खरंच अभ्यासक्रम हवाय?

गेले काही दिवस पालक वर्गामध्ये बरीच खळबळ माजली आहे हे सतत जाणवतं. पालकत्व मग ते कुणाचंही असो, साध्या कामगाराचं किंवा एखाद्या सेलिब्रेटीचं, तो एक अभ्यास असतो, ती एक सातत्यानं निभावायची जबाबदारी असते, ती प्रत्येक मुलासाठीची एक वेगळी जाणीव असते. पण आजकाल काहीतरी गडबड झालीय. हे पालकत्व निभावताना भल्याभल्यांचीही भंबेरी उडतेय. बरं, समाजमाध्यमे सतत बोटांवर असल्याने याचे अपडेटस्‌ पोहोचवणं हे कुणासाठीही कधीही साध्य होतं, त्यामुळे काय तर आगीत तेलाचं निमित्त.

      तर आजचा विषय आहे आग का लागते, ती वेळीच कशी विझवावी, खरंतर लागूच नये यासाठी काय करावं. मूल म्हटलं की प्रत्येक आईबापाच्या काळजाचा तुकडा! हे आपण सर्वजणच मान्य करतो. पण या काळजाच्या तुकड्याने काळीज घेऊन जाण्याची आणि तेव्हाही तो धडपडल्यावर लागलं का रे तुला? असं काळजीने विचारणाऱ्या आईच्या काळजाची गोष्ट काही आजची नाहीय. खूप जुनी आहे ती. पण आजकाल अशा काळजांची संख्या वाढतच निघालीय दिवसेंदिवस. त्यामुळे समस्यांची संख्या वाढती आहे हे खरं.

      कोणकोणत्या आहेत या समस्या?

* वागण्याला ताळतंत्र नसलेली मुलं

* व्यसनांच्या आहारी जाणारी मुलं

* काहीही न करणारी मुलं

* स्वयंकेंद्रित मुलं

* अभ्यासाचा अत्यंत कंटाळा असणारी मुलं

      ही जी सगळी निर्मिती आहे ती काही एका दिवसाची नाही. आईच्या गर्भाशयात बीजांड तयार झाल्यापासून ह्याची सुरुवात झालेली असते. तेव्हापासून आई काय पाहते, कशी वागते, तिच्या मनाची कशी अवस्था असते, तिचं खाणंपिणं, राहणं कसं आहे, तिचा नवरा आणि घरातील मंडळी तिच्याशी कसे वागत आहेत यावर अवलंबून असतं. म्हणजे मूल जन्माला यायच्या साधारणत: 280 दिवस आधी या सगळ्याला सुरुवात झालेली असते. जिजाई, सिंधुताई सपकाळ यांचं उदाहरण घ्यायचं झालं तर तेव्हाची स्थिती अत्यंत प्रतिकूल होती. याचा अर्थ स्त्रियांच्या कणखरतेसोबतच आजूबाजूचा सामाजिक प्रभावही मुलावर पडत असतो. पण आपण जागे होतो ते शाळेतून चिठ्ठी किंवा निरोप आल्यावर किंवा आपल्याला प्रत्यक्षपणे मुलामुलीच्या वागण्यातून कोणतातरी दणका बसल्यावर.

      दणका हