कमळ रंगयल्यास?

अलिकडे गणपतीला मुंबईसारख्या शहरात पर्यावरणपूरक सजावट करण्याकडे लोकांचा कल वाढत चालला आहे. ही जनजागृती अत्यंत सकारात्मक आहे. मला आठवते मी अठरा एकोणीस वर्षापूर्वी नवीमुंबईतल्या माझ्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना करायला सुरुवात केली त्यावेळी गणपतीला सजावट म्हणून थर्माकॉलचा फारमोठ्या प्रमाणात वापर होत असे. मीही काही वर्षे सजावटीसाठी थर्माकॉलचा वापर केला होता. पण काहीतरी चुकतंय अस सारख वाटायचं आणि त्यानंतर काही वर्षे कोकणातल्या सजावटीसारखी सजावट करायचा प्रयत्न केला. सगळ्याच गोष्टी शक्य झाल्या नाहीत, पण माटीची सजावट पाहून आमच्या घरी मुळचे कोकणातले असलेले पाहुणे ही सजावट पाहून खूप खुष व्हायचे. बिगरकोकणी अथवा अमराठी पाहुण्यांनाही ही सजावट खूप आवडायची. मग त्यांना या सजावटी मागचा इतिहास सांगताना वेळ कसा निघून जायचा हे कळत नसे.

      हळूहळू हे थर्माकॉलच्या मखराचे फॅड कोकणातसुध्दा दिसू लागले. समाजमाध्यमातून आपल्या गावच्या गणपतीचे फोटो अनेकजण शेअर करायचे, त्यातील काही फोटोत मुंबईप्रमाणे थर्माकॉलची सजावट पाहून वाईट वाटायचे. अलिकडे मुंबईत शाडूच्या मातीपासून तसेच पर्यावरणपूरक मुर्त्या तसेच पर्यावरण पुरक सजावट करण्याबाबत जनजागृती वाढू लागली आणि थर्माकॉलचा वापर हळूहळू कमी होत चालला आहे. लोक सजावटीसाठी विविध पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करुन सजावटीसाठी कलात्मकता आणू लागले आहेत. बाजारात कार्डबोर्डपासून, इरकली साड्यांपासून, कृत्रीम तसेच खऱ्या फुलांपासून बनलेली विविध तयार मखरे उपलब्ध होऊ लागली आहेत. गणेश चतुर्थी अगदी जवळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे मुंबईत अशा सजावटीच्या साहित्यांनी बाजार हळूहळू फुलू लागला आहे.

      या सजावटींच्या साहित्याकडे बघताना माझे मन नकळत माझ्या बालपणाकडे ओढ घेऊ लागते. वेंगुर्ल्यातल्या माझ्या घरी माझ्या बालहट्टामुळे गणपतीची प्रतिष्ठापना होऊ लागली होती. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती, त्यामुळे सण साजरे करणे आम्हाला परवडण्यासारखे नव्हते. पण माझ्या बालहट्टापुढे सर्वांनी नमते घेतले. आणि आम्ही शेवटी गणपतीचा पाट मुर्तीकाराकडे नेऊन दिला. इथे मी गणपतीच्या शाळेत असा उल्लेख केला नाही, कारण सुरुवातीला आम्ही एका हौशी मुर्तीकाराकडे गणपतीची मुर्ती बनवायला दिली होती. पोष्टात कामाला होते ते, एक हौस म्हणून त्यांनी दोन चार वर्षे आमची छोटीसी गणपतीची मूर्ती बनवून दिली होती. कोकणात डोक्यावरुन गणपतीची आणायची परंपरा असताना गावडेश्‍वर मंदिर ते कुबलचाळ अशी आम्ही ती छोटीसी मुर्ती हातात धरुन आणली होती. डाव्या हाताने घसरणारी चड्डी सांभाळत मुर्तीकडे टकामका बघत मागून धावत पळत येणारा मी, मला अजूनही आठवतोय.

      गणेश चतुर्थी जवळ आली की बाप्पाच्या आगमनाच्या तयारीत सगळेच मग्न होऊन जातात. लहानथोरांपासून सर्वचजण आपापले कॉन्ट्रीब्यूशन देत असतात. बायका अंगण, घर सारवणे, चुल मातीने सारवून लख्ख करणे, सर्व भांडीकुंडी, निरंजन, समई, देवाची भांडी घासून चकचकीत करण्याच्या गडबडीत असायच्या. एरव्हीही हा भाग त्यांचा दिनक्रमच असायचा, पण बाप्पाचे आगमन आले की याच कामाला एक वेगळा टच असायचा. थोडाफार फरक असला तरी अजूनही ही लगबग सगळीकडेच दिसून येते.

      बाप्पा येणार म्हणजे घराला रंग देणे आलेच. आता घर रंगवण्यासाठी कंत्राट दिले जाते, अत्याधुनिक पद्धतीच्या रंगाने, वालपेपरने घरांचा राजमहाल होतो. बाप्पाच्या कृपेने पैशाची समृध्दी सगळीकडेच आलीय, पण आमच्या बालपणी तशी परिस्थिती नव्हती. माझे बालपण तर वेंगुर्ल्याच्या कुबलचाळीत गेलेय. हे आमचे हक्काचे घर नाही, भाड्याचे घर. घर म्हणण्यापेक्षा चाळीतली खोली. तरीही आमचा सजावटीसाठी उत्साह काही कमी नसायचा. माझे दोन्ही मोठे बंधू किराणा दुकानात कामाला होते. गणेश चतुर्थीजवळ आली की, किराणा दुकानात खरेदीसाठी लोकांची प्रचंड गर्दी असायची त्यामुळे दोन्ही भावांना सुट्टी नसल्याने सवड नसायची. मग त्यातूनही कधीतरी सवड काढून आम्ही घर रंगवायला घ्यायचो. चुना आणि निळ यापासून रंग बनवून घराला रंगसंगती द्यायचो. चुन्यात निळ मिसळवून आकाशी रंगाने भिंत रंगवली जायची तर जमीनीपासून वर एक फुटापर्यत डार्क निळा रंग अशी ती रंगसंगती असायची. अलिकडे अशी रंगरंगोटी कोकणासुध्दा खेड्यापाड्यात अभावानेच आढळते.

