बॅरिस्टर होणे हे नाथ पैंचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे स्वप्न होते. त्यातही नावामागे बॅरिस्टर ही उपाधी लागावी, एवढी मर्यादित इच्छा नव्हती. भारतीय राजकारणात ही पदवी धारण करणाऱ्यांना मान होता. जीना आणि सावरकर बॅरिस्टर होते. बॅरिस्टर ही पदवी मिळविण्यासाठी इंग्लंडला जावे, तेथील संसदीय लोकशाहीचा अभ्यास करावा, परत आल्यावर भारतातील संसदीय लोकशाही मजबूत करावी आणि विधायक राजकारण करावे – एवढा विशाल विचारव्यूह नाथ पैंच्या मनात होता. इंग्लंडमधील मजूर पक्षाचे कामही त्यांना जवळून पाहायचे होते कारण त्यांच्या समाजवादी विचारसरणीशी या पक्षाची धोरणे मिळतीजुळती होती.

      इंग्लंडमध्ये नाथ पैंचे कायद्याचे शिक्षण सुरू झाले. ‘लिंकन्स इन’ हे त्यांच्या अध्ययनाचे स्थान होते. त्यांच्या इंग्लंडमधील विद्यार्थिदशेच्या प्रारंभीच भारतात दोन घटना घडल्या. त्यातील पहिली घटना होती गांधीजींचे ऐतिहासिक उपोषण आणि दुसरी घटना होती ती राष्ट्रपित्याची हत्त्या. आपल्या या नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशाची खूप काळजी घ्यायला हवी, हे नाथ पैंच्या ध्यानी आले.

      समविचारी समाजवादी तरुणांचा इंडियन सोशलिस्ट ग्रुप लंडनमध्ये स्थापित झाला. या संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासासाठी वर्ग सुरू झाले. या वर्गांना नाथ उपस्थित राहत असत. इंग्लंडमधील भारतीयांच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी स्थापन झालेल्या इंडियन मजलिस या संस्थेचे काम नाथ पाहू लागले व पुढे दोन वर्षांसाठी ते मजलिस चे अध्यक्षही झाले. इंडियन सोशलिस्ट ग्रुप आंतरराष्ट्रीय समाजवादी युवक संघटना (इंटरनॅशनल युनियन ऑफ सोशलिस्ट यूथ – ‘युसी) या संस्थेशी संलग्न होता. या युसीच्या व्यासपीठावर गोव्याच्या स्वातंत्र्याचा प्रश्‍न मांडला गेला आणि पोर्तुगीजांच्या दडपशाहीचा निषेधही झाला. भारतातले प्रश्‍न आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन मांडण्यात नाथ यशस्वी झाले.

      इंग्लंडमधील संसदीय लोकशाहीचा अभ्यास करण्याच्या हेतूने नाथ हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये जाऊन तेथील कामकाजाचे निरीक्षण करीत. इंग्लंडमधल्या मजूर पक्षाचे कामकाज पाहत. त्या वेळचे इंग्लंडचे पंतप्रधान क्लेमंट ॲटली यांच्याशी नाथ पैंची जवळीक निर्माण झाली. फेन्नर ब्रॉकवे, हॅरॉल्ड विल्सन इत्यादी मजूर पक्षाच्या नेत्यांचाही परिचय झाला. भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने ही सर्व सुचिन्हे होती.

      कामगार संघटनाच्या – ट्रेड युनियनच्या – अभ्यासासाठी नाथ पैंना ऑस्ट्रिया या देशाकडून एक शिष्यवृत्ती मिळाली. अध्ययनाच्या या कालखंडात त्यांचे वास्तव्य व्हिएन्नामध्ये होते. अभिजात संगीतासाठी हे शहर जगप्रसिद्ध आहे. या कालखंडात नाथ जर्मन भाषा शिकले. जर्मन भाषेतून वृत्तपत्रीय लेखन करू लागले. बहुआयामी व्यक्तिमत्त्व नव्या अनुभवांनी कसे समृद्ध होत जाते, याचा नाथ हा उत्तम नमुनाच मानायला हवा.

