बॅ. नाथ पै यांचे जन्मशताब्दी वर्ष 25 सप्टेंबर 2021 पासून सुरु होत आहे. त्यानिमित्ताने विशेष लेखमाला….

      बॅ. नाथ पैंचे भाषण मी राजापूरच्या जवाहर चौकात ऐकले, तेव्हा मी पाचवीत शिकत होतो. त्या भाषणातले फारसे काही आठवत नाही. बहुधा ते निवडणुकीतले भाषण असावे. माझ्या वडिलांचे बोट पकडून मी सभेला गेलो होतो. एखाद्या सभेला एवढी मोठी गर्दी मी प्रथमच बघत होतो. चौक संपूर्ण भरला होता. जवळच्या नदीपात्रातही माणसेच माणसे होती. सगळे राजापूर जणु तेथे लोटले होते. गर्दीमुळे उडणारी धूळ, नदीकाठचा थंड वारा, या गर्दीत मी हरवणार तर नाही ना, असे वाटून जिवाची झालेली घालमेल मला अजून स्मरते. आणि आता जाणवते की त्या गर्दीत मी किंवा माझे काही हरवले तर नाहीच, पण काहीतरी अलौकिक मला सापडले होते. लोकसभा, लोकशाही, कोकणविकास असे काहीतरी नाथ पै बोलत होते आणि सगळी सभा जिवाचे कान करून ऐकत होती. त्यांच्या पक्षाचे चिन्ह झोपडी हे होते. हे मात्र लक्षात राहिले कारण कोण्या स्थानिक कलावंताने व्यासपीठाजवळ एक खरीखुरी झोपडी बनविली होती. झोपडी विरुद्ध बैलजोडी असा काहीतरी संघर्ष आहे, एवढे त्या वातावरणामुळे समजले होते. त्यातली झोपडी जिंकण्यात माझ्या वडिलांना स्वारस्य आहे, हे आम्हा भावंडांना जाणवले होते आणि झोपडी जिंकल्यावर घरात पसरलेली समाधानाची लहर संस्मरणीय होती.

      या घटनेनंतर नाथ पै हे माझ्यासाठी एक दंतकथा बनले. पन्नाशी ओलांडलेल्या माझ्या समवयस्कांना तसे नक्कीच जाणवत असणार. नाथ पैंचे निधन झाले, तेव्हा मी नववीत शिकत होतो. मधू दंडवते आणि ना. ग. गोरे यांच्या भाषणातून त्यांचे संदर्भ नेहमी येत. काहीतरी लोकविलक्षण असे गुण नाथ पैंमध्ये होते, याची पुनरावृत्ती होई. ‘लोकशाहीची आराधना’ मधली नाथ पैंची भाषणे नंतर वाचनात आली. ‘प्रकाशाचा पुत्र’ हे पु. ल. देशपांडे यांचे ‘साधना प्रकाशन’ने प्रसिद्ध केलेले पुस्तक हाती आले. ‘वेध-अंतर्वेध’ मधला नाथ पैं विषयीचा छोटा लेख वाचनात आला. ‘नाथ पै’ नावाची दंतकथा अधिक गडद, अधिक गहिरी झाली.

      नाथ पैंविषयी बोलणारी, त्यांचा सहवास लाभलेली काही मोजकी माणसे भेटली. त्यापैकी नाथ पैंच्या वैचारिक सहप्रवाशांनी त्यांच्याविषयी भरभरून बोलणे मला अपेक्षित होते, पण कट्टा-मालवण येथील डॉ. दादासाहेब वराडकरांनी राजकीय विरोधक असूनही, ऐन निवडणुकीच्या काळात, राधानगरीच्या जंगलभागातल्या रस्त्यावर त्यांची गाडी बिघडलेली बघून नाथ पैंनी तिच्या दुरुस्तीसाठी केलेल्या मदतीची कथा जेव्हा मला सांगितली, तेव्हा अत्यंत धन्य वाटले. आज राजकीय विरोधकाला केवळ संपवायचे असते, असे मानणारे लोक जेव्हा रोज टीव्हीवर झळकताना दिसतात, तेव्हा ही कथा आठवून टीव्हीचे बटन बंद करावे, असे प्रकर्षाने वाटते.

