9 ऑक्टोबर पासून सिंधुदुर्ग विमानसेवा शुभारंभ

बहुप्रतिक्षित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी (परुळे, ता. वेंगुर्ला) विमानतळास अखेर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) प्रवासी वाहतुकीला परवानगी दिल्याने या विमानतळावरून प्रवासी विमानांचे उड्डाण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या शनिवारी दि. 9 ऑक्टोबर रोजी प्रवासी वाहतूक शुभारंभ करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील चिपी येथे आयआरबी सिंधुदुर्ग एअरपोर्ट प्रा.लि.कंपनीने सुमारे 800 कोटी रुपये खर्चुन विकसित केलेला हा पहिला ग्रीनफील्ड विमानतळ आहे. या विमानतळाचे आधी उद्घाटन झाले असले तरी या विमानतळावरून विमानांचे उड्डाण मात्र होऊ शकले नव्हते. केंद्रीय हवाई मंत्रालयाचे निकष आणि धावपट्टी बाबतीत आता पूर्तता झाल्याने प्रवासी वाहतूक परवाना देण्यात आला आहे. आयआरबी कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र म्हैसकर यांनी विमानतळ वाहतुकीस खुला होत असल्याने समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, दक्षिण कोकण क्षेत्रात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे. कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्र, दक्षिणेकडील राज्य, मुंबई व त्यानंतर देशातील अनेक विभाग हवाईमार्गे जोडले जावेत, असा या प्रकल्पाचा उद्देश आहे. या विमानतळावरून प्रवासी वाहतुकीशिवाय कार्गो वाहतुक व्हावी असे प्रयत्न राहतील. त्यामुळे कोकणच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल. स्थानिक लोकांसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार व इतर उद्योग व्यवसायांच्या मुबलक संधी उपलब्ध होतील. देशाच्या पश्‍चिम विभागाचे कार्गो केंद्र बनण्याची क्षमता या विमानतळामध्ये आहे. त्यासाठी भरपूर प्रमाणात जागा उपलब्ध आहे. तसेच भविष्यातील वाढत्या गरजेनुसार त्याची वाढ व्याप्ती वाढवता येईल असे त्यांनी म्हटले आहे.

      खासदार विनायक राऊत म्हणाले, सिंधुदुर्ग विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव दिले जावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ठेवली आहे. या विमानतळावरून रोज 72 प्रवासी वाहतूक क्षमतेचे एक विमान मुंबईवरून सिंधुदुर्ग चिपी येथे येईल व परत मुंबईला जाईल. तसेच या विमानतळावरून भविष्यात मासे आणि आंब्याची निर्यात व्हावी म्हणून देखील प्रयत्न आहेत. या विमानतळाच्या प्रवासी वाहतूक शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि सर्व सन्माननीय पाहुण्यांना प्रोटोकॉलनुसार निमंत्रित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमान प्रवासी वाढावे यासाठी जाहीर केलेल्या उडान योजनेमध्ये सिंधुदुर्ग व रत्नागिरी विमानतळांचा समावेश केला आहे. त्यासाठी तत्कालीन हवाई मंत्री सुरेश प्रभू यांनी प्रयत्न केले.

      विमान मुंबई ते सिंधुदुर्ग तिकीट दर 2550 रु. तर सिंधुदुर्ग ते मुंबई तिकीट दर 2621 रु. राहणार आहे. दर कायमस्वरुपी एकच रहाणार असल्याची चर्चा असताना मात्र एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी तिकीट दर बदलते रहाणार असल्याचे सांगितल्याने अजूनही दराबाबत अनभिज्ञता आहे. तसेच अन्य विमान कंपन्यांनी देखील या विमानतळावरून प्रवासी वाहतूक करण्याचे सर्वेक्षण केले आहे असे खासदार राऊत यांनी सांगितले.

Leave a Reply

Close Menu