जळवी घराण्याचा ‘थोरला बाप्पा’

कुडाळ शहरातील कविलकाटे या गावातील थोरला बाप्पा हा सर्वत्र प्रसिद्ध आहे तो वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आणि लाकडी द्वारपालांमुळे.

      जळवी घराण्यातील तेरा कुटुंबियांचा सर्वात मोठा बाप्पा अशी त्याची प्रचिती आहे. हा गणपती चिकणमातीच्या 21 गोळ्यांपासून बनविला जातो. सुबक मूर्ती आणि मनमोहक रंगकाम यामुळे थोरल्या घरातला हा बाप्पा सर्वांचाच आवडता आहे. या गणपतीची मूर्ती ही गेली कित्येक वर्षांपासून नेरुर गावातील सुप्रसिद्ध मूर्तीकार श्रीधर (आना) मेस्त्री हे थोरल्या घरी येऊनच ही मूर्ती साकारत होते. परंतु काही वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाल्यामुळे ही परंपरा आता त्यांचा मुलगा रवी मेस्त्री व त्यांच्या घरातील इतर कुटुंबियांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे.

      अनेक वर्षांपासून जळवी घराणे जुन्या रुढी, परंपरा अगदी नित्यनेमाने जपत आहेत. तसेच या ठिकाणी मनोभावे बाप्पाची पाच, सात, अकरा, सतरा/एकवीस दिवस विविध उपक्रमा करत सेवा अर्चा केली जाते. आरती, भजने, पुरुष व महिलांच्या फुगड्या मोठ्या भक्तीभावाने सादर केल्या जातात. ढोल, ताशा आणि टाळ मृदुंगाच्या जयघोषात मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. इतर दिवशी आपल्या नोकरी व्यवसायात व्यस्त असणारे जळवी कुटुंबिय या सणाला एकत्र येत बाप्पाची सेवा करतात.

      घरातीलच शेकडो लोक या सणाच्या निमित्ताने एकत्र आल्याने या थोरल्या घरात खूप छान वातावरण असते. या थोरल्या गणपतीला नैवेद्य बनवताना एक परंपरा आजही जपली जात आहे. काही कुटूंब वेगवेगळी राहत असली तरी मात्र गणेश चतुर्थीच्या या सणाला तेराही कुटुंब एकत्र येऊन गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवितात. या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे जळवी कुटुंबातील सर्व बाळगोपाळ, तरुण, वयस्कर पुरुष मंडळी एकत्र येवून बाप्पाच्या गजराच्या तालावर फुगडी सादर करतात. त्याचबरोबर जळवी कुटुंबियांची श्रीदेवी चामुंडेश्‍वरी महिला फुगडी मंडळ हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. येथील महिलांनी महाराष्ट्रातील अनेक भागात आपली फुगडी ही कला सादर करुन अनेक पारितोषिके मिळवली आहेत. त्याचबरोबर झी चोवीस तास या वाहिनीने आयोजित केलेल्या मंगळागौर या कार्यक्रमाच्या पहिल्याच पर्वांत या जळवी कुटुंबियांच्या श्रीदेवी चामुंडेश्‍वरी महिला फुगडी मंडळाने संपूर्ण महाराष्ट्रातून पहिला क्रमांक पटकाविला होता. हा थोरला बाप्पा विराजमान असेपर्यंत सिंधुदुर्गातील अनेक भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात. त्याचबरोबर या जळवी कुटुंबियातील साईनाथ जळवी गेली अनेक वर्षे सिनेसृष्टीमध्ये कार्यरत असल्यामुळे सिनेमालिका क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार सुद्धा या ठिकाणी उपस्थिती दर्शवितात.

      या थोरल्या बाप्पाच्या विसर्जनादिवशी दुपारी महाप्रसाद (म्हामणा) झाल्यावर दुपारनंतर किमान चार ते पाच तास भजने आणि फुगड्यांचे सादरीकरण केले जाते आणि त्याच भक्तीमय वातावरणात तल्लीन होऊन कुठल्याही डिजे अथवा अश्‍लील गाण्यांचा धिंगाणा न घालता ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचं विर्सजन केलं जातं.

      अनेक वर्षांच्या प्रथेप्रमाणे या बाप्पाचा असलेला लाकडी मुकूट पुन्हा एकदा घरातील चौरंगावर ठेवून ओल्या अंगाने आरती केली जाते आणि त्यावेळी बाप्पाचा प्रसाद सुद्धा सर्वत्र पोहोचविला जातो. अशा या थोरल्या बाप्पाचा गणेश चतुर्थीचा संपूर्ण सोहळा तुम्ही Sai Jalavi film या You Tube Chanel च्या माध्यमातून सुद्धा पाहू शकता.

– साईनाथ जळवी, 7506419766,

saijalvi2299@rediffmail

Leave a Reply

Close Menu