हात

देणा-याने देत जावे, घेणा-याने घेत जावे

घेता घेता एकदिवस देणा-याचे हात घ्यावे

      श्रेष्ठ-ज्येष्ठ ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य विंदा करंदीकर यांच्या देणा-याने देत जावे…या कवितेतील ह्या ओळी अतिशय गहन आणि सत्य सांगून जातात.

      ‘हातहा ख-या अर्थाने मनुष्याच्या प्रगतीचा खूप मोठा वाटेकरी आहे. प्रगतीचा खूप मोठा पल्ला त्याला हातामुळे पादाक्रांत करता आला. परमेश्वराने मानवाला हातांबरोबर बुद्धी देखील दिल्यामुळे तो आपल्या दोन हातांचा दुरुपयोग करु लागला. त्यामुळे कधीकधी तो दुस-यांना चांगला हात दाखवू लागला. हात दाखविणेआणि हात मारणेयात पारंगत असलेला मनुष्य स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कु-हाड मारुन घेतो आणि आयुष्यभराचे नुकसान करतो. असे हे हात कल्पनेपेक्षाही किती सदुपयोगी आहेत ते पहा–

      दुस-याच्या अडीअडचणीला, त्यांच्या आपत्ती काळात आपण धावून जातो आणि त्यांना मदतीचा, सहकार्याचा हात देतो, सत्कर्म करणा-यांना किवा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांच्या पाठीवरुन आपण प्रोत्साहनाचा हात फिरवतो त्यावेळी समोरच्या त्या व्यक्तीला कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं.

      आई-वडिलांची, गुरुजनांची सेवा करताना देखील आपले हात धन्य झाल्याची जाणीव त्या हाताला स्पर्शून जाते. मुलांच्या पाठीवरुन मायेचा, ममतेचा, शाबासकीचा हात ज्यावेळी आपण फिरवतो त्यावेळेस मुलांच्या अंगावर निश्चित रोमांच उभे राहतात. पूर्वी शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना छडीचा मार देत असत, त्यावेळी शिक्षकांकडून आपल्या हातावर छडीचा मार घेतानासुद्धा त्या शिक्षकांच्या डोळ्यात आपल्याविषयीचा जिव्हाळा पाहून आपले हात नकळत जोडले जायचे.

      एखाद्या थोर व्यक्तीला आपण हात जोडून नमस्कार करतो किवा साष्टांग नमस्कार घालतो, त्यावेळी समोरच्या व्यक्तीच्या हृदयात आपल्याविषयी प्रमाची उर्मी तयार होते. हात जोडून नमस्कार करणे हा आपल्या भारतीय संस्कृतीला लाभलेला अमोल ठेवा आहे.    

      एवढं जरी खरं असलं तरी आपले दोन्ही हात डावा आणि उजवा याविषयी आपण किती सावधगिरी बाळगायला हवी, याबद्दल थोरामोठ्यांनी काही नियम घालून दिले आहेत.

      तुमच्या उजव्या हातानं केलेलं सत्कृत्य डाव्या हाताला कळू देऊ नका किवा सत्कर्म करताना डावा-उजवा असा भेदभाव करु नका. सत्पुरुषांचे आणि साधुसंतांचे हात सामान्य माणसांपेक्षा लांब असतात असे म्हणतात. एखाद्याच्या हातात दैवी शक्ती तर एखाद्याच्या परीसस्पर्श असतो. असे सुलक्षणी हात एखाद्याचे भाग्य उजळून टाकतात.

      मनुष्याच्या हातात रेषा असतात, त्याच रेषांना आपण भाग्यरेषा म्हणतो. असे म्हटले जाते की , परमेश्वराने आजपर्यंत एका हाताच्या रेषेसारखा दुसरा कुणाचाच तसाच हात बनविलेला नाही म्हणून गुन्हेगारांना त्यांच्या हाताच्या ठशांच्या रेषेवरुन पकडले जाते.

        हातांचा उपयोग दुस-यांना आशीर्वाद देण्यासाठी केला जातो. परंतु काही अवलक्षणी हात दुस-याला साथ देण्याचे पाप करीत असतात तर काही हात दुस-यांचे गळे घोटण्याचे अघोरी कृत्य करीत असतात.

      एखाद्याच्या हातात एवढी ताकद असते की, तो आपल्या हाताच्या बळावर अनेकांचे संसार उभे करतो तर एखादा कपटकारस्थानी मनुष्य लोकविरोधी करारांवर सही करुन आपल्या हातानं अनेकांचे संसार उद्ध्वस्त करतो. म्हणूनच मनुष्याच्या शरीराचा अवयव हातहा त्याच्या शरीर सौंदर्याचा दागिना मानला जातो.

      एखाद्या व्यक्तीच्या हातात जादू असते तर एखाद्याच्या हातात कला असते. काहींचे हात एवढे दुर्गुणी असतात की, त्यांना फक्त दुस-याकडून घ्यायचेच ठाऊक असते. दुस-याला द्यायचे त्यांच्या गावीही नसते. म्हणूनच या हातांपासून आपण काय द्यावे आणि काय घ्यावे आणि काय देऊ नये याचा सारासार विचार करावा म्हणजे देणा-याचे हात हजार… दुबळी माझी झोळीअसं म्हणण्याची पाळी आपल्यावर येणार नाही.        

   कर्णाने आपल्या हातांनी याचकाला भरभरुन दिले. एकदा गावक-यांना सोने दान देण्यासाठी कृष्ण अर्जुनाला सोन्याचा डोंगर देतो. स्वहस्तोन सोने दान करताना अर्जुन दमुन जातो. तोच डोंगर जेव्हा कर्णाला देतो तेव्हा कर्ण आपण तिथे न थांबता गावक-यांनाच सोने नेण्यास सांगतो. यावर अर्जुनाच्या शंकेचे निरसन करताना कृष्ण म्हणतो, अनावधानाने का होईना तू गर्वाने प्रत्येक गावक-याला सोने वाटू लागलास. जणू काही आपण उपकार करतो आहोत अशा थाटात तू दान करत होतास. कर्णाच्या मनात तसं काहीही आलं नाही. त्याने दान केले आणि तो निघूनही गेला. आपले कुणी गुणगान गातं, हे पाहण्यासाठी देखील तो थांबला नाही.

      देणगीच्या बदल्यात लोकांनी आपले कौतुक करावे, धन्यवाद द्यावेत अशी अपेक्षा ठेवणे, ते काही निरपेक्ष दान नसते. कुठल्याही परताव्याची अपेक्षा न ठेवता दान करावे. तुम्ही तुमच्या हाताने कुणाला काय दिलेत? याचे स्मरण ठेवले तर त्या हातांचे सार्थक झाल्याचे हातांना समाधान लाभेल! ज्यावेळी तुमचे हात दुस-यांच्या मदतीला धावून जातील, तो सुदिन ठरेल! आपण त्या दिवसाची वाट पाहूया.                                                         प्रा.नारायण गिरप,८१४९८१७०४९.

 

 

 

Leave a Reply

Close Menu