      कोकणात गणपतीच्या सजावटीमध्ये महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे ज्याठिकाणी गणपतीची प्रतिष्ठापना होते त्या भिंतीवर गणपतीच्या मागे कमळाचे चित्र रंगवणे. बऱ्याचदा हे कमळ घरातील हौशी कलाकार रंगवायचे. “कमाळ रंगयल्यात काय ओ?” अशी एकमेकांकडे विचारपूस सुरु व्हायची. ही कमळे रंगवताना बघायला आम्ही लहान असताना अनेक घरात गेलोय. कमळ रंगवताना ज्याची त्याची पध्दत वेगळी असते. पण दर्शनाला येणारा बाप्पाला भक्तीभावाने नमस्कार केल्यावर करंजी/मोदकाची वाट बघण्यापूर्वी मुर्तीकाराच्या कलेची तोंडभरुन कौतुक करायचा. त्याचबरोबर भिंतीवर रंगविलेले कमळ हे आकर्षणाचे केंद्र असायचे. “कमाळ मात्र मस्त रंगयल्यात हां”. “कोणी रंगयल्यान?” अशा प्रश्‍नाच्या भडीमारानंतर “बाबल्याच्या (नाव प्रतिकात्मक आहे, पण ज्याने कमळ रंगविले आहे त्याचे नाव घेऊन) हातात कला मात्र मस्त आसा नाय.” त्यामुळे पुढच्यावर्षी या कलाकाराला आपल्या घरी कमळ रंगविण्यासाठी आग्रह हा ठरलेला. हळूहळू कमळाच्या जागी अनेक निसर्ग, पौराणिक चित्रांनी घेतली. हौशी कलाकारांच्या ठिकाणी व्यावसायिक कलाकारांनी घेतली. पाकळ्यांच्या फुलांचे/कमळाचे चित्र काढणे त्यामानाने सोपे होते त्याची जागा आता अशा कलाकृतींनी जरी घेतली असली तरी कौतुक करताना “कमाळ मस्त रंगयला हां” हे प्रशंसेचे वाक्य मात्र काही बदलले नाही. अर्थात जाताजाता अजून एक कौतुकाचे वाक्य असायचे ते म्हणजे “वयनी ‘नेवरे’ मात्र फस्सक्लास बनयल्यात हां”.

      कोकणात प्रत्येकाच्या घरी गणपतीला दर्शनाला जाणे हे जसे कॉमन आहे तसेच दर्शनाला येणाऱ्या पाहुण्यांना कोरी चाय तसेच नेवऱ्याची डिश देऊन पाहुणचार करणे हेही कॉमन आहे. करंजीला नेवरी हा शब्दप्रयोग इतरांना जरी वेगळा वाटत असला तरी कोकणी माणसाला परिचयाचा आहे. बाप्पाच्या स्वागताच्या तयारीमध्ये करंज्या/मोदक बनविणे हाही एक मोठा भाग असतो. ज्याची चर्चा जरी मोठ्या प्रमाणात होत नसली तरी हा सोहळाही बघण्यासारखा असतो. घरातील बाया, पोरं, पुरुषमंडळी, शेजारच्या बायका तळलेले मोदक आणि करंज्या बनवायला उत्साहाने सहभागी होतात. गुळ आणि चण्याचा पीठाचे सारणापासून तळलेली करंजी आणि मोदकाची चव अवीट आणि न विसरता येण्याजोगी आहे. गणेश चतुर्थीच्या अगोदरच करंज्या आणि मोदकांनी डबे भरुन गेलेले असतात.

      यावर्षीची गणेश चतुर्थी आता अगदी जवळ येऊन ठेपली आहे. चाकरमान्यांची कोकणात यायची पूर्व तयारीही झालीय. सरकारने लादलेल्या अनेक बंधनामुळे काही विघ्नही समोर उभी राहीलीत. तरीही उत्साहात काही घट झालेले नाही. चाकरमानी कोकणात पोहचण्यापूर्वी बाप्पाच्या आगमनाची पूर्व तयारी जवळजवळ पूर्ण झालेली असेल. गणपतीचा पाट देऊन त्यावर सुबक मुर्तीने आकार घेतलेला असेल आणि मूर्तीचे रंगकाम पूर्णत्वाकडे आलेले असेल. नेवऱ्यांनी डबे भरलेले असतील, घर आणि मुख्य म्हणजे कमळही रंगवून झालेले असेल. राहीले असेल ते आदल्या दिवशी माटी बांधायचे काम. माटीच्या सामानाने वेंगुर्ल्याचा बाजार फुलून जाण्यासाठी वेंगुर्ल्याची नवी बाजारपेठ प्रतिक्षेत आहे. तुम्ही किरातचा अंक वाचत असताना कुठून तरी तुमच्या कानावर आवाज पडत असेल “गाववाल्यांनू कमाळ रंगयल्यात?”

– संजय गोविंद घोगळे (8655178247)

Leave a Reply

Close Menu