ञानाचा पाया ज्या प्राथमिक वयात व्हायला हवा त्यालाही ही मुले मुकली आहेत. शाळा बंद राहिल्याने मुलांचे जीवन शिक्षण, आहार, मानसिक आरोग्य आणि चौफेर विकासालाच फटका बसला आहे. सध्याचे शिक्षणाचे डिजिटल स्वरुप पहाता ग्रामीण भागात पालक, मुले आणि शिक्षकही ऑनलाईन शिक्षणात बेजार झाले आहेत. रेंजची कमतरता, शिक्षक प्रत्यक्ष उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची उडालेली तारांबळ, अभ्यासाची तुटलेली लिक तसेच पालक ब-याचदा अन्य मुलांची तुलना आपल्या मुलांबरोबर करीत असल्याचे चित्र काही ठिकाणी दिसून आल्याने अक्षरशः मुलांमधील अभ्यासाची गोडीच नष्टझाली आहे. त्यातून मुले आणि पालक यांच्यात खटके उडत आहेत. एकूणच सामाजिक, कौटुंबिक अस्थिरता निर्माण झाली आहे. भावनिक, सामाजिक गरज म्हणून तरी आता शिक्षणाची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यासाठी गरज आहे ती ठोस अंमलबजावणीची आणि निर्धोक परिस्थितीची!

 

Leave a Reply

Close Menu