असाही एक लोकनेता (भाग-5)

आठ भाषणे

      या विभागातील सर्व भाषणे एका विशिष्ट गतीने दहा मिनिटात पूर्ण व्हावीत अशा अपेक्षेने लिहिलेली आहेत.

      भाषण करणाऱ्या विद्यार्थ्याची बोलण्याची विवक्षित गती विचारात घेऊन संहितेत बदल करणे आवश्‍यक असते. पाहिजे तेव्हा बंद करता येणारे घड्याळ (स्टॉपवॉच) सरावाच्या वेळी वापरणे व त्यानुसार संहितेत बदल करणे श्रेयस्कर ठरेल.

बॅ. नाथ पै : एक विद्यार्थी

      अध्यक्ष महाशय, परीक्षक वर्ग आणि श्रोते हो.

      अनेक मोठमोठ्या व्यक्तींच्या बालपणाविषयी आपल्याला कुतूहल असतं. शिवाजी महाराज बालपणी काय करीत असतील, ज्यांना लहानपणी त्यांचे शिक्षक ‘सूर्याचं पिल्लू’ असं म्हणत, ते लोकमान्य टिळक शाळेत असताना कसे दिसत असतील, गांधीजी लहानपणी कसे असतील, अशा अनेक रूपांमध्ये हे कुतुहल जागं होत असतं. नाथ पैंच्या कार्याविषयी जेव्हा मला माहिती मिळाली, तेव्हा मी विद्यार्थी म्हणून ते कसे असतील, या विषयी विचार करू लागलो.

      पूर्वी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा सलग एकच एक मोठा रत्नागिरी जिल्हा होता. या जिल्ह्याला नररत्नांची खाण असं म्हणतात. त्या रत्नमालिकेत शोभून दिसेल असं नाथ पै हे एक नररत्न होतं. त्यांचा जन्म 25 सप्टेंबर 1922 रोजी वेंगुर्ला इथे झाला. त्यांच्या वडिलांचं नाव बापू अनंतराव पै आणि आईचं नाव तापीबाई. पांडुरंगाचा कृपाप्रसाद मानून नाथ पैचं पाळण्यातलं नाव ‘पंढरीनाथ’ असं ठेवण्यात आलं. परंतु त्याचं लघुरूप ‘नाथ’ हेच प्रचारात आलं आणि गाजलं. नाथांची आई आणि त्यांची भावंडं त्यांना ‘राजा’ म्हणत.

      नाथ पै उणे पुरे एक वर्षाचे असतील-नसतील आणि त्या अजाण वयात त्यांचं पितृछत्र हरपलं. त्यांच्या आईनं धीर धरून नाथना आणि त्यांच्या भावंडांना मोठं केलं. त्या काळात प्लेगची साथ येई. हा जीवघेणा आजार लहानपणीच नाथांना झाला. सर्वांच्या सेवाशुश्रूषेमुळे ते वाचले आणि घरच्यांचे अधिकच लाडके बनले.

      नाथ पैंचं प्राथमिक शिक्षण वेंगुर्ल्याला झालं. आपला अभ्यास ते मन लावून करीत. गुरुजींनी जर शिक्षा केली, तर ही शिक्षा आपल्या भल्यासाठीच केली आहे असं ते मानीत. एवढी समज त्यांना बालपणीच होती. सातवीची परीक्षा त्यांनी मालवण केंद्रावर जाऊन दिली आणि उत्तम यश मिळवलं.

      त्या काळी हुशार विद्यार्थ्यांना एका वर्षात अधिक इयत्तांचा अभ्यास करता येत असे. नाथांनी वेंगुर्ल्याच्या रांगणेकर हायस्कूलमधून एका वर्षात तीन इयत्ता पूर्ण केल्या. पुढच्या शिक्षणासाठीची सोय वेंगुर्ले इथं नव्हती, त्यामुळे ते नंतर बेळगावला गेले.

      बालपणीच्या या कोकणातल्या वास्तव्यामध्ये नाथ पैंनी कोकणचा निसर्ग डोळे भरून पाहिला. डोळ्यात साठवला. आकाशात उंच जाणाऱ्या महादंड माडांनी त्यांना ताठ मानेनं जगायला शिकवलं. समुद्राकडून त्यांनी गांभीर्य घेतलं. हिरव्या वनराजीकडून त्यांना कलासक्तीचं वरदान मिळालं. याच काळात त्यांनी कोकणातलं दारिद्य्रही पाहिलं. शिकेन, मोठा होईन आणि कोकणचं दारिद्य्र दूर करीन अशी महत्त्वाकांक्षा त्यांच्या मनात जागी झाली.