      व्हिएन्नामध्येच नाथ पैंच्या जीवनाला एक वेगळा आयामही लाभला. ऑस्ट्रियन सरकारच्या सचिवांची कन्या क्रिस्टल मुशेल यांच्याशी त्यांचा परिचय झाला. नाथ पैंच्या तडफदार व्यक्तिमत्वाने क्रिस्टल प्रभावित झाल्या. क्रिस्टलही कष्टाळू, बुद्धिमान होत्या. नाथ आणि क्रिस्टल हा नियतीच्या दृष्टीने समसमासंयोग होता. यथावकाश नाथ आणि क्रिस्टल विवाहबद्ध झाले.

      1947 ते 1952 असा सुमारे पाच वर्षांचा काळ नाथ परदेशात होते. इंग्लंड, ऑस्ट्रिया आणि अमेरिका या देशांमध्ये ते राहिले. कायद्याचा अभ्यास हा मूळ उद्देश आणि तो करताकरताच संसदीय लोकशाहीचा आणि कामगार चळवळीचा अभ्यास सुरू होता. ‘बॅरिस्टर’ या पदवीसाठीच्या दोन परीक्षा नाथ उत्तीर्ण झाले, आणि शेवटच्या परीक्षेच्या तयारीत होते. पण शिक्षण तात्पुरते अपूर्ण ठेवून एका वेगळ्या कारणासाठी ते भारतात आले.

*****

      1952 मध्ये भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेपूर्वीचा हा काळ होता. तेव्हा गुजरातपासून धारवाडपर्यंत विस्तार असलेले मुंबई राज्य होते. मुंबई राज्यात बेळगाव शहर हा विधानसभा मतदारसंघ होता. समाजवादी पक्षाने या मतदारसंघातून नाथांना उमेदवारी दिली. नाथ या निवडणुकीसाठी भारतात आले. त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. तरुण मंडळी उत्स्फूर्तपणे नाथ पैंच्या प्रचारात सामील झाली. या निवडणुकीत पु. ल. देशपांडे प्रचारासाठीची भाषणे करीत. ‘पुढारी पाहिजे‘ या पु. लं. च्या प्रसिद्ध वगनाट्याचा प्रयोग या निवडणुकीत झाला.

      असे असूनही नाथ या निवडणुकीत पराभूत झाले. कदाचित नाथ पैंचे ‘बॅरिस्टर’ होण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठीची ही नियतीची योजना असेल. नाथ पुन्हा इंग्लंडला गेले आणि वर्षभरातच ‘बॅरिस्टर’ या पदवीसाठीची अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाले.

      यानंतरही वर्षभर नाथ युरोपमध्ये होते. या कालावधीत त्यांनी साने गुरुजींचे लंडनमध्ये स्मारक उभारण्याचे काम मनावर घेतले. गुरुजींच्या नावे लंडनमध्ये विद्यार्थी-वसतिगृह सुरु करण्याची ही योजना होती. या योजनेने नाथ पैंच्या प्रयत्नामुळे गती घेतली व हे वसतिगृह सुरू झाले.

      नाथ पैंच्या कार्यकर्तृत्वाचा आणि विशेषत: वक्तृत्वाचा गौरव युरोपभर होऊ लागला. फिनलंड, जर्मनी, इस्राएल वगैरे देशांमधून व्याख्यानासाठी निमंत्रणे येऊ लागली. ‘उपनिषदांचा जर्मन तत्त्वज्ञानावरील परिणाम’ या विषयावर प्रबंध लिहून व्हिएन्ना विद्यापीठाची पीएच.डी. मिळण्याचीही संधी होती. मात्र नाथ आपल्या अन्य कार्यामध्ये इतके गुंतले की हा प्रबंध ते पूर्ण करू शकले नाहीत.

