ओगले-फाटक यांचा बाप्पा

आपल्या प्रत्येक सणांमध्ये वेगवेगळी वैशिष्ट्ये दिसून येतात आणि अशाच काही वैशिष्ट्यांमुळेच आपल्या सणांची उंचीही वाढली आहे. असे वैशिष्ट्यपूर्ण सण साजरे करण्यासाठी प्रत्येक जण त्या त्या दिवसाची आतुरतेने वाट पहात असतो. असाच एक सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारा, मनातील भक्ती जागृत करणारा गणेशोत्सव सणही विविध परंपरेने नटला आहे. गणपती घडविण्यापासून ते गणपती विसर्जनापर्यंत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी प्रथा पहायला मिळते. अशीच एक गणपती घडवितानाची प्रथा वेंगुर्ला-भटवाडी येथील ओगले कुटुंबिय गेली 4 पिढ्या जपत आहेत.

      ओगले यांची गणपतीची शाळा फार जुन्या काळातील आहे. सध्या गणपती करण्याचे काम श्रीनिवास ओगले भक्तिभावाने करतात. त्यांच्या शाळेत मोजकेच 15 ते 20 गणपती बनविले जातात. याकामी त्यांचा मुलगा समीरही (अमित) मदत करतो. पण यातील एक गणपती हा ‘श्रावण वद्य संकष्टी’ या एका दिवसातच पूर्ण करण्याचा प्रघात गेली 4 पिढ्या सुरु आहे. पण तोही उजव्या सोंडेचा गणपती. गणपतीची बैठक उजवा पाय खाली, डाव्या पायाची मांडी व उजव्या पायाखाली उंदीर आहे. गणपतीचे समोरील दोन्ही हात हे ध्यानमुद्रेत आहेत. तर मागच्या उजव्या बाजूच्या हाताने तो आशीर्वाद देत आहे. संकष्टीदिवशी सकाळी नित्यपूजा आटोपल्यानंतर श्री. ओगले हे गणेशाची आवर्तन म्हणतात. मनोभावे गणपतीला नमस्कार करुन उजव्या सोंडेच्ाा गणपती करण्यास प्रारंभ करतात. जसाजसा वेळ वाढत जातो तसतसा श्रीगणेशाची मूर्ती घडवून पूर्णत्वात येते. रात्रौ साधारण 8 ते 8.30 पर्यंत हे काम पूर्ण होते.

      एका दिवसात हे सर्व करणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. परंतु, ओगले यांची नितांत श्रद्धा या गणपतीवर आणि आपण करीत असलेल्या गणपतीच्या सेवेत आहे. त्यामुळे विघ्नहर्त्याच्या सेवेत कसलेच विघ्न त्यांना येत नाही. जशी या गणपती घडविण्याची आगळीवेगळी प्रथा आहे तसेच वेगळेपण त्याच्या रंगकामातही आहे. बरेच गणपती हे रंगबेरंगी असे रंगविलेले दिसून येतात. चित्रशाळेतील इतर गणपपतींबरोबरच हा उजव्या सोंडेचा गणपती रंगविला जातो. परंतु, या गणपतीचा रंग हा पूर्ण लाल असतो. हा लाल रंग बनविताना सुद्धा एक वैशिष्ट्य आहे. आपल्या आजूबाजूला असलेल्या भेंडीच्या झाडाचा बोळ काढून त्यात लाल रंग एकत्र केला जातो आणि त्याचे लेपन या गणपतीला केले जाते. मुकुटाला सोनेरी घातली, गणपती रेखणी केली की, या गणपतीचे रुप पहातच रहावे असे विलोभनीय वाटते.

      हा उजव्या सोंडेचा गणपती भटवाडी येथीलच मोहन फाटक यांच्या निवासस्थानी गणेश चतुर्थीला विधीवत पूजला जातो. त्यांच्याकडेही दोन गणेश पूजनाची अनोखी प्रथा आहे. त्यांच्या एका पिढीतील लहान मुलाने हौशेखातर डाव्या सोंडेचा लहान गणपती बनविला आणि घरातील मोठी माणसे ओरडतील म्हणून त्याने तो गणपती घरातच लपूवन ठेवत चतुर्थी कालावधीत लपूनछपून भक्तिभावाने त्याची पूजाअर्चा केली. परंतु, तो मुलगा पुढे मोठा झाल्याने ही प्रथा बंद राहिली. जेव्हा फाटक यांच्या घरात लहान मुले जन्माला आली तेव्हा गणपतीने आता तुझ्या घरात लहान मुले असताना मला का नाही पूजत असा दृष्टांत दिला आणि काहीकाळ बंद पडलेली ही गणेश पूजनाची सेवा पुन्हा झाली आणि आजपर्यंत ती भक्तिभावाने सुरु आहे. अशी ही गणपतीची आगळीवेगळी परंपरा ‘ओगले’ आणि ‘फाटक’ कुटुंबिय पिढ्यान्‌पिढ्या जपत आहेत.

 

 

 

 

संपर्क- श्रीनिवास ओगले, 02366-263323

शब्दांकन- प्रथमेश गुरव, वेंगुर्ला. 9021070624

Leave a Reply

Close Menu