पर्यावरण पूरक गणपती

गणपती विसर्जनावेळी होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी शुद्ध लाल मातीच्या पर्यावरणपुरक गणपतींची क्रेझ अस्तित्वात येत असून उत्स्फूर्त  प्रतिसादामुळे यावर्षी 500 गणेशभक्त पर्यावरणपुरक गणपतींचे पूजन करणार आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वेंगुर्ल्याची सुकन्या व बेळगांव येथील रहिवासी बबीता भातकांडे-परब यांचा हा उपक्रम समाजाबरोबरच निसर्ग वाचविण्यासाठी महत्त्वाचा दुवा बनणार आहे.

      आज जल, ध्वनी, वायू यांच्या प्रदूषणाचा मारा सतत समाजाबरोबरच निसर्गावरही होताना दिसत आहे. त्यामुळे निसर्गाची घडी विस्कळीत चालली आहे. जलप्रदूषण तर वर्षभरच होत असते. मग त्यासाठी मोठमोठे कॉम्प्लेक्स म्हणा किंवा आपण साजरे करत असलेले सण हेच जबाबदार असतात.  गणेश चतुर्थी हा कोकणातील मोठा सण. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घरोघरी मातीच्या गणपतींचे पूजन करण्याचे प्रमाण वाढले असताना मूर्ती घडविण्याची पारंपरिक प्रथा बाजूला ठेऊन त्याऐवजी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांचे पूजन केले जाऊ लागले आहे. सिंधुदुर्गात याचे प्रमाण जास्त नसले तरी मोठमोठ्या शहरांत मात्र, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांचे लोण पसरले आहे. अशा मूर्त्या विसर्जन करताना पाण्याचे प्रदूषण होते. या मूर्त्या विरघळत नसल्याने त्यांची होणारी दैनावस्था मन हेलावून टाकणारी आहे. पीओपीच्या मूर्त्या तलावात विसर्जन केल्यास त्यांचे काही अवशेष हे थेट तलावातील झ-यांमध्ये अडकल्याने पाणीच बंद होण्याचे प्रकारही घडतात. तसेच मूर्त्या रंगविण्यासाठी वापरलेल्या रंगांमध्ये केमिकल्स असल्याने ते रंग पाण्यामध्ये मिसळून तेथील जीवजंतू मरण पावतात. हे पाणी प्रदूषण थांबविणे काळाच्यादृष्टीने आवश्‍यक आहे. परंतु, त्यासाठी नुसती संकल्पना मांडून नाही तर ती अस्तित्वात आणून त्याचा ‘श्रीगणेशा’ करणे तेवढेच महत्त्वाचे होते आणि हे सर्व सत्यात उतरविण्यासाठी बबीता भातकांडे यांनी पुढाकार घेतला.

      2016 मध्ये सौ.भातकांडे यांनी आपल्या कल्पनेनुसार गणेश मूर्तीकाराकडून शुद्ध लाल मातीचा पहिला गणपती तयार करुन घेतला. सुरुवातीला ही संकल्पना गणेशभक्तांच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी कठीण झाले. परंतु, जसजसे पर्यावरणाचे महत्त्व समजू लागले तसतसे गणेशभक्त स्वत: अशाप्रकारच्या गणपतींचे पूजन करु लागले. सौ.भातकांडे यांनी यामध्ये फक्त दीड आणि दोन फुट असे दोनच प्रकार ठेवले आहेत. साधारण फेब्रुवारीपासून या गणपतींचे बुकींग सुरु होते.  यावर्षी दिल्ली, बेंगलोर, गोवा, मुंबई, पुणे आदी ठिकाणीही हे गणपती पाठविण्यात आले.

      सौ.भातकांडे ह्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत तर त्यांनी गणपती विसर्जनासाठी प्रत्येक गणेशभक्तांना एक टप आणि एक झाडही दिले. त्या टपामध्ये पाणी साठवून त्यामध्ये श्रीगणेशाचे विसर्जन करण्याची विनंती केली. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी विसर्जनासाठी होणारी गर्दी काही प्रमाणात कमी झाली. हा गणपती काही तासांतच विरघळतो. ही विरळलेली माती अन्यत्र न टाकता सोबत दिलेले झाड लावताना त्या मातीचा वापर करण्याचा सल्लाही दिला.

      सर्वत्र गणपतीकडे सजावट करण्याचीही परंपरा आहे. गणपतीबरोबरच सजावटीमध्येही पर्यावरणपुरकता येण्यासाठी त्यांनी पर्यावरणपुरक सजावटीची स्पर्धाही घेतली. स्पर्धेच्या हेतूने बरेच गणेशभक्त यात सहभागी झाले आणि स्पर्धेच्या निमित्ताने त्यांना पर्यावरणाचे महत्त्व समजले. सौ.भातकांडे यांच्या अथक प्रयत्नाने पर्यावरणपुरक गणपती ही संकल्पना गणेशभक्तांमध्ये रुजण्यास सुरुवात झाली आहे. सौ.भातकांडे यांना बेळगांवमधील ‘WEB’ या संस्थेचे या उपक्रमासाठी सहकार्य मिळत आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण वाचविण्याच्या उपक्रमाला मुहूर्त मिळाला आहे. त्यांच्या या प्रयत्नाला प्रथम पूजक असा गणपती निश्‍चित यश देईलच.

      लाल शुद्ध गणपतींची ऑर्डर व डिलिव्हरी भातकांडे स्पोर्टस्, 47, कॉरर्पोरेशन शॉपिंग कॉम्प्लेक्स, गोवा वेस, बेळगांव येथे सुरु आहे.

 

 

 

 

 

संपर्क- बबीता भातकांडे-परब, 9686135964

शब्दांकन- प्रथमेश गुरव, वेंगुर्ला. 9021070624

Leave a Reply

Close Menu