      आंतरराष्ट्रीय समाजवादी युवक संघटना (युसी) च्या स्वीडनमध्ये भरलेल्या नवव्या अधिवेशनात ‘युसी’चे अध्यक्ष म्हणून नाथ पैंची निवड झाली. हा सन्मान मिळविणारे नाथ हे पहिले भारतीय होते. परदेशात असा अतुलनीय लौकिक लाभत असतानाही नाथ त्या लौकिकात गुंतले नाहीत. त्यांचे भारतातल्या राजकारणाकडे लक्ष होते. स्वातंत्र्यानंतरचा भ्रमनिरासाचा कालखंड सुरू झाला होता. स्वातंत्र्य मिळेल, लोकशाहीची प्रस्थापना होईल, जनतेचे प्रश्‍न सुटतील अशी आशा स्वातंत्र्यापूर्वी लोक बाळगून होते. ही आशा फलद्रूप होण्याची चिन्हे तर दिसत नव्हती. सरकारवर अंकुश ठेवणे आवश्‍यक होते. त्यासाठी नाथ भारतात परत आले.

*****

      एका सत्कार-समारंभानंतर रावसाहेब पटवर्धन नाथ पैंना म्हणाले, “हे पाहा नाथ, मी काही गोखले आणि तुम्ही काही गांधी नाही. पण गोखले यांनी गांधींना जे सांगितलं ते मी सांगू इच्छितो. तुम्ही बराच काळ राजकारणापासून, भारतापासून दूर राहिला आहात. आता साऱ्या देशभर जा. पाहा. अनुभव घ्या. सारे नीट समजावून घ्या, आणि नंतरच काय करायचे ते ठरवा.” रावसाहेबांचा वडीलकीचा सल्ला नाथांनी शिरोधार्य मानला. कर्नाटकातील वयोवृद्ध नेते गंगाधरराव देशपांडे यांचाही आशीर्वाद नाथ पैंना लाभला.

      भारतात परतल्यानंतर तीन प्रश्‍नांमध्ये नाथ पैंना विशेष लक्ष घालावे लागले. पहिला होता गोवामुक्तीचा प्रश्‍न. त्यातील सत्याग्रही लढ्याचे नेतृत्व तर नाथांनी केलेच, पण आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर हा मुद्दा उपस्थित करण्यातही ते यशस्वी झाले. गोवामुक्तीच्या संदर्भात जणु ते भारताचे परदेशांमधले अनधिकृत राजदूत ठरले. भाषिक राज्यांच्या निर्मितीचे धोरण जाहीर झाल्यानंतरही अन्याय होत राहिला तो मराठीवर आणि महाराष्ट्रावर. मराठी भाषिकांचा मुंबई, विदर्भ, मराठवाडा यांसहितचा संयुक्त महाराष्ट्र निर्माण होणे आवश्‍यक होते. केवळ तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजीभाई देसार्ईंच्या हट्टाग्रहामुळे या राज्याच्या निर्मितीची घोषणा होत नव्हती. त्यासाठीचे आंदोलन हा दुसरा प्रश्‍न. आणि तिसरा, अजूनही अनुत्तरित राहिलेला प्रश्‍न म्हणजे दुसऱ्या प्रश्‍नाचाच भाग होता. बेळगाव, निपाणी आणि कारवार हा सीमावर्ती प्रदेश मराठीबहुल असल्यामुळे तो संयुक्त महाराष्ट्राला जोडला जाणे आवश्‍यक होते. हा भाग कन्नडबहुल असल्याचा आभास पद्धतशीर व्यूहरचना करून कन्नडसमर्थकांनी निर्माण केला होता. नाथ पै याही प्रश्‍नाच्या सोडवणुकीत गुंतले.

      याच दरम्याने आणखी एक आव्हान समोर आले. 1957 ची लोकसभेची निवडणूक जाहीर झाली. 1952 च्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत दक्षिण रत्नागिरी मतदारसंघातून काँग्रेसतर्फे मोरोपंत जोशी खासदार म्हणून निवडून आले होते. 1957 ची दुसरी निवडणूक तेच जिंकतील असे अनेकांना वाटत होते. त्यांच्याविरुद्ध निवडणूक जिंकणे नाथांना अवघड जाईल, असे खुद्द रावसाहेब पटवर्धनांनाही वाटत होते. परंतु नाथ पैंनी निवडणूक लढविण्याचा निश्‍चय केला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमुळे लोकमत काँग्रेसला अनुकूल नव्हते. नाथ पैंचे तरुण वय, उमदे व्यक्तिमत्त्व आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे वक्तृत्व ही त्यांची जमेची बाजू होती. मालवणी बोली ही या मतदारसंघाची प्रादेशिक बोली. या बोलीत नाथ मतदारांशी संवाद साधीत. बोलण्यात अकृत्रिम जिव्हाळा असे. अशा अनेक गुणांच्या प्रभावामुळे मोठ्या मताधिक्याने नाथ पै खासदार म्हणून निवडून आले. संसदीय लोकशाहीच्या गर्भगृहात – भारतीय संसदेत – त्यांनी सदस्य म्हणून प्रवेश केला.

