‘‘भारतरत्न‘‘ या भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित गानकोकिळा, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा ९२ वा वाढदिवस २८ सप्टेंबर रोजी संपन्न झाला. जवळपास सहा दशकांत आपल्या स्वर्गीय आवाजाने २० भारतीय भाषांमध्ये ५० हजारहून अधिक गाणी गात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दीदींच्या नावाची नोंद झाली आहे. दीदींनी गायलेली गाणी आजही रसिक मनावर अधिराज्य गाजवून त्यांना भुरळ पाडतात.

     दीदींचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला. मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये जन्मलेल्या लतादीदी या पं. दिनानाथ मंगेशकर यांच्या थोरल्या कन्या. दीदींचं नाव पहिलं हेमा होतं. मात्र, वयाच्या पाचव्या वर्षी वडिलांनी त्यांच्या भावबंधनया नाटकातील लतिकाहे पात्र गाजल्यामुळे दीदींचं हेमाहे नाव बदलून लताठेवलं. मंगेशकर हे त्यांचं आडनाव गोव्यातील मुळगाव मंगेशवरुन पडलं आहे. त्यांचे वडिल दिनानाथ नाट्यकलावंत व गायक होते.

    दीदी त्यांच्या बालपणी फक्त एक दिवसच शाळेत गेल्या होत्या. शाळेत आपल्या सोबत त्या त्यांची लहान बहीण आशाला घेऊन गेल्या होत्या. तिथं पहिल्याच दिवशी त्यांनी बहिण आशासोबतच इतर विद्यार्थ्यांना गाणं शिकवायला सुरुवात केली. तेव्हा अचानक वर्गात आलेल्या गुरुजींना ते अजिबात आवडलं नाही त्यामुळे ते त्यांना रागावले. त्यानंतर दीदी पुन्हा कधीच शाळेत गेल्या नाहीत.

    दीदींनी वयाच्या पाचव्या वर्षापासून वडिलांच्या संगीत नाटकात अभिनय करायला सुरुवात केली. १९४५ साली आलेल्या मास्टर विनायक यांच्या बडी माँया सिनेमात त्यांनी पहिल्यांदा एक छोटी भूमिका साकारली होती. १९३८ साली वयाच्या नवव्या वर्षी सोलापूरमधील नूतन थिएटर्स नाटकासाठी राग कुंभवतीआणि अन्य दोन गाणी गायली होती. पहिल्यांदा स्टेजवर गाण्यासाठी दीदींना पंचवीस रुपये मानधन मिळालं होतं. १९४२ साली किती हसालया वसंत जोगळेकरांच्या मराठी चित्रपटातील नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारीहे सदाशिवराव नेवरेकरांनी बसवलेलं गीत गात सिनेक्षेत्रात त्यांनी पदार्पण केलं. मात्र सिनेमाची लांबी कमी करण्यासाठी ते गाणं सिनेमातून हटविण्यात आलं. त्यानंतर त्याचवर्षी आलेल्या पहिली मंगळागौरया सिनेमातील नटली चैत्राची नवलाईहे गीत त्यांचं पहिलं गाणं ठरलं.

    १९४८ साली निर्माता दिग्दर्शक शशीधर मुखर्जी यांनी त्यांच्या शहिदया सिनेमासाठी पार्श्वगायन करायला दीदींना बोलावलं होतं. मात्र, त्यांचा आवाज खूप बारीक असल्याचं कारण देत त्यांनी तो आवाज नाकारला. पण दीदींना संगितकार मास्टर गुलाम हैदर यांनी त्यांच्यातील गुणवत्ता हेरुन पार्श्वगायनाची संधी दिली होती. तसंच दीदींच्या आवाजात गाणी रेकॉर्ड करुन घेण्यासाठी संगितकारांच्या एक दिवस रांगा लागतील असं भाकितसुद्धा त्यांनी केलं होतं, पुढे तेच खरं ठरलं. आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीला दीदी ख्यातनाम गायिका नूरजहाँ यांची नक्कल करण्याचा प्रयत्न करायच्या. नंतर मात्र त्यांनी स्वतःची गायनशैली विकसित केली. २७ जानेवारी १९६३ साली भारत-चीन युद्धानंतर दिल्ली नॅशनल स्टेडियमवर दीदींनी ए मेरे वतन के लोगोहे देशभक्तीपर हृदयस्पर्शी गीत सादर केल्यानंतर त्यावेळी त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलं होतं.

    सुरवातीला फिल्मफेअर अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक आणि गायिकेसाठी पुरस्कार दिले जात नव्हते. मात्र दीदींनी याबाबत आवाज उठवल्यानंतर १९५८ पासून सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक व गायिकांचं नामांकन होऊन पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. १९५५ साली आलेल्या रामराम पाहुणंया मराठी सिनेमाद्वारे दीदींनी आनंदघनया नावानं पार्श्वसंगीत द्यायला सुरुवात केली.

   १९४९मध्ये महल या हिंदी सिनेमातील आएगा आने वालाया गाण्याच्या माध्यमातून त्यांची हिंदी सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण झाली. त्यानंतर राज कपूर यांच्या बरसातसिनेमातील जिया बेकरार है‘, ‘हवा में उडता जाएसारख्या गाण्यांमुळे लता मंगेशकरहे नाव हिंदी सिनेसृष्टीत यशस्वी गायक-गायिकांच्या यादीत पहिल्या स्थानावर जाऊन पोहचलं आणि ते आजतगायत पहिल्याच स्थानावर आहे.

     दीदींना त्यांच्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीत एकूण चार वेळा फिल्मफेअर पुरस्कारनं सन्मानित करण्यात आलं. १९७२ साली परिचय, १९७५ साली कोरा कागजआणि १९९० साली लेकिनया सिनेमांसाठी राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. याशिवाय दीदींना १९६९ मध्ये पद्मभूषण, १९८९ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, १९९९मध्ये पद्मविभूषण, २००१ मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजे भारतरत्नने सन्मानित करण्यात आलं.

  सुरेल आवाज व साध्या राहणीमुळे ओळखल्या जाणा-या, आजही गाण्याच्या रेकॉर्डिंग स्टुडिओत जाताना चप्पल बाहेर काढून नमस्कार करुनच आत जाणा-या लतादीदींना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. 

-स्मिता दळवी, खारघर,नवी मुंबई –९८३३८६४८८४

 

 

 

 

 

Leave a Reply

Close Menu