ही तर उपनगराध्यक्षांची राजकीय स्टंटबाजीः दिलीप गिरप

वेंगुर्ला नगरपरिषद उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ही तर केवळ आगामी नगरपरिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केलेली ही राजकीय स्टंटबाजी आहे. या राजीनाम्यात दिलेले कारणही चुकीचे असल्याचे मत नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी व्यक्त केले आहे.

      शिवसेनेची राज्यात सत्ता असताना आमदार दीपक केसरकर व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत ६ ऑगस्ट रोजी मंत्रालयात बैठक घेऊन या बैठकीत ठरल्याप्रमाणे व शासनाच्या आदेशाचे पालन करुन ही नवीन लिलाव प्रक्रिया राबवण्यात येत आहे. तरी उपनगराध्यक्षा राऊळ यांनी राजीनामा देताना दिलेले कारण हे राजकीय हेतूने प्रेरित होऊन तसेच आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केलेली राजकीय स्टंटबाजी आहे. राऊळ यांनी ज्यावेळी महाराष्ट्रात शिवसेना-भाजप यांची युती तुटली त्याच वेळी राजीनामा देणे अपेक्षित होते. परंतु सत्तेचा संपूर्ण उपभोग घेतल्यानंतर कार्यकाल पूर्ण होण्यासाठी अवघे दोन महिने असताना व्यापा-यांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे हे काम केले आहे. त्यांना जर व्यापायांची खरोखरच काळजी असती तर नगरविकास मंत्र्यांकडून व्यापा-यांना अपेक्षित असलेले आदेश त्या आणू शकल्या असत्या.

      परंतु, हे करु न शकल्याने आपल्याच नाकर्तेपणावर पडदा टाकण्यासाठी त्यांनी राजीनामा नाट्य केले आहे. मात्र, वेंगुर्ल्याची जनता सुज्ञ असून अशा प्रकारच्या राजकीय स्टंटबाजीला थारा देणार नाही याची मला खात्री आहे. त्यामुळे उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ यांचा राजीनामा मी मंजूर करुन पुढील कारवाईसाठी पाठवत असल्याचे नगराध्यक्ष गिरप यांनी सांगितले आहे. यावेळी गटनेते सुहास गवंडळकर, नगरसेवक प्रशांत आपटे आदी उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Close Menu