*****

      संसदीय कामकाजातील नाथ पैंची उद्दिष्टे स्पष्ट होती. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करणे, फाझलअल्ली कमिशनने बेळगाव-निपाणी हा सीमाभाग कर्नाटकात (त्या वेळच्या म्हैसूर राज्यात) समाविष्ट केला होता, तो महाराष्ट्राला जोडणे, ज्या कोकणचे प्रतिनिधित्व ते संसदेत करीत होते, त्या कोकणला पायाभूत सुविधा मिळवून देणे आणि लोकशाही संकेत दृढमूल करणे ही ती उद्दिष्टे होती.

      लोकसभेतील आपल्या पहिल्याच भाषणात नाथ पैंनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा प्रश्‍न उपस्थित केला. हे त्यांचे भाषण इतके आकर्षक होते की लोकसभेचे उपसभापती सरदार हुकूमसिंग भाषण संपल्यावर आपल्या आसनावरून उतरून खाली आले आणि त्यांनी नाथ पैंचे अभिनंदन केले. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि केंद्रीय मंत्री पंडित गोविंद वल्लभ पंत यांचेही लक्ष या भाषणाने वेधून घेतले. आजवर लोकसभेवर प्रा. हिरेन मुखर्जी यांच्या इंग्रजी वक्तृत्वाचाच ठसा होता. पण आता प्रा. हिरेन मुखर्जीपेक्षाही नाथ पैंचे वक्तृत्व सरस आहे, असा अभिप्राय जुनेजाणते लोकही व्यक्त करू लागले.

      पहिल्या अधिवेशनानंतर नाथ पै मतदारसंघात आले. आपल्या कामकाजाची लोकांना माहिती देऊ लागले. आपण लोकप्रतिनिधी आहोत, आपण ही माहिती दिली पाहिजे, याचे त्यांना भान होतेच; पण अशी माहिती लोकांनीही विचारली पाहिजे, तो त्यांचा हक्क आहे, असेही नाथ पैंचे म्हणणे होते. ही प्रथा लोकांसाठी अभिनव होती. आपला लोकप्रतिनिधी जागरूक आहे, आपणही तसे असले पाहिजे, याची जाण लोकांनाही आपोआप आली. लोक आपले प्रश्‍न घेऊन निर्भयपणे नाथ पैंकडे येऊ लागले.

      त्यावेळी कोकणात रेल्वे तर नव्हतीच, पण मुंबईला जोडणारा बऱ्या अवस्थेतला महामार्गही नव्हता. सावंतवाडी-मुंबई, वेंगुर्ले-मुंबई या एस्.टी.च्या गाड्या कोल्हापूर-पुणे मार्गे जात, हे आज कदाचित खरेही वाटणार नाही. बोटीची वाहतूक सामान्यजनांना परवडणारी होती. त्यासाठी बंदरांची देखभाल आणि बंदरसुधारणा आवश्‍यक होती. मुख्य बंदरांना जोडणारे रस्ते आवश्‍यक होते. मुंबई – गोवा महामार्ग होणे अगत्याचे होते. पोस्ट आणि तार खाते केंद्राच्या अखत्यारीत येते. अधिकाधिक पोस्ट व तार ऑफिसे व्हावीत म्हणून प्रयत्न करणे हे खासदारांचे कामच होते. नाथ पै सुजाण लोकप्रतिनिधी होते. त्यांनी मतदारसंघातील गरजांच्या प्राथमिकता निश्‍चित केल्या. कोणत्या प्रश्‍नासाठी कोणत्या अधिकाऱ्यांना भेटायचे, याचे क्रम ठरविले. कालबद्ध कार्यक्रमानुसार प्रश्‍नांची सोडवणूक होऊ लागली. आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा, याचा मापदंडच जणु ते निर्माण करीत होते.

