गणेशोत्सव आणि या कोकणभूमीचे नाते अलौकिक आहे. श्री गणरायाची जन्मभूमी हिमाच्छादित आहे असे जर पुराणात वाचले नसते तर या कोकण प्रातांच्या गणेश प्रेमाचा आनंदसोहळा पाहिला की कोणीही क्षणभर त्या कथेला कदाचित कोकणाच्याही संदर्भात एखाद्या कथेत जोडले असते. कदाचित ही अतिशयोक्ती वाटेल, पण एक नक्की की, या लाल तांबड्या मातीने या रक्तवर्णीय रुपात आपलं जगणे शोधलंय. गणपती कधी येणार आहे या तिथीपेक्षा कोकणवासीय हा पाच-सात दिवसात आपले वर्षाचे उरलेले 360 दिवस जगत असतो. गणपती या नावाच्या ज्या गणेश लहरी असतात त्या मुंबईकर चाकरमान्याला असलेल्या पैशातून गावी ओढून आणतात, आणि गावच्या पैसे नसलेल्या जगण्यातही खरी श्रीमंती म्हणजे गणेशोत्सव उलगडून दाखवतात. कोकणचे गणेशउत्सवात जे एक सामाजिक आणि सांस्कृतिक आख्यान असते ते कोणीही कितीही लिहू दे, ते त्यापल्याड जाऊन आसमंतात भरुन राहणार हे कालातीत आहे.

      कोकणच्या गणेशोत्सव परंपरेत जी गोष्ट ठळकपणे जाणवते ती गोष्ट म्हणजे, कोकणची भजन संस्कृती! केवळ भजन हा शब्द जरी उच्चारला तरी कानात मृदुगांची थाप, टाळेचा नाद, पायपेटीची सरगम आणि कोरसात ऐकू येणारा आवाजाचा नाद कल्लोळ ऐकू येतो. सारवलेल्या जमिनीपासून ते फ्लॅट कल्चरपर्यंत कोकणातल्या गणेशोत्सवात भजन नावाची गोष्ट आज ’कला’ राहिलेली नाहीय, तो चाकरमानी आणि गावकऱ्यांसाठी ’ऑक्सिजन’ बनलाय.

      आज कित्येक पिढ्या भजनातुन समृद्ध झाल्यात याचा हिशेब नाही पण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भजनातून पिढीदर पिढी शास्त्रीय बाज मात्र वारसा बनून नव्याने जिवंत होतोय. आज अनेक लोककलेत पारंपरिकपणा हरवत चाललेला असताना भजन कला मात्र आजही जेवढी आपल्या पारंपरिकपणाला घट्ट धरुन आहे त्याचवेळी भजन हीच पहिली कला आहे की जी नव्या तंत्रज्ञानाच्या साथीने बहरत गेली. आज लोककलेसमोर अनेक आव्हान असताना बदलत्या जगावर आरूढ होऊन त्या तंत्रज्ञानावर विजय मिळवून  पुन्हा भजनच टिपेला भिडते.

      भजन आणी डबलबारी हा विषय कालही प्रासादिकपणाच्या निकषावर मोठा झाला आणि आजही त्याच निकषावर आपला रसिकजन बांधतोय. आज ट्वेन्टी ट्वेन्टी सारखे भजनातून नवीन काळ पुढे सरकत असला तरी त्या प्रवाहात मूळचा शास्त्रीयपणा सिद्ध केल्यावरच मग रसिक तुम्हाला सिद्ध करतात हे वास्तव आहे. आज या संपूर्ण भजनकलेकडे पाहताना हा पूर्ण इतिहास अनेकांना नावानिशी मुखोदगत असला तरीही कोरस, टाळकरी अशा माध्यमातून तो पुन्हा उरतो आणि मग पुन्हा हा इतिहास आपल्या संपन्नपणाच्या मर्यादा आणि लिहित्या शाईच्या मर्यादा उलगडतो.

      कोकणच्या भजनसंस्कृतीत गावकुसाचे जे प्रगल्भपण आहे ते मान्यच पण मुंबईच्या भजनीबुवांचे आणि आजही सुरू असलेल्या त्या अखंड परंपरेचा वारसा जाणून घेणे जास्त गरजेचा आहे. मिलच्या काळापासून ते प्रायव्हेट सेक्टरचा जॉब सांभाळून रात्री पुन्हा मंडळाच्या एका खोलीत किंवा नव्या हॉलमध्ये भजनाच्या सुरावटी बांधताना जो सराव होतो त्याला सराव म्हणजे केवळ अशक्य.. ऑर्गन, टाळ, चकी आणि मृदुगांची थाप असा नादाचा सोहळा सुरू झाला की ती अखंड मैफल असते.. अनेक प्रख्यात बुवा आपल्या शिष्यांना शिकवत हे स्वरहोत्र अखंड प्रज्वलित ठेवतायत..

