आम्ही मित्र शाळकरी वयात असताना, शाळा नं. 2 व रा. कृ. पाटकर हायस्कूल येथे शिकत असताना अगदी आतुरतेने वाट पहात असायचो आणि एकसारखे म्हणायचो, ‘पालखी येतली, लाडू मेळतले.’

     श्रावण महिन्यातील रिमझिम पाऊस सुरु झाला की आमची उत्कंठा खूपच वाढायची. पालखी कधी येणार म्हणून आम्ही चातकासारखी वाट बघायचो. कारण या पालखीवर कुरमुऱ्याचे लाडू व फुले अमाप उधळली जायची. नुसती झुंबड उडायची. शिवाय वेंगुर्ल्याच्या नारायण तलाव मंदिरासमोर मोठी समाराधना व्हायची, ती वेगळीच!

     एका वर्षी मला झटापटीत अर्धवट तुटलेला लाडू, फुले आणि माझ्या आईच्या परवानगीने समाराधनेचा लाभ घेता आला. तेव्हा आई म्हणाली, ‘तुला भास्करपंतांचा प्रसाद मिळाला आहे. त्यांना तू विसरु नकोस. हरिस्मरण करत रहा.’

     तिथपासून माझ्या मनात प.पूज्य भास्करपंतांनी घर केले. शिवाय वेंगुर्ल्यात असेपर्यंत जाता-येताना मिशाळ टेलर्सच्या दुकानात (पूर्वीचे मडकईकर सोनारासमोर) बसून (मूर्तीरुपाने) भास्करपंत पहात असल्याची एकसारखी जाणीव व्हायची. त्यावेळीही अगदी खर्डेकर महाविद्यालयात शिकत असताना सुद्धा खूप जणांकडे चौकशी केली. तरीही विशेष माहिती मिळू शकली नाही. फक्त ’पालखी येतली, लाडू मेळतले’ हेच पालुपद चालू राहिले.

     गेल्या पंधरवड्यात मला अत्यंत तीव्रतेने भास्करपंतांची ओढ लागली आणि अक्षरशः ज्ञात असलेल्या सर्व सद्गुरुंची व रामेश्‍वराची तळमळीने करुणा भाकून / प्रार्थना करुन माहिती मिळविण्याविषयी काकुळती केली आणि आश्‍चर्य म्हणजे आज माझ्यापाशी विस्तृत माहिती उपलब्ध होऊन राहिली आहे. याकामी ह.भ.प. गजानन मंगेश राजाध्यक्ष यांची मोलाची मदत झाली आहे. तसेच महाराष्ट्र माझा या दिवाळी अंकाचा मी ऋणी आहे. विस्तारभयास्तव संक्षेपाने माहिती नमूद करतो.

     प.पू. भास्करपंत वागळे या अलौकिक कडकडीत वैराग्य अंगी बाणवलेल्या, श्री स्वामी समर्थांच्या कृपेने अंगीकृत प्रचारकार्य करणाऱ्या थोर विभूतीची पालखी वेंगुर्ला शहरात गेली 95 वर्षे अत्यंत उत्साहाने बाजारपेठेपासून नारायणतलाव मंदिरापर्यंत भक्तिभावपूर्ण वातावरणात निघत आहे. हे पालखीचे 96 वे वर्ष आहे. वेंगुर्ल्यात सद्गुरुंची पालखी निघण्याचे हे एकमेव उदाहरण आहे.

     प.पू. भास्कर भगवंत वागळे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमधील आडीवरे या गावी इ.स. 1845 मध्ये झाला. त्यांचे नातेवाईक वगैरे कुणीही वेंगुर्ल्यात नाहीत. हे मूळ भालावलीकर गौड सारस्वत ब्राह्मण. त्यांचे वडील भगवंत वागळे हे त्याकाळी गावचे कुलकर्णी होते. अगदी कुमारावस्थेत असतानाच भास्कर वागळे हे श्री स्वामी महाराजांच्या कृपेला पात्र ठरले. श्री आनंदनाथ महाराज वालावलकर हे श्री स्वामी समर्थांसमवेत सहा वर्षे अक्कलकोटात होते. त्यानंतर स्वामी आज्ञेनुसार ते काही भक्त मंडळींसह अक्कलकोटातून बाहेर पडले. या भक्त मेळ्यात प.पू. भास्करपंत होते. सन 1891 ला भास्करपंत श्री आनंदनाथ महाराजांसमवेत वेंगुर्ल्यात आले. त्या काळात श्री आनंदनाथांचा मुंबई, नाशिक, सावरगाव, होडावडे, सावंतवाडी, अक्कलकोट, केज या भागात संचार चालू असायचा.