      कामगार चळवळीचा अभ्यास नाथ पैंनी आपल्या विद्यार्थिदशेत युरोपमध्ये केलेला होता. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महासंघाचे नाथ पै अध्यक्ष झाले. महागाई भत्त्यात हंगामी वाढ मिळावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी होती. संप केल्याशिवाय मागण्या मान्य होणार नाहीत, असे वातावरण होते. नाथ पैंनी संपाचा प्रश्‍न लोकसभेत उपस्थित केला. लालबहादुर शास्त्री, गुलझारीलाल नंदा, टी. कृष्णम्माचारी या नेत्यांशी आणि पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंशी वाटाघाटी केल्या. पोस्टमनला पत्रांच्या ओझ्यासोबतच हालअपेष्टा, दैन्य, वैफल्य यांचा मोठा भार वाहावा लागतो याची जाणीव काव्यमय भाषेत पंडितजींना करून दिली. चर्चेचा उपयोग झाला. संप टळला. नाथ पैंच्या कार्यकौशल्यामुळेच हे घडू शकले.

      संयुक्त महाराष्ट्रासाठीचे आंदोलन तीव्र होत होते. सभा-समारंभांच्या वेळी या आंदोलनाचे पडसाद पंडित नेहरूंपर्यंत पोहोचत होते. महर्षी कर्वे यांनी ‘संयुक्त महाराष्ट्र निर्माण व्हावा, ही माझी शेवटची इच्छा आहे’ असे जाहीर केले, तेव्हा नाथांना हा महषींचा आशीर्वाद आहे असे वाटले. एका शतायुषी, कृतिशील समाजसुधारकाचा हा आशीर्वाद वाया जाणार नव्हता. या घटनेनंतर दोन वर्षांनी संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला.

      चीनचे युद्ध भारताच्या दाराशी येऊन ठेपले. येथेही केंद्र सरकारचा भाबडेपणा, गाफीलपणा देशाला नडला. याही संदर्भात नाथ पै केंद्राला सतत सूचना देत होते, परंतु त्या गांभीर्याने घेतल्या गेल्या नाहीत. पुढे युद्ध अटळ झाले.

*****

      राष्ट्र, राज्य आणि प्रदेश अशा तीनही पातळ्यांवर नाथ पैंना अनेक प्रश्‍न सोडवावे लागत. कोकण ही तर त्यांची जन्मभूमी. कोकणच्या विकासासाठी नाथ आणि त्यांच्या समविचारी मित्रांनी मुंबईमध्ये कोकण विकास परिषदेचे पहिले अधिवेशन घेण्याचे निश्‍चित केले. परिषदेच्या अध्यक्षपदी नाथ पै यांची निवड झाली. 21 फेब्रुवारी 1959 रोजी सुरू झालेल्या या अधिवेशनाचा प्रारंभ कवी मंगेश पाडगावकरांनी लिहिलेल्या गीताने झाला.

      ताठ मान अभिमान आमुचा सह्याद्रीचे उंच कडे

      हिरवे कोकण हे नंदनवन, इथे फुलांचे लाख सडे

        हे ते गीत. पन्नास वर्षांनंतरही कोकणचे अभिमानगीत म्हणून या गीताचा उल्लेख होतो. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे या अधिवेशनाचे उद्घाटक होते. नाथ पैंनी कोकणच्या ऐतिहासिक परंपरेचा आणि कोकणच्या देशासाठीच्या योगदानाचा आढावा आपल्या भाषणाच्या प्रारंभी घेतला. कोकणच्या विकासासाठीचा एक सूत्रबद्ध आराखडाच त्यांनी नंतर सादर केला. कोकणच्या विकासासाठी एक स्वतंत्र विकास मंडळ (डेव्हलपमेंट ॲथॉरिटी) स्थापन करावी, बोट वाहतूक चालू ठेवावी, कोयना प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेचा फायदा कोकणला व्हावा, काजू-धंद्याला चालना द्यावी, मच्छिमारी व त्यावर आधारित उद्योगांना साहाय्य मिळावे, अशा विविध सूचना नाथ पै यांनी केल्या.