      इतिहासाच्या सामर्थ्य आणि मर्यादांच्या पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज ‘लोककल्याणकारी राजा’चे मिथक बनले. नाथ पै देखील लोकमंगलाची कामना करणाऱ्या लोकप्रतिनिधीचे मिथक बनले. ‘सौंदर्य-उपासना म्हणजे राजकारण’ ही त्यांची राजकारणाची व्याख्या होती. अन्याय हा कुरूप आहे म्हणून त्याविरुद्ध लढायला पाहिजे. दारिद्य्र कुरूप आहे म्हणून त्याविरुद्ध संघर्ष करायला पाहिजे, शोषण हे कुरूप, गलिच्छ आहे, म्हणून त्याविरुद्ध लढायला पाहिजे असे नाथ पैंनी मानले. ‘राजकारण हा सौंदर्याचा हव्यास आहे’ असे मानणारे नाथ पै मिधक बनण्याच्या उच्च पातळीपर्यंत पोहोचले, यात नवल ते कोणते?

      न त्वहं कामये राज्यं न स्वर्र्गं नापुनर्भवम्‌।

      कामये दुःखतप्तानां प्राणिनाम्‌ आर्तिनाशनम्‌॥

      हा नाथ पैंचा एक आवडता श्‍लोक होता. मला राज्य नको, स्वर्ग नको, अपुनर्भवम्‌ म्हणजे मोक्षही नको, दुःखसंतप्त जीवांचे दुःख नाहीसे करण्याचे सामर्थ्य तू मला दे, असे सुचविणारा हा श्‍लोक आहे. नाथ पैंचे अवघे शील, अवघे चारित्र्य या श्‍लोकात प्रतिबिंबित झालेले आहे.

      पु. ल. देशपांडे यांनी नाथ पैंना ‘दिवाभीतांच्या म्हणजे घुबडांच्या जगात जन्माला आलेला प्रकाशाचा पुत्र’ असे म्हटले होते. आमच्या आणि आमच्या नंतरच्या पिढ्यांचे दुर्दैव असे की दिवाभीत खूप चांगले, त्यानाही काही तरी न्यायनीती असते, असे वाटावे अशी मंडळी राजकारणात आणि आपल्या सभोवताली आहेत. अधिक वाईट असे की त्यांनाच आज प्रतिष्ठा आहे. या काळात नाथ पैं विषयी मुला-नातवंडांना काही सांगावे, तर ती विस्मित होऊन विचारतील की असे खासदार खरेच होते? सतत लोकांचा विचार करणारे? सौंदर्य-उपासना म्हणजे राजकारण असे मानणारे?

      आश्‍वासकवृत्तीने त्यांना सांगायला हवे की आज जरी ही दंतकथा वाटत असली, तरी फार वर्र्षांपूर्वी नाही, केवळ पन्नास वर्षांपूर्वी असा एक माणूस आपल्या भारतात, आपल्या महाराष्ट्रात आणि आपल्या कोकणात वावरत होता. त्याचे स्मरणही आपल्याला बळ देईल. अंधारातून प्रकाशाकडे नेईल. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ ही प्रार्थना सार्थ करील.

      विश्‍वास ठेवा की नाथ पै ही केवळ दंतकथा नव्हती. भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील ते एक चंदनगंधित आणि सोनेरी पान होते।

      रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ‘नररत्नांची खाण’ असे म्हणतात. नाथ पैंचा जन्म झाला तेव्हा त्या काळच्या मुंबई इलाख्यातला ‘रत्नागिरी’ हा दक्षिणोत्तर सव्वादोनशे किलोमीटर लांबीचा एकच एक मोठा जिल्हा होता. या जिल्ह्याच्या दक्षिणेकडील वेंगुर्ले या निसर्गरम्य ठिकाणी नाथ पैंचा जन्म 25 सप्टेंबर 1922 रोजी झाला.

      पंढरपूरच्या विठ्ठलाचा कृपाप्रसाद मानून या बालकाचे पाळण्यातील नाव ‘पंढरीनाथ’ असे ठेवण्यात आले. त्याचे लघुरूप ‘नाथ’ बनले आणि तेच प्रचलित झाले. नाथ पैंची आई तापीबाई आणि भावंडे त्यांना प्रेमाने ‘राजा’ म्हणून हाक मारीत. अनेक वर्षे कोकणी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजविणारे, अशा अर्थाने ते ‘कोकणचा राजा’ ठरले. याचे प्रसादचिन्हच तर त्यांच्या आईने त्यांच्यासाठी योजिलेल्या संबोधनात नसेल?

      नाथ पैंचे वडील बापू अनंतराव पै ज्या काळात शिक्षण दुर्लभ होते, अशा काळात पदवीधर (बी.ए.) झालेले होते. काही काळ त्यांनी पोस्टमास्तर म्हणून काम केले. वारंवार होणाऱ्या बदल्या त्रासदायक ठरू लागल्यामुळे त्यांनी या नोकरीचा राजीनामा दिला व ते वेंगुर्ले येथील ए.पी. मिशन हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करू लागले.