      ते निर्भय होते. मित्रांनी आव्हान दिलं तेव्हा त्यांनी पोहता येत नसतानाही थेट पाण्यात उडी घेतली आणि अनुभवानं पोहायला शिकले. अपयश चालेल, पण खोटेपणा करणार नाही, असं ब्रीद जपलं. संकटांना धैर्यानं सामोरे गेले. याच वयात ते बासरी वाजायला शिकले. ससे आणि खारी पाळण्याचा त्यांना छंद होता. मित्रांना योग्य सल्ला देणं, वेळी त्यांचं नेतृत्व करणं या गोष्टी ते मनापासून करीत. मित्रहो, यावरून आपल्या लक्षात येईल की नाथ पैंच्या अनेक सद्गुणांचा गौरव पुढच्या काळात झाला आणि या गौरवाची बीजं कोकणच्या लाल मातीकडून त्यांना लाभली होती.

      नाथ पैंचं पुढचं शिक्षण बेळगावच्या बेननस्मिथ हायस्कूल या प्रसिद्ध शाळेत झालं. नाथ पैंची स्मरणशक्ती जबरदस्त होती. इंग्रजी आणि संस्कृत या भाषांची गोडी त्यांना इथंच लागली. इंग्रजी वादविवाद स्पर्धांमध्ये ते भाग घेऊ लागले. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाची पायाभरणी या शाळेत झाली.

      स्वातंत्र्य चळवळीनं वातावरण भारलेलं होतं. नाथ पैंचे बंधू भाऊ पै व्यायामशाळा, सार्वजनिक गणेशोत्सव वगैरे विधायक कामांमध्ये रस घेत. नाथ पै विद्यार्थिदशेतच या कामाकडे ओढले गेले. स्वातंत्र्यासाठी त्यांचंही मन आतुर झालं. 1940 साली ते मॅट्रिक झाले आणि बेळगावच्या लिंगराज कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. अधिक मोठ्या व्यासपीठावरच्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये ते भाग घेऊ लागले. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षासाठी नाथ पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आले. इथे आल्यावर त्यांनी मानाच्या गोखले करंडक वक्तृत्वस्पर्धेत भाग घेतला आणि हा करंडक त्यांनी आपल्या कॉलेजला मिळवून दिला. अलाहाबादला होणाऱ्या उत्स्फूर्त इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचंही पहिलं पारितोषिक नाथांना मिळालं.

      फर्ग्युसन कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना संसदीय लोकशाहीचा परिचय व्हावा म्हणून विद्यार्थ्यांचं पार्लमेंट बनवलं जाई. या पार्लमेंटमध्ये एक मंत्रिमंडळ असे आणि नाथ या मंत्रिमंडळात पुरवठामंत्री होते. नाथ पैं मधला संसदपटू विद्यार्थिदशेतच विकसित होत होता.

      फर्ग्युसन कॉलेजमध्ये नाथ पैंनी खूप वाचलं. मॅझिनी, गॅरिबाल्डी यांची चरित्रं वाचली. फ्रान्सची राज्यक्रांती, अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास वाचला. भगतसिंग आणि सावरकरांची चरित्रं वाचली. सावरकरांच्या क्रांतिकार्याबद्दल नाथ पैंना नितांत आदर होता. स्वातंत्र्यासाठी आपणही काही तरी करायला हवं, याची तळमळ नाथ पैंना आता लागली.

      नाथ पै सरळ कॉलेज सोडून क्रांतिकार्यात सहभागी होण्यासाठी बेळगावला आले. भूमिगत झाले. अवघा वीस वर्षांचा आपला मुलगा करीत असलेलं धाडस बघून नाथांच्या आईनं त्यांना म्हटलं की “बाळा, तू अजून लहान आहेस, थोडा विचार करून वागत जा.” त्यावर नाथ पैंनी तडफेनं उत्तर दिलं, “आई, तू माझी एकटीच आई नाहीस. मला अशा वीस कोटी आया आहेत आणि त्यांच्यासाठी मला झगडलं पाहिजे.” विद्यार्थिदशेतच नाथ पैंची मातृत्वाची व्याख्या इतकी विशाल, इतकी व्यापक बनलेली होती.

      नाथ पैंच्या तुकडीनं या काळात क्रांतिकार्याचा एक भाग म्हणून लष्कराच्या गवताच्या गंजी पेटवल्या. नाथ पैंना अटक झाली. तुरुंगवासही घडला. या तुरुंगवासात अध्ययनाची एक नामी संधी त्यांना मिळाली. रावसाहेब पटवर्धन हे त्या काळचे ज्येष्ठ समाजवादी नेते. तुरुंगात नाथ पै त्यांच्या सहवासात राहिले. इंग्रजी, मराठी आणि संस्कृत पुस्तकांचं वाचन त्यांच्या सान्निध्यात घडलं. तुरुंगाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन कुस्ती आणि हुतुतूच्या स्पर्धाही नाथांनी घेतल्या. तुरुंगातली ही विद्यार्थिदशाही इतकी संपन्न, इतकी समृद्ध होती.