     प.पू. भास्करपंतांचा पारमार्थिक अधिकार जाणून आनंदनाथांनी त्यांना स्वतंत्र स्वामीध्वजा उभारण्यासाठी वेंगुर्ला बाजारपेठेतील मुख्य भागात थांबण्यास सांगितले व आपण वेंगुर्ला कॅम्प येथील ख्यालगिरी भागात मठ स्थापून राहू लागले.

     त्याआधी दोघेही वेंगुर्ला बंदरानजिकच्या मारुती मंदिरात रहात असत. इ.स. 1892 पासून भास्करपंत वेंगुर्ला बाजारपेठेत तर आनंदनाथ वेंगुर्ला कॅम्प परिसरात मुमुक्षूंना व इतरेतर भक्त भाविकांना मार्गदर्शन करु लागले. त्यांच्या हातून अनेक चमत्कारही होत असत. ते अवलिया साधू पुरुष होते.

     प.पू. भास्करपंत वागळे हे कडकडीत वैराग्याची ओतीव मूर्ती होते. त्यांची वृत्ती अपरिग्रही होती. कोणतीही उपाधी ते लावून घेत नसत. नारायण तलावाजवळील गावडे नामक गृहस्थाच्या दारी ते बऱ्याचदा आश्रयाला असत. तसेच बाजारपेठेतील परुळेकर दत्तमंदिरानजिक मिशाळ टेलर्सकडे काही वेळ बसत असत. त्यामुळेच पालखीचा सोहळा गावडे मंडळी प्रामुख्याने पार पाडतात व पालखी नारायण तलाव मंदिरापर्यंत वाजत गाजत नेली जाते. कारण नारायण मंदिर समोर प.पू. भास्करपंतांची समाधी आहे.

     नारायण तलावात ते स्नान करीत असत. उदरभरणार्थ भिक्षा मागत. त्यातही कोरान्नच घेत असत व ती भिजवून सेवन करीत. एखाद्या दुकानासमोर जाऊन उभे रहात. व्यापारी तांदुळ अर्पण करीत, ते तांब्यात घ्यायचे. तिथून बाहेर येताना कुणी अतिथी वा गरीब वाटेत भेटल्यास तांदुळ त्याच्या पदरात टाकायचे. एखादेवेळी भिक्षा घेऊन जात असता एखाद्या भक्तभाविकाने अन्नग्रहणासाठी प्रेमळ आग्रह धरला तर त्याला ते दुखावत नसत. पोटपूजा आटोपली की तांब्यातील कोरान्न मंदिरात जाऊन देवांस अर्पण करीत असत.

     वेंगुर्ल्यात स्थिरावल्यानंतरही ते वस्त्रप्रावरणाबाबत खूपच उदासिन असत. एक उपरणे खांद्यावर, मस्तकावर रुमाल, कंबरेत करगोटा, हातात एक दंड, एक तांब्या, स्वच्छंदी वृत्ती व मनातीत अवस्थेत ते सहज फिरत असत. कुणास कसलाही त्रास नाही. कुणी संपर्कात आलाच तर त्याचा भाग्योदय व्हायचाच हे ठरलेले. त्यांनी अनेकांना सन्मार्गाला लावले. ह.भ.प. केशव राजाध्यक्ष उर्फ मळयेकर मास्तर, नारायण गाडेकर, गणपतराव परुळेकर, शंकर आजगावकर, मोहम्मद अहमद राजापूरकर, दत्ताराम हवालदार, शिवरामपंत वागळे आदि असंख्य भक्तगण त्यांच्या लिलांनी आश्‍चर्यचकीत होऊन स्वामीभक्तीला लागले.

     इतर असंख्य चमत्कारांबरोबरच गणपतराव परुळेकर यांना भास्करपंतांनी आगळाच चमत्कार दाखविला. एकाच वेळी ते दोन ठिकाणी वावरताना दिसले. त्यांच्या या द्वयरुपधारी सामर्थ्यामुळे तत्कालीन वेंगुर्लेवासीय जनता चकीत होऊन गेली!

     त्यांनी स्वामीभक्ती व नामस्मरण यांचा संदेश आम जनतेस देऊन परमेश्‍वर प्राप्तीच्या वाटा आपल्या वागणुकीने व शिकवणुकीने दाखवून दिल्या.

     वयाच्या 80 व्या वर्षी श्रावण वद्य षष्ठी शके 1846, 20 ऑगस्ट 1924 रोजी रात्रौ दहा वाजून पाच मिनीटांनी ’दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या नामगजरात ते समाधिस्त झाले. त्यावेळी आसवांच्या महापुराने वेंगुर्ल्याची बाजारपेठ चिंब झाली होती. फार मोठा योगी पुरुष आपल्यातून निघून गेला होता.

– प्रा. सीताराम गिरप,

विरार (पूर्व), 9221487239

Leave a Reply

Close Menu