      नाथ पैंना पितृछत्र मात्र अगदी अल्पकाळ लाभले. नाथ केवळ आठ महिन्यांचे असताना त्यांच्या वडिलांचे हृदयविकाराने निधन झाले. संपूर्ण कुटुंबाला हा मोठाच धक्का होता. नाथच्या आईने कर्तव्यबुद्धीने सर्व भार स्वत:च्या खांद्यावर घेऊन मुलांचे पालनपोषण केले. त्यांच्यावर संस्कार केले आणि त्यांना जगाला सामोरे जाण्यासाठी सिद्ध केले.

      नाथ पैंना तीन भाऊ आणि तीन बहिणी होत्या. अनंत, श्‍याम आणि रामचंद्र हे तीन भाऊ आणि गंगाबाई, मंजुळा आणि चंद्रभागा अशा तीन बहिणी. याशिवाय नाथ पैंना इंदिरा (अक्का) नावाची सावत्र बहीण होती जिच्यावर त्यांचे विशेष प्रेम होते. नाथ पै यांचे आजोळ आडारी, ता. वेंगुर्ले येथे होते व हे आजोळचे आडारकर कुटुंब धनसंपन्न, विद्यापूजक आणि कलासक्त म्हणून विख्यात होते. कोकणच्या निसर्गाचे आणि कुटुंबियांचे संस्कार नाथ पै यांच्या जडणघडणीमागे होते.

      लहानपणी नाथना प्लेग या भयानक आजाराची लागण झाली. त्या काळी ‘प्लेग’ हे प्राणसंकट मानले जाई. आई आणि मोठे बंधू (अनंत तथा भाई) यांनी मन:पूर्वकतेने केलेल्या सेवा-शुश्रूषेमुळे नाथ या आजारातून वाचले. या आजारानंतर ते सर्वांचे अधिकच आवडते बनले.

      नाथ पैंचे प्राथमिक शिक्षण वेंगुर्ले येथे झाले. आपल्या वडिलांच्या पश्‍चात आपली आई कष्टपूर्वक आपल्याला वाढवीत आहे, याची जाण नाथ पैना बालपणापासूनच होती असे दिसते. आपला अभ्यास ते मन लावून करीत. गणितासारख्या अवघड वाटणाऱ्या विषयासाठी स्वतंत्रपणे वेळ देत. फायनलची, म्हणजे आजच्या सातव्या इयत्तेची परीक्षा त्यांनी मालवण केंद्रावर जाऊन दिली. त्या काळी हुशार विद्यार्थ्यांना एका वर्षात अधिक इयत्तांच्या परीक्षा देता येत असत. नाथ पैंनी फायनलनंतर रांगणेकर हायस्कूलमधून एका वर्षात तीन इयत्ता पूर्ण केल्या.

      बालपणीतील नाथ पैंनी जोपासलेल्या दोन छंदांविषयी लिहायला हवे. त्यातला पहिला छंद निसर्ग निरीक्षणाचा. वेंगुर्ले हे त्यांचे जन्मगाव अत्यंत निसर्गसुंदर आहे. तिथल्या किनाऱ्यांवरून नाथ तासन्तास समुद्राकडे पाहत बसत. उंचच उंच माड त्यांच्या कर्तृत्वाला आवाहन करीत. कोकणात नारळाच्या झाडाला ‘माड’ म्हणतात. महादंड, मोठे खोड असलेला वृक्ष, म्हणून तो माड. या माडाने जणु नाथ पैंच्या व्यक्तिमत्त्वाला ताठ कणा दिला. मान उंच करून आकाशाकडे पाहायला शिकविले. उंचावरून त्यांना मच्छिमारांची कौलारू घरे दिसत. मच्छिमारांचे कष्टांनी भरलेले आयुष्य दिसे. एकीकडे निसर्गाचे सुंदर आणि भव्य रूप तर दुसरीकडे काळीज कुरतडणारे दारिद्य्र अशी परस्परविरोधी दृश्‍ये नाथांनी बालपणीच पाहिली.

      त्याना बालपणी दुसरा छंद लागला तो बासरी वाजविण्याचा. तन्मय होऊन ते बासरी वाजवीत असत. मोठेपणी ‘एक कलासक्त राजकारणी’ अशी प्रसिद्धी नाथ पैंना लाभली. या कलासक्तीची पाळेमुळे त्यांच्या बालपणीच्या या छंदात आणि दशावतारी नाटकांनी केलेल्या संस्कारांमध्ये असतील का?

