संधीची मानगुट धरायची कोणी?

माडा-पोफळींच्या बागातून वाट शोधत जमिनीला भिडणारे सकाळची कोवळी उन्हं… आयन, किजळ, आंबा, काजू, फणस, जांभूळ, चाफा, पटकुळणींची रानं, नद्या, ओढ्यांच्या किना-याने गच्च भरलेली केगदींची रानं, खाड्यांच्या किना-यांवर पिढ्यान् पिढ्या वाढलेली खारफुटीची जंगलं, किना-यावरची मच्छिमारांची घरं, समुद्रात डौलात हेलकावणा-या होड्या, किना-यावरच्या वाळू उभ्या असणा-या मच्छिमारी होड्या, त्याच्या भोवतीने जाळी विणणारे मच्छिमार, सकाळ-संध्याकाळ किना-यावर भरणारा माशांचा लिलाव. या अशा पर्यावरणात श्रद्धेने हात जोडली जातील अशी पारंपरिक देवस्थाने. हे सगळं आणि याहून कितीतरी अद्भूत असं सिधुदुर्गचे वैभव आहे.
देश-विदेशातून सिधुदुर्गात येणा-या अनेकांना इथला निसर्ग भुरळ घालतो. एका बाजूला सुंदर, शांत समुद्र किनारे आणि दुस-या बाजूला आकाशाला गवसणी घालणा-या सह्याद्रीच्या डोंगरकड्या आणि भूमिपुत्रांचे जगणं. ही सिधुदुर्गच्या विकासाची सुप्त उर्जा आहे. आज जगभरात पर्यटन व्यवसायात अब्जावधींची उलाढाल होत असते. करोडांना यातून रोजगार मिळतो. निसर्ग आणि लोकजीवनाच्या आधारे चालणारा व्यवसाय ब-याच अंशी शाश्वत मानला जातो. कोविड स्थिती नियंत्रणात आल्यावर लोकांनी प्राधान्य दिले आहे ते मुक्त भटकंतीला हे दिसून आले आहे. मलेशिया, सिगापूर सारख्या देशांची अर्थव्यवस्था पूर्णतः पर्यटनावर अवलंबून आहे. अगदी आपल्या लगतच्या गोवा राज्याचे उदाहरण तर कितीतरी दशके आपल्यासमोर आहे.
राजकीय नकाशावर सिधुदुर्ग आणि गोवा हे वेगळे आहेत. परंतु, यामध्ये भौगोलिक सलगता आहे. गोव्याच्या शासनकर्त्यांनी गोव्याला पर्यटनाच्या दृष्टीनकोनातून विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला. शासनस्तरावर तशाप्रकारचा विकास आराखडा बनवला. त्यामुळे पर्यटकांना पायाभूत सुविधा देण्याकडे जास्त लक्ष दिले. पर्यटनस्थळांना जोडणा-या रस्त्यांचा विकास ही सर्वात मोठी गोष्ट गोव्यात दिसते. चांगले रस्ते, निवास व्यवस्था देणा-या होमस्टेपासून ते पंचतारांकित हॉटेल व्यावसायीकांना अनुकुल शासन धोरण आणि सक्षम वाहतूक व्यवस्था या सर्व बाबी गोव्याच्या पर्यटन विकासाला चालना देतात.
परंतु, त्याच गोव्याला लागून असलेल्या सिधुदुर्गात गोव्याच्या तोडीस तोड पर्यटनस्थळे आहेत. माफक दरात निवास आणि रुचकर भोजनाची व्यवस्था स्थानिकांनी सुरु केली आहे. मात्र, पायाभूत भौतिक सुविधांच्या अभावामुळे येथील निसर्गसौंदर्य जागतिक पर्यटकांपासून दूर राहिले आहे. पर्यटन जिल्हा जाहिर होऊन २५ वर्षे पूर्ण झालीत. सर्व पक्षांची सरकारे सत्तेत येऊन गेली. परंतु, उपेक्षेशिवाय सिधुदुर्गवासीयांच्या हाती काही लागले नाही.
सुरु होण्याअगोदरच श्रेयवादात अडकलेल्या सिधुदुर्ग विमानतळाचे उद्घाटन ९ ऑक्टोबर २०२१ रोजी होत आहे. हाच एक आशेचा किरण पर्यटन वाढीकडे आस लावून बसलेल्या तरुणांसमोर आहे. मुंबई ते सिधुदुर्ग हा विमान प्रवास १ तास १० मिनिटांत पूर्ण होणार आहे. कित्येक वर्षे सिधुदुर्गातून विमान प्रवासाचे स्वप्न साकारत आहे. याचा सिधुदुर्गवासीयांना सार्थ अभिमान आहे.
सिधुदुर्ग विमानतळाचा पर्यटन वाढीसाठी उपयोग करुन घ्यायचा असेल तर शासनाच्या सर्व विभागामध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. राजकीय नेत्यांनी आपले मतभेद आणि पक्षिय कुरघोडी दूर ठेवत किमान पर्यटन स्थळांना जोडणारे सुसज्ज आणि दोन गाड्या सहज जाऊ शकतील असे रुंद रस्ते येत्या वर्षभरात पूर्ण केले पाहिजेत. त्यासाठी भूसंपादन, बाजारपेठ असेल तिथे बायपासच्या पर्यायाचा वापर झाला तरच पर्यटनस्थळांपर्यंत पर्यटकांना सहज जाता येईल. एवढीच शासनाकडून अपेक्षा आहे.
पर्यटनात संधी अनमोल आहेत. परंतु, बोलबच्चन राजकीय नेतृत्व पर्यटन विकासाच्या केवळ गप्पाच मारत राहिल व विकासाच्या हवाई गप्पा गोष्टींनी स्वतःची राजकीय पोळी भाजून घेईल. त्यामुळे स्थानिकांनी व्यवसायाच्या माध्यमातून सामुहिक नेतृत्वाची निर्मिती करावी तरच येथील निसर्गात असलेल्या सुप्त पर्यटन उर्जेला वाव मिळू शकेल.

Leave a Reply

Close Menu