देशातील महाराष्ट्र राज्याला एक वेगळे स्थान आहे. संतांची भूमी म्हणूनही महाराष्ट्राचे वेगळे महत्त्व आहे. हे लक्षात घेता गेल्या दशकभरापासून महाराष्ट्रात राजकीय पटलावरर ज्या गोष्टी घडत आहेत, त्या निश्चितच चिंताजनक आणि चिंतनीय आहेत. गेल्या दोन आठवड¬ात सुरु असलेला राजकीय संघर्ष पाहिल्यानंतर आपणाला परंपरांचा, विचारांचा विसर पडला की काय, अशी भीती वाटायला लागते. केंद्रात भारतीय जनता पक्षाचे भक्कम सरकार आहे. याच सरकारमध्ये कोकणचे सुपूत्र नारायण राणे यांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाली आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तीन पक्षाचे आघाडी शासन आहे. भाजप आणि शिवसेना यांची 25 वर्षांची मैत्री संपुष्टात आली. मुख्यमंत्रीपद हे त्याचे कारण ठरले. सुमारे 39 वर्षे नारायण राणे शिवसेनेतच होते. मुख्यमंत्रीपदावरही त्यांनी काम केले आहे. काही काळ काँग्रेसमध्ये आणि आता भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांना मंत्रीपदाचा संधी मिळाली. खरे तर या संधीचा उपयोग महाराष्ट्राच्या व खास करुन कोकणच्या विकासासाठी करायला हवा, अशी कोकणवासियांची अपेक्षा आहे.

   नारायण राणे यांची कार्यशैली आक्रमक आहे. महाविकास आघाडी आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये अलिकडे तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या विकासावर होत आहे. नारायण राणे व शिवसेना यांच्यात तीव्र स्वरुपाचे मतभेद आहेत. याचाच पुढचा अंक संपूर्ण महाराष्ट्राने गेल्या आठवड¬ात पाहिला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना व खास करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करुन शेलक्या शब्दात टीकास्त्र सोडले. यातील एक प्रकरण वादग्रस्त ठरले. त्यामुळे शिवसेना आणि शिवसैनिक संतप्त होणे स्वाभाविक होते. अपेक्षेप्रमाणे त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले. भाजप, शिवसेना यांच्यात रस्त्यावरचा संघर्ष झाला. तो विकोपाला गेला. केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांच्या अटकेपर्यंत प्रकरण गेले. त्यामुळे हा संघर्ष आणखी टोकाचा बनला. केंद्रीय मंत्र्याला अटक होण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना. भाजपने सुद्धा हे प्रकरण गांभिर्याने घेतले. केंद्रीय नेतृत्त्वानेही या कारवाईबद्दल नाराजी व्यक्त करुन आघाडी शासनावर जोरदार टीका केली. या अटक प्रकरणामुळे आघाडी शासन आणि केंद्र शासन यांच्यातील संबंध पुन्हा ताणले गेले. केंद्रीय मंत्री राणे जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात आले. मुंबई आणि कोकणात त्यांच्या यात्रांच्या कार्यक्रमाचे नियोजन होते. याच यात्रेदरम्यान भाजप, शिवसेना यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आणि कोकणात संगमेश्वर येथे नारायण राणे यांना अटक झाली. राज्यभर भाजप, शिवसेना यांच्यातील संघर्ष रस्त्यावर पहायला मिळाला. एकमेकांच्या कार्यकत्र्यांना मारहाण, कार्यालयावर दगडफेक, पोस्टरबाजी, प्रतिकात्मक पुतळ्यांची जाळपोळ यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले. रस्त्यावरचा संघर्ष थोडासा शांत झाला असला तरी त्याची धग अजून कायम आहे. दुस-या बाजूला न्यायालयातून जामीन घेऊन बाहेर आल्यानंतर जनआशीर्वाद यात्रा जोशात संपन्न झाली. कोकणातील या यात्रेच्या निमित्ताने होणा-या सभा आणि पत्रकार परिषदांतून नारायण राणे यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना यांनाच टार्गेट केले. शिवसेना कार्यकत्र्यांनी घोषणाबाजी केली. राणेंच्या अटकेनंतर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. अनेक चळवळी झाल्या, संप झाले, लढे झाले. परंतु, राजकीय पक्षामध्ये इतक्या टोकाचा संघर्ष कधी दिसला नव्हता. पक्षीय मतभेद असले तरी एकमेकांबद्दल आदरभाव बाळगला जायचा.

       सर्वच राजकीय पक्षांनी याबाबत आत्मपरिक्षण, आत्मचिंतन करायला पाहिजे. वैचारिक मतभेद जरुर असावेत. परंतु, त्याचे रुपांतर द्वेषात होता कामा नये. दुर्दैवाने आज संपूर्ण महाराष्ट्र हे चित्र आणि राजकीय पक्षांच्या भूमिका पाहतो आहे. आपल्या या राज्यात चाललंय तरी काय? असा प्रश्न जनतेला पडला आहे. या घडामोडी एकीकडे घडत असतानाच दुस-या बाजूला याच काळात भाजपचे नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. त्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजप-शिवसेना यांची युती होण्याबाबत वर्षभरात दोनवेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर बोलणी झाल्याचे सांगितले. दोन महिन्यापूर्वी उद्धव ठाकरे यांची दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बंद दाराआड भेट झाली. या पडद्यामागच्या हालचाली पाहिल्यानंतर राजकारणात कधीही काहीही घडू शकेल, अशी चर्चा सुरू झाली आहे. नाहीतरी महाराष्ट्राने आघाडी शासन सत्तेवर येण्यापूर्वी पहाटेच्या शपथविधिचे नाट¬ पाहिले.

     शिवसेना-भाजप यांच्यात हिंदुत्त्वाचा धागा कायम आहे, असे भाष्य शिवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी अलिकडेच केले आहे. रस्त्यावरचा संघर्षाचा घटनाक्रम एकीकडे आणि बंद दाराआड सुरू झालेल्या चर्चा एकीकडे असे चित्र जाणकारांना सुद्धा गोंधळात टाकणारे आहे. महाराष्ट्रातील सामान्य माणूस मात्र या सा-या घडामोडींकडे डोळसपणे पाहतो आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आक्रमक होण्याचे आणखी एक कारण म्हणजे मुंबई महापालिकेसह आगामी राज्यातील निवडणुकांसाठी भाजपची तयारी सुरू आहे, अशी चर्चा जोरात आहे. काही असले तरी घडलेल्या घटना विचारी जनतेला निश्चितच पसंत पडलेल्या नाहीत. महाराष्ट्राच्या परंपरेला, संस्कृतीला धक्का बसेल असे वर्तन कोणत्याही राजकीय पक्षाकडून अपेक्षित नाही.

       केंद्रीय मंत्री राणे यांनी मिळालेल्या संधीचा उपयोग कोकणचे प्रश्न सोडवण्यासाठी करणे आवश्यक आहे. राजकारण किती मर्यादेपर्यंत ताणायचे याची सुद्धा काळजी राजकीय पक्षांनी घेण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून महाराष्ट्र घडला आहे, याचा विसर कोणालाच पडता कामा नये..!

Leave a Reply

Close Menu