      माध्यमिक शिक्षणासाठी नाथ बेळगावला आले. त्यांच्या बंधूंनी बेळगावला दुकान उघडले होते. आर्थिक स्थैर्य आले होते. बेननस्मिथ या प्रख्यात मिशनरी शाळेत त्यांनी प्रवेश घेतला. या शाळेच्या नियमानुसार ‘बायबल’ चा अभ्यास अनिवार्य होता. या अभ्यासाचाही नाथना भावी आयुष्यात उपयोग झाला. शाळेत होणाऱ्या वादविवाद स्पर्धांमध्ये नाथ सहभागी होत. त्यांच्या अमोघ वक्तृत्वाचा पाया या शाळेत घातला गेला. शालेय वयातच नाथ इंग्रजी वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेत. इंग्रजी, मराठी आणि संस्कृत अवतरणे लक्षात ठेवून योग्य जागी वापरीत. या गुणाला ‘श्रुतयोजन’ असे म्हणतात आणि उत्तम वक्तृत्वाचा तो निकष मानला जातो.

      नाथ पैंचे दुसरे बंधू भाऊ पै सार्वजनिक कामांमध्ये रस घेत. व्यायामशाळा, सार्वजनिक गणेशोत्सव यांमध्ये पुढाकार घेत. त्यांच्याबरोबर काम करताना नाथ पैंना सार्वजनिक कार्याचे बाळकडू मिळाले. काळही नवी वळणे घेत होता. महात्मा गांधींचे नेतृत्व देशाने स्वीकारले होते. स्वातंत्र्याची ऊर्मी घराघरात आणि मनामनात पोहोचली होती. इंग्रजांविरुद्धचा असंतोष सार्वत्रिक होता. नाथ पै या काळात सुमारे अठरा वर्षांचे युवा-बृहस्पती होते. काळाचे निरीक्षण ते सजगपणाने करीत होते.

      1940 मध्ये नाथ मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि पुढच्या अभ्यासासाठी बेळगावच्या लिंगराज कॉलेजमध्ये दाखल झाले. या महाविद्यालयातून अनेक वक्तृत्व स्पर्धांची पारितोषिके त्यांनी मिळविली. नवी क्षितिजे त्यांना खुणावू लागली.

      इंटरमीजिएट परीक्षेसाठी त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. टिळक-आगरकरांचे हे महाविद्यालय, याचेही आकर्षण असू शकते. व्यक्तिमत्त्वविकासाच्या अनेक संधी नाथांना या महाविद्यालयातून मिळाल्या. गोखले करंडक वक्तृत्वस्पर्धेसाठी महाविद्यालयातर्फे नाथ पैंची निवड झाली. वक्तृत्वासाठीचे प्रथम पारितोषिक त्याना मिळालेच आणि गोखले करंडकही फर्ग्युसन कॉलेजला मिळाला. अलाहाबाद येथे होणाऱ्या उत्स्फूर्त इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिकही नाथांना मिळाले.

      स्वतंत्र होऊ पाहणाऱ्या भारतात संसदीय लोकशाही रुजावी, या हेतूने फर्ग्युसन कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे पार्लमेंट बनविले जाई. या पार्लमेंटमध्ये पुरवठामंत्री म्हणून नाथ पैंची निवड झाली होती. फर्ग्युसन कॉलेजमध्ये होत असलेले हे प्रयोग किती महत्त्वाचे होते, हे नंतरच्या काळाने सिद्धही केले. भारताचे तीन पंतप्रधान – इंदिरा गांधी, पी. व्ही. नरसिंहराव आणि विश्‍वनाथ प्रतापसिंह – फर्ग्युसन कॉलेजचे विद्यार्थी होते. ज्येष्ठ समाजवादी नेते ग. प्र. प्रधान हे या विद्यार्थी पार्लमेंटमध्ये पंतप्रधान होते!

      पुण्यातल्या वास्तव्यात नाथ पैंनी मॅझिनी, गॅरिबाल्डी, वीर सावरकर आणि भगतसिंगांची चरित्रे वाचली. फ्रान्स आणि अमेरिकेच्या स्वातंत्र्यलढ्यांचे इतिहास वाचले. दुसरे महायुद्ध सुरू झालेले होते. प्रारंभीच्या काळात तरी या युद्धात इंग्लंडची पीछेहाट होत होती. भारताच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने ही घटना अनुकूल होती. स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्याच्या हेतूने नाथ परीक्षा आणि अभ्यास दूर ठेवून बेळगावला आले.

