गांडुळखत निर्मिती प्रात्यक्षिक

दापोली कृषी महाविद्यालयातील ग्रामीण कृषी जागृती विकास योजनेअंतर्गत वेंगुर्ला-मठ येथे कृषिमित्र सर्वेश देऊलकर, देवेंद्र गावडे, ओंकार गावडे आणि मनिष वेंगुर्लेकर यांनी गांडूळखत निर्मिती प्रात्यक्षिक दाखविले. यावेळी गांडूळखत निर्मितीसाठी लागणा-या जागेची निवड, साहित्य तसेच गांडूळखताचे शेती व फळबागायती व्यवसायात असणारे फायदे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. गांडूळखत हे आजवर उपलब्ध असलेल्या सेंद्रीय खतांपैकी एक उत्कृष्ठ खत आहे. टाकाऊ सेंद्रीय पदार्थ कुजविण्यासाठी गांडुळांचा उपयोग केला असता गांडूळे सेंद्रीय पदार्थाचे तुकडे जसे पेंढा, कोंडा, झाडांचा पालपाचोळा, शेण, गिरिपुष्प, शिळे अन्न इत्यादी गिळून चर्वण व पचन करून कणीदार कातीच्या स्वरुपात शरीराबाहेर टाकतात. शेतीत व बागायातीत हे खत वापरल्यास झाडांची सशक्त वाढ होऊन, त्यांची उत्पादन क्षमता वाढते व काही प्रमाणात किडींना व रोगांना प्रतिकार करण्याची क्षमता वाढते. हे खत जमिनीचा पोत सुधारण्यास मदत करते. दिवसेंदिवस रासायनिक खतांच्या वाढत्या किमतीमुळे, गांडूळखत हा शेतक-यांसाठी उत्तम पर्याय आहे. या खताचे फायदे लक्षात घेता, जास्तीत जास्त शेतक-यांनी या खताचा उपयोग शेती व बागायातीमध्ये करून उत्पादन क्षमता वाढावी, या हेतूने शेतक-यांना प्रोत्साहन देत मार्गदर्शन करण्यात आले. या प्रात्यक्षिकासाठी पशुपैदास केंद्र, निळेली येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.व्ही.एस.कविटकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Close Menu