      कोकण-रेल्वेची मागणी अनेक वर्षांपूर्वी अ. ब. वालावलकर यांनी इंग्रज सरकारकडे केलेली होती. या मागणीचा राजकीय पटलावर पाठपुरावा मात्र होत नव्हता. नाथ पै यांनी तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोकण रेल्वे पूर्ण व्हावी अशी मागणी या अधिवेशनात केली. डोंगरदऱ्यांनी भरलेल्या कोकणात रेल्वे येणार कशी? असा प्रश्‍न भले भले लोकही करीत होते. ‘एक स्वप्न’ अशीच संभावना या मागणीची झाली. परंतु स्वप्न जर द्रष्ट्या माणसाने पाहिलेले असेल, तर ते कधी ना कधी पूर्ण होतेच. ‘कोकण रेल्वे’ हे नाथ पैंचे स्वप्न होते. त्यांच्या जीवनकाळात दिवा ते आपटा हा कोकण रेल्वेचा प्रारंभिक अंश बांधलाही गेला. पुढे अनेक वर्षे ही रेल्वे काही पुढे सरकली नाही. सुमारे पंधरा वर्षांनी नाथ पैंचे सहकारी प्रा. मधु दंडवते रेल्वेमंत्री झाले आणि आपटा ते रोहा हा मार्ग पूर्ण झाला. दहा वर्षांनंतर अल्पकाळासाठी दंडवते अर्थमंत्री झाले आणि समाजवादी विचारांचे जॉर्ज फर्नाडिस रेल्वेमंत्री झाले त्यावेळी कोकण रेल्वेसाठी स्वतंत्र महामंडळ निर्माण होऊन कोकण रेल्वे पूर्ण झाली. 1996 मध्ये कोकण रेल्वे सावंतवाडीत दाखल झाली तेव्हा नाथ पैंच्या निधनाला पंचवीस वर्षे झाली होती. या द्रष्ट्या नेत्याचे स्वप्न पुढच्या पिढीने पूर्ण केले. कोकण रेल्वेच्या स्वागत-फलकांवर ‘स्वप्न नव्हे, सत्य’ असे वाक्य झळकले. हे स्वप्न अ. ब. वालावलकरांनंतर नाथ पैंनी जागविले होते आणि त्याला या कोकण विकास परिषदेच्या अधिवेशनात उद्गार लाभला होता.

      कोकण हा निसर्गसंपन्न प्रदेश. एका बाजूला, पूर्वेला सह्याद्रीची पर्वतरांग आणि दुसऱ्या बाजूला, पश्‍चिमेला, थोडाथोडका नव्हे, सातशेवीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा! निसर्गाचे हे श्रीमंत आणि भव्य रूप रोज पाहणारा कोकणी माणूस मात्र अर्धपोटी. दरिद्री. कोकणातल्या बुद्धिमंतांनाही कोकणाबाहेर पडल्याशिवाय विद्या-धन-सन्मान यांचा लाभ होत नव्हता. घराघरातला तरुण पुरुष पोटापाण्यासाठी मुंबईकडे धाव घेत होता. मंडणगड ते सावंतवाडीपर्यंत पसरलेला संपूर्ण रत्नागिरी जिल्हा मनिऑर्डरवर जगणारा जिल्हा म्हणून ओळखला जात होता. नाथ पैंना हे चित्र बदलायचे होते. कोकणी माणूसही कष्टाळू होता. दारिद्य्र दूर व्हावे, यासाठी प्रयत्नात होता. पण तो परिस्थितीपुढे हतबल होता. कोकण विकास परिषद घेऊन नाथ पैंनी कोकणी माणसाला बळ दिले. त्याचे मनोगत आपल्या भाषणात मांडले. जणु ते कोकणी माणसाच्या आकांताचा उद्गार बनले. कोकणची नियती बदलू शकते याचे संकेत नाथ पैंनी या अधिवेशनात दिले.

(बॅ. नाथ पै असाही एक लोकनेता-

डॉ. विद्याधर करंदीकर)

– क्रमशः

Leave a Reply

Close Menu