      आपल्या या तरुण मुलाने आंदोलनात भाग घेण्यापूर्वी थोडा विचार करावा, असे त्यांच्या आईला वाटले. तिने तसे बोलूनही दाखवले. नाथ मात्र आईला तडफेने म्हणाले, “आई, तू माझी एकटीच आई नाहीस. मला अशा वीस कोटी आया आहेत आणि त्यांच्यासाठी मला स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला पाहिजे.“ एक मातृभक्त मुलगा जेव्हा या शब्दात आईला उत्तर देतो, तेव्हा त्याची स्वातंत्र्याची आस किती प्रबळ असेल याचा अंदाज आपल्याला करता येईल.

      नाथ पैंना आणि त्यांच्या मित्रांना क्रांतिमार्गाचे आकर्षण होते. सरकारी बँक लुटणे, बाँबचा कारखाना चालविणे, लष्कराच्या गवताच्या गंजी पेटविणे अशा अनेक प्रयत्नांमधून इंग्रजांची त्रेधातिरपीट हे मित्र उडवीत होते. काही प्रयत्न सफल होत, काही वाया जात. क्रांतिकारकांची धरपकड सुरू झाली आणि नाथ पकडले गेले.

      कारागृहाच्या कोठडीत नाथ पै अनन्वित छळाला सामोरे गेले. त्यांना अंधारकोठडीतही ठेवण्यात आले. अकरा महिने नाथ अंधारकोठडीत होते. रावसाहेब पटवर्धन याच वेळी तुरुंगात होते. एक बुद्धिमान, तरुण विद्यार्थी अंधारकोठडीत आहे, हे समजल्यावर रावसाहेबांनी विशेष प्रयत्न करून त्याना आपल्या सहवासात ठेवण्याची व्यवस्था करविली. रावसाहेबांच्या या सहृदय कृतीचा नाथ पैंच्या मनावर खोलवर परिणाम झाला. आता तुरुंगातही मराठी इंग्रजी-संस्कृत पुस्तकांचे वाचन सुरू झाले. तुरुंगाधिकाऱ्यांची संमती घेऊन खेळांचे सामनेही होऊ लागले.

      आई तुरुंगात नाथना भेटायला आली. नाथ पैंच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. आई नाथना म्हणाली, “तुझ्या डोळ्यात पाणी का? तुला वीस कोटी आया होत्या ना? तुला योग्य वाटलं तेच तू केलंस! आता त्याबद्दल वाईट का वाटून घेतोस?“ लक्षात घ्यायला हवे की ही शब्दांची परतफेड नव्हती. उलटवारही नव्हता. मातेने पुत्राला करून दिलेली ती कर्तव्याची जाणीव होती.

      पोलीस चौकी जाळण्याच्या खटल्यातून नाथ निर्दोष सुटले. आता ते सेवादलाच्या कामात रस घेऊ लागले. नवी आव्हाने, नवी आंदोलने जणु या तरुणाची वाट पाहत होती. नाथ या आंदोलनांना सन्मुख झाले.

      क्रांतिकार्यात सहभागी झाल्यामुळे अभ्यास मागे राहिला होता. सुमारे दोन वर्षे उशीरा, 1947 मध्ये, नाथ बी. ए. झाले. याच वर्षी भारत स्वतंत्र झाला. फाळणी होऊन देश स्वतंत्र झाल्यामुळे अनेकांच्या मनात नाराजी होती. तरीही सर्वांनी स्वातंत्र्याचे स्वागत केले. बेळगावच्या टिळक चौकात अनेक सेवादलस्वयंसेवकांसह नाथ पैनी राष्ट्रध्वजाला वंदन केले. पंधरा ऑगस्टच्या प्रारंभी, भर मध्यरात्री नाथ पैंनी एक छोटेसे भाषण केले. या भाषणात ते म्हणाले, “देश स्वतंत्र झाला. फार वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले. हुतात्म्यांच्या बलिदानाचे सार्थक झाले.

      पण स्वातंत्र्य हे साध्य नाही. ते साधन आहे. आता देश समृद्ध करण्यासाठी झटू या. किसान, कामगार, प्रजेचे राज्य निर्माण करू या. स्वातंत्र्य म्हणजे संयम. नवा भारत आपल्याला निर्माण करावयाचा आहे, त्यासाठी अधिक त्यागाची व बलिदानाची गरज आहे.“ आपल्या पुढच्या कार्याची दिशाच जणु या भाषणातून नाथांनी सूचित केली होती.

*****

(बॅ. नाथ पै असाही एक लोकनेता- डॉ. विद्याधर करंदीकर)

– क्रमशः

Leave a Reply

Close Menu