      खरंतर या निमित्ताने किती हो भजनी कलावंतांना आठवणार? आजघडीला पूर्ण मुंबईत हजारपेक्षा जास्त भजनी मंडळी भजनकला टिकवून नवे भजनी कलावंत तयार करतायत. हिंदी-मराठी चित्रपट सृष्टीचे सुप्रसिद्ध संगीतकार बुवा स्नेहल भाटकर, महादेव कोळी, गोपाळ दांडेकर, शिवराम वरळीकर, पहाडी आवाजाचे बादशहा बुवा वामन खोपकर, बुवा परशुराम मोर्ये, दयाळ बुवा राजहंस, मारुती बागडे, अर्जुन तावडे, बाबुराव निपाणी तमाशा स्पेशल, गणेश नाथ ह्यांचा आणि अशा अनेक नावांचा पारंपरिक प्रासादिक भजनाचा एक काळ होता. त्याच सुरावटीवर कोकणचे ब्रह्मा-विष्णू-महेश प्रकटले. कोकण कला भूषण बतावणीचे बादशहा चंद्रकांत कदम बुवा, संगीत भजन महर्षी परशुराम पांचाळ बुवा, हरिनामाचा झेंडा लंडनपर्यंत घेऊन जाणारे संगीतरत्न भजनसम्राट विलासबुवा पाटील बुवा या भजनी बुवांनी भजनी कलेला एका निर्णायक काळात ग्लॅमर मिळवून दिले. त्याचबरोबर मालवणीवर जबरदस्त पकड असलेले काशीराम परब बुवा, संगीत भजनसम्राट चिंतामणी पांचाळ, इत्यादी दिग्गजांनी भजन परंपरा सन्मानाच्या  उंचीवर नेऊन ठेवली. त्यानंतरच्या पिढीत सन्मा. कदम बुवा, पाटील बुवा, पांचाळ बुवा यांना त्रिमुर्ती असेही संबोधले जाते.. वरील पैकी सर्व जेष्ठ श्रेष्ठ  बुवांच्या पंक्तीत बसणारे बुवा म्हणजे बुवा गोपीनाथ बागवे. त्यांचेही अनेक शिष्य भजनाचा प्रसार प्रचार करीत आहेत. आज वर्तमानकाळात नारायणी नमोस्तुते कॅसेटमधील आरत्यांच्या माध्यमातुन घराघरात पोहोचलेले भजनसम्राट बुवा भगवान लोकरे, भजनसम्राट बुवा रामदास कासले, भजनसम्राट बुवा श्रीधरजी मुणगेकर, बुवा नारायण वाळवे इत्यादी मंडळींनी आता वयाची साठी पार केलेली असून आजही मुंबईत राहून डबलबाऱ्या, भजने करीत असतात. ह्या मंडळींचा शिष्य सांप्रदाय खूप मोठा आहे मुंबईसह संपुर्ण कोकणात त्यांचे अनेक शिष्य आता नावारूपाला आलेले आहेत. केवळ हीच नाही तर अशी अनेक नावे आहेत, आणि प्रत्येक नाव दैवतसमान आहे. आज भजनी कलेत प्रत्येकाने खुप मोठे योगदान दिलंय. सगळीच नावे आप आपल्या शैलीने या क्षेत्रात अढळपद मिळवलेली आहेत. या लेखात नामोल्लेख कदाचित झाला तरी त्यांचे नाव आठवणे हे त्या त्या बुवांचे अढळपद आहे.

      टीव्ही, टेप, व्हीसीआर, सीडी, एमपी थ्री, यु ट्यूब आले तेव्हा दरवेळेला एकच प्रश्‍न पडायचा आता भजनाचे काय होणार? पण भजन आहे तिथेच आहे, येणाऱ्या प्रत्येक नवीन तंत्रज्ञानावर भजनी कलेने राज्य केले आणि यापुढेही भजन अढळ असेल ध्रुवासारखे.. ती अनेकांसाठी कला असेल पण सिंधुदुर्गतल्या प्रत्येकासाठी ती अभिमान आहे.. आणि म्हणून जेव्हा गणपतीचा उत्सव येईल त्या प्रत्येक क्षणाला भजन लोककला आठवत राहील आणि ओठी शब्द येतील.. तूच सूर ठावा मजसी…..

– ऋषी श्रीकांत देसाई

वृत्तनिवेदक  लोकशाही न्यूज, 9870904129

Leave a Reply

Close Menu