      काहीसे उशीरा, 1947 मध्ये नाथ पै बी.ए. झाले. त्यांच्या कुटुंबीयांची इच्छा त्यांनी ‘बॅरिस्टर’ व्हावं अशी होती. गांधीजी, नेहरू, जीना, सावरकर हे सारे बॅरिस्टर होते. नाथ पैंचे आदर्शच अशा उंचीचे होते. शिवाय त्यांना संसदीय लोकशाहीचा अभ्यास करायचा होता. त्यासाठी इंग्लंडची भूमी त्यांना साद घालत होती. या सादाला प्रतिसाद देऊन नाथ लंडनला आले. ‘लिंकन्स इन’ मध्ये कायद्याचा अभ्यास करू लागले. समविचारी मित्र त्यांना मिळाले. अशा तरुणांचा ‘इंडियन सोशलिस्ट ग्रुप’ स्थापन झाला. ही संस्था आंतरराष्ट्रीय समाजवादी युवक संघटनेशी संलग्न होती. विद्यार्थिदशेतच नाथ आंतरराष्ट्रीय चळवळीशी जोडले गेले.

      बॅरिस्टरीचा अभ्यास बाजूला राहून नाथ पै खरे तर एका वेगळ्या कामात गुंतत होते. तरीही, या संधीमुळे एक नवा अभ्यास त्यांच्याकडून घडला आणि तो होता ट्रेड युनियन चळवळीचा- कामगार चळवळीचा अभ्यास. या अभ्यासासाठी त्यांना ऑस्ट्रिया या देशाकडून शिष्यवृत्ती मिळाली. व्हिएन्ना या राजधानीच्या शहरात ते राहत होते. जगाची संगीत-राजधानी, म्युझिक कॅपिटल ऑफ द वर्ल्ड म्हणून हे शहर ओळखलं जातं. संगीतप्रेमी नाथ ना हे शहर खूप आवडलं. इथे ते जर्मन भाषाही शिकले. ऑस्ट्रियन वृत्तपत्रांमधून लेख लिहू लागले. जिथे जिथे जे जे काही शिकता येईल, ते ते नाथ शिकून घेत होते.

क्षणश: कणशश्‍चैव विद्यामर्थं च साधयेत्‌।

क्षणत्यागे कुतो विद्या, कणत्यागे कुतो धनम्‌॥

हे चांगल्या विद्यार्थ्याचं ब्रीद असतं. नाथ पै सतत या सुभाषितानुसार वागले.

      कायद्याचा अभ्यास बाजूला ठेवून 1952 मध्ये नाथ पै पक्षाच्या आदेशानुसार विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी भारतात आले. ही निवडणूक ते हरले, पण त्यातूनही त्यांचा राजकारणाचा अभ्यासच घडला. पुढच्या सर्व निवडणुका ते जिंकले आणि त्यासाठी हा अभ्यास उपयुक्त ठरला.

      1953 मध्ये नाथ पै बॅरिस्टर झाले. ही परीक्षाही ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. यानंतरही ‘उपनिषदांचा जर्मन तत्त्वज्ञानावरील परिणाम’ या विषयावर व्हिएन्ना विद्यापीठामधून पीएच्‌.डी. करण्याचा संकल्प नाथ पैंनी केला, परंतु अन्य कामांच्या व्यापात हा संकल्प पुरा होऊ शकला नाही. पुढे बेळगाव आंदोलनात नाथ पैंना साडेचार महिन्यांचा तुरुंगवास घडला तेव्हा नाथ पैंमधला विद्यार्थी पुन्हा एकदा सक्रिय झाला आणि ते उपनिषदांच्या अभ्यासात मग्न झाले.

      ‘खासदार’ म्हणून काम करीत असतानाही नाथ पैंचा संसदीय प्रथा-परंपरांचा अभ्यास सुरू असे. लोकसभेत कोणताही प्रश्‍न मांडण्यापूर्वी त्या प्रश्‍नाचा ते कसून अभ्यास करीत, आकडेवारी गोळा करीत, टिपणं काढीत, पूरक अवतरणांच्या नोंदी करीत. असं सांगतात की नाथ पै लोकसभेत बोलू लागले की खुद्द पंडित नेहरूही एकाग्रतेनं त्यांची भाषणं ऐकत.

      नाथ पैंच्या अभ्यासाविषयी सांगताना आणखी एक सांगायला हवं. नाथ पै खासदार झाले आणि त्यांनी आपल्या मतदारांच्या गरजांचा अभ्यास केला. त्यांच्या मनाचा अभ्यास केला. त्यांच्या समस्यांशी ते एकरूप झाले. हा अभ्यास तर कधी संपणाराच नव्हता. त्यांचा मृत्यू हा एका चिंतनशील अभ्यासकाचा मृत्यू होता.

      नाथ पैंच्या स्मृतींना मी वंदन करतो. एक अभ्यासक म्हणून, एक विद्यार्थी म्हणून नाथ पैंमध्ये जे गुण होते, त्यातला काही अंश तरी स्वत:मध्ये यावा, यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प करतो. तुम्ही माझं भाषण शांतपणानं ऐकलं, याबद्दल धन्यवाद देतो.

जय महाराष्ट्र! जय हिंद! जय जगत्‌!

(बॅ. नाथ पै असाही एक लोक नेता –

डॉ. विद्याधर करंदीकर)

– क्रमशः

Leave a Reply

Close Menu