मिळालेली उर्जा कोकणच्या विकासासाठी बळ देईल-नारायण राणे

जनआशीर्वाद यात्रेला मिळालेला प्रतिसाद पाहून मी थक्क झालो आहे. यासाठी भाजपाकडून मिळालेले सहकार्य अनुभवूनमी भारावुन गेलो आहे. यांचे आभार मानण्यासाठी मराठीतले शब्दच उपलब्ध नाहीत. आता मी नोक-या देणार हा निर्धार तुमचा असायला पाहिजे. तुम्हाला यशस्वी उद्योजक बनविण्यासाठी माझ्या विभागामार्फत मी प्रयत्न करेन. या जन आशीर्वाद यात्रेमुळे मिळालेली ऊर्जा कोकणच्या विकासासाठी अधिक बळ देईल असा विश्वास केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी वेंगुर्ल्यात यात्रेच्या समारोप कार्यक्रमात व्यक्त केला.

      केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर नारायण राणे हे जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने २९ ऑगस्ट रोजी पहिल्यांदाच वेंगुर्ला येथे आले. यावेळी मानसी गार्डन नजिक झालेल्या सभेवेळी उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शन केले.  यावेळी व्यासपीठावर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, माजी राज्यमंत्री रविद्र चव्हाण, माजी आमदार कालिदास कोळंबकर, यात्रा संयोजक प्रमोद जठार, जिल्हापरिषद अध्यक्ष संजना सावंत,नीलमताई राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजप महिला अध्यक्ष संध्या तेरसे, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई आदी उपस्थित होते.

      दरम्यान मला अडविण्याचा विचार शिवसेनेने करू नये. शिवसेना वाढविण्यात माझाही वाटा आहे. आत्ता जी चार टकली दिसतात व सत्तेत मिरवतात त्या पैकी तेव्हा कोणी नव्हते. माझ्या सारख्या अनेक शिवसैकानी त्यावेळी जीवाची पर्वा न करता साहेबांना साथ केली म्हणून आज उध्दव ठाकरे मुख्यमंत्री बनू शकले हे लक्षात असू द्या असा कडक प्रहार राणेंनी केला.

      यावेळी नागरी सत्काराबरोबरच व्यापारी संघटना, सरपंच संघटना, ओबीसी संघटना, मुस्लिम संघटना, मराठा समाज, महिला बचत गट प्रतिनिधी व पदाधिकारी, शेतकरी सन्मान लाभार्थी, देवस्थान कमिटी, ख्रिस्ती समाज बांधव, कुंभार समाज, उज्वला गॅस योजना लाभार्थी, पंतप्रधान आवास योजना लाभार्थी, आत्मनिर्भर योजना (पथ विक्रेते), किरकोळ व्यापारी, गाबीत समाज, गिरणी कामगार प्रतिनिधी, सुवर्णकार प्रतिनिधी व बार असोसिएशन यांच्यावतीने केंद्रीय मंत्री राणे यांचा सत्कार करण्यात आला.

      शिवसेनेला मी धन्यवाद देतो कारण, राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेची उंची ख-या अर्थाने त्यांनी वाढविली. वास्तविक पहाता शिवसेनेने राणेंचे स्वागत करणे गरजेचे होते. परंतु, त्यांनी तसे न करता अपशकुन केला असा आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला.

      नारायण राणे मिळालेल्या संधीचे सोने करतात. आता पुन्हा त्यांना संधी प्राप्त झाली आहे. कोकणातील युवकांना उद्योजक बनविण्याचे राणेंचे असलेले स्वप्न आता पूर्ण होणार आहे, असे माजी राज्यमंत्री रविद्र चव्हाण यांनी सांगितले.

      – नारायण राणे यांचे मार्गदर्शन सुरु असताना पावसाने हजेरी लावल्याने उपस्थितांची तारांबळ उडाली. मात्र, भाजपाचे लगेज छत्र्या उपलब्ध करुन दिल्याने उपस्थितांनी पावसातच पुढील मार्गदर्शन ऐकले.

      –  येथील शिवसेना कार्यालयासमोर शिवसेनेच्या पदाधिका-यांनी व कार्यकर्त्यांनी सायंकाळपासूनच जोरदार घोषणाबाजी केली. सभा संपल्यानंतर राणेंचा ताफा शिवसेना कार्यालयसमोरुन गेला असता घोषणा व्यतिरिक्त अन्य कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

      – जनआशीर्वाद यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वेंगुर्ला शहरात रविवारी सकाळपासूनच कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Leave a Reply

Close Menu