आईचे पुण्यस्मरण

           आई, स्मरण तुझ्या ममतेचे होई, तव उपकारा स्मित नाही, कैसी होऊ उतराई गे माझे आई

          “आई’ या जादुई व्यक्तिमत्वासाठी किती सार्थ ओळी आहेत ह्रा. आईबद्दलची कृतज्ञता व आदर व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे श्रावण महिन्यातील अमावास्या अर्थात “मातृदिन.’ आमची आई म्हणजेच “लीला दिगंबर फेणाणी’ आता देहरुपाने आमच्यात नाही. पण बकुळ फुलांसारखा मोहक सुगंध व चंदनासारखा कधीच न विरणारा परिमळ तिने आमच्यात दरवळत ठेवला आहे. कायम सोबत करणारा तिच्यात एक अद्भूत झरा होेता मायेचा,  आपलं व परकं असा भेद न करता सगळ्यांना सामावून घेणारा, आपलसं करुन सगळ्यांवर माया करणारा.

    आमच्या आईचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्रातील “आरोस’ या छोट¬ाशा गावातला. दीड-पावणेदोन वर्षांची असतानाच पित्याचं छत्र हरपलं. तिच्या आईच्या उत्तम संस्कार व शिकवणीमुळे तिने कधीच तिची पातळी सोडली नाही. परिस्थितीमुळे तिला शिकता आले नाही तरी तिने व्यवहार मात्र, उत्तम केला. अनेक माणसे जोडली. कधी बाजारात जाणे झाले तर बरेच दुकानदार, भाजी-फळ विक्रेते आजी…आजी..करुन भेटून जात असत.

    लग्नापूर्वी मोठ¬ा बहिणीच्या यजमानांच्या व्यापार-दुकानात तिने सक्रीय चोख व्यवहार केला. लग्नानंतरही बाबांच्या मर्यादित मिळकतीत टुकीने संसार केला. बचतीचं हे गणित ती कुठून शिकली माहित नाही. आईने केलेल्या या बचतीमुळे ब-याच वेळा तिने आपल्या कुटुंबाला संकटकाळी तारुन नेलंय.

   लहानपणी अकाली पडलेल्या जबाबदारी व परिस्थितीमुळे सगळी कामे करायची सवय अंगी बाणवून घ्यावी लागली. तशातच मावशीच्या घरी आश्रय घ्यावा लागल्याने सगळी संसारिक कामे व अंगी जन्मत:च असलेल्या चविष्ट जेवण बनविण्याच्या आवडीने तिने त्यात मन गुंतवले. आईच्या हाताला विलक्षण चव होती. मात्र, कधीही तिच्या हातात पदार्थ करण्याचे पुस्तक पाहिलं नाही. एवढी तिच्यावर अन्नपूर्णा प्रसन्न होती. प्रत्येक पदार्थातील घटकांचे व चवीचे प्रमाण तिच्या डोक्यात अगदी फिट्ट बसलेले असायचे. उदा.रवा, बेसन लाडू, भाजणीची चकली, गोड शिरा, माशांचे विविध प्रकार, साऊथ इंडियन सांबार. अनेक चवी आजही जिभेवर रेंगाळतात. त्यामुळेच आम्हाला हॉटेलात जायचे आकर्षण कधी वाटले नाही.

      तिने बाहेरचे जग फारसं पाहिलं नव्हतं. पण चार भिंतींमधलं विश्व मात्र तिने मजबूतीने व प्राणपणाने जपलं. त्यासाठी जे काही करावं लागेल ते मी करेन अशी तिची ठाम भूमिका असायची. आपली दोन्ही मुले, पती, जावई, नातू तशीच तिची भाचरं या सगळ्यांवर तिचा विलक्षण जीव होता.

   जिथे आपलं काम नाही, तिथे ती कधीच नाक खुपसायची नाही. “हे मला कळतं नाही, तुम्ही योग्य ते करा’ असं म्हणायची. त्याचबरोबर आम्हाला सांगायची, “तुमचं भविष्य तुम्हालाच घडवायचं आहे.’ प्रथा, परंपरा, देवधर्म ह्राचा योग्य तो सन्मान ठेऊन अवडंबर न माजवता आयुष्य जगणारी पापभीरु होती ती. आपण नेहमी चांगलच चिंतायचं, चांगलच वागायचं असा तिचा सरळ साधा विचार. सगळ्यांची खूप काळजी करताना स्वत:च्या तब्येतीची मात्र, हेळसांड करायची. अशी ही आमची आई. म्हणून आम्ही दोन्ही मुले जशी भाग्यवान तसाचं तिचा लाडका नातूही भाग्यवान अशी दक्ष आजी त्याला लाभली. ती तिच्या आयुष्यात सुखदु:खांना सामोरी गेली एका ध्येयाने. अनेक कटु गोष्टी तिने तिच्या शांत, समाधानी चेहे-याच्या मागे टाकल्या. कधीतरी बोलण्यात त्याचा सल जाणवे. पण तो त्यावेळेपुरताच. उत्साहात बाधा येऊ न देता तिने स्वत:ची कर्तव्य चोख बजावली. सोसायटीतल्या आमच्या समवयस्कांची, मावशी, आत्या, काकू म्हणून वावरली, तर पुढच्या पिढीची आजी.  जवळजवळ 9 दशकांचा प्रवास संपवून 87व्या वर्षी आम्हाला सक्षम बनवून 16 ऑगस्ट 2021 ती अनंतात विलीन झाली.

    मातृदिनाच्या निमित्ताने गेल्यावर्षीपर्यंत तुला पदस्पर्श करुन, पाठीवरुन फिरणा-या मायेच्या स्पर्शातून आम्ही आशीर्वाद लुटत होतो. आता सगळं भावनिक पातळीवर. असे असले तरी  आई सोबत असेपर्यंत समोर दिसते नंतर मात्र ती सदैव आपल्या आत असते या दोन ओळी कायम मनात पिंगा घालत आहेत.

 – सौ.मीरा प्रभूआजगांवकर.   9821713392

Leave a Reply

Close Menu