भाद्रपद शुद्ध चतुर्थी ही गणपतीची जन्मतिथी.  “भद्राणां समूह: भाद्रं” म्हणजे अनेक प्रकारच्या कल्याणांचा जो समूह त्याचे नाव भाद्र. या समूहाचे निवासस्थान म्हणजे पद आणि म्हणूनच त्याला भाद्रपद असे म्हणतात. अशा भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थीला घरोघरी आणलेल्या मृत्तिकेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना पूजा करताना विविध (21) पत्री-फुले वाहिली जातात. या पत्रीमध्ाील मंदार व शमी गणपतीला प्रिय का याबाबत आपण जाणून घेऊ..

वक्रतुंडाय नम: शमीपत्रं समर्पयामि!  कपिलायनम: अर्कपत्रं समर्पयामि!

      असे म्हणून श्रीगणेशाला शमी आणि मंदार पत्र वाहिली जातात. मंदार हे रुईच्या प्रकारातील झाड असून मंदाराची फुले पांढरी तर रुईची फुले जांभळसर पांढरी असतात. अर्क, क्षीरंगा, आकआकडा, आकडो, थक्के, थक्केगिड, मंदारथके अशी त्याची वेगवेगळ्या भाषांतील नावे असून वनस्पतीशास्त्रात त्याला ‘कॅलॉट्रॉपिस जायजॅन्टेया’ असे म्हणतात. तर समी छोकर, सफेद किकर, बन्नीमर, खिजडी, स्पंचट्री अशी शमीची वेगवेगळ्या भाषेतील नावे असून वनस्पतीशास्त्रात याला ‘प्रोसेपिस स्पेसिगेरा’ असे म्हणतात.

      मंदार व शमी गणपतीला प्रिय का? याबाबतची कथा अशी आहे की, धौम्य ऋषींचा मुलगा मंदार हा नाकीडोळी नीट होता. त्याचा विवाह शमिका नावाच्या और्व ऋषींच्या कन्येशी झाला. ते दोघे एकमेकांना अनुरुप असेच होते. एक दिवस ते दोघंही धौम्य ऋषींच्या आश्रमात गप्पा-गोष्टी करत असतानाच भ्रुशुण्डी तेथे आले. त्यांचे उदर गणपतीसारखे विशाल आणि त्यांच्या नाकाच्या जागी गणपतीसारखी सोंड होती. हे चित्रविचित्र रुप पाहून मंदार आणि शमिका खदखदा हसू लागले. भ्रुशुण्डी अत्यंत क्रोधीत झाले आणि त्यांनी त्या दांपत्याला शाप दिला की, ‘तुम्ही दोघे मला हसलात, म्हणून तुम्ही काटेरी झुडुपे व्हाल आणि तुमच्या जवळपास पक्षीसुद्धा फिरकणार नाहीत.’

      भ्रुशुण्डीच्या या शापामुळे मंदार व शमीचे तत्काळ काटेरी झुडुपात रुपांतर झाले. ही गोष्ट धौम्य ऋषींना समजताच त्यांनी एकच आकान्त केला. धौम्य ऋषींनी शमिकेच्या पित्यासह निबिड अरण्यात जाऊन गणपतीची तपस्या करुन त्याला प्रसन्न करुन घेतले. गणपतीने त्यांना वर मागण्यास सांगितल्यावर मंदार व शमिकेला पूर्वीची मनुष्याची रुपे परत देण्याची विनंती केली. गणपतीने त्यांची समजूत घालून म्हटले, ‘माझ्या भक्ताचा भ्रुशुण्डीचा शाप खोटा ठरणार नाही. तुम्ही दुसरा वर मागा.’ त्यावेळी ते दोघे म्हणाले, ‘हे कृपाळू दयाधना, मंदार व शमिका दांपत्याची तरुणपणीच ताटातूट झाली आहे. ते दोघे निदान एकत्र ती येऊ देत.’ त्यावेळी गणपती म्हणाले, ‘तथास्तू! आजपासून मी मंदार वृक्षाच्या मुळापाशीच राहत जाईन. त्यामुळे त्या वृक्षाची कीर्ती होईल व शमीच्या पानांनी जो कोणी माझी पुजा करेल, त्याची मनोकामना मी पूर्ण करेन. अशारितीने मंदार व शमी एकत्र येेतील.’ तेव्हापासून मंदार वृक्षाची फुले व शमीची पाने वाहण्याची परंपरा सुरु झाली.

      मंदार हे डोकेदुखी तसेच कोणत्याही विषारावर उपयुक्त आहे. कान दुखी, नाक, कफ, घटसर्प, हत्तीरोग यावर त्याची पाने, चीक, धुरी उपयुक्त आहे. तर आगेपण, अतिसार, उन्हाळी लागणे, गमी, धुपणी या व्याधींवर शमीच्या शेंगा, पाला उपचारांसाठी उपयुक्त आहे. औषधी गुणधर्मयुक्त असणारी ही फुले, पत्री गणपतीला वाहीली जावी आणि त्या निमित्ताने निदान एकदा तरी आपल्याला त्याची माहिती व्हावी, निसर्गाशी ओळख व्हावी, हादेखील महत्त्वाचा हेतू आहे.

-ॲड. सौ. सुमेधा देसाई, तळेबाजार, 9765847297

Leave a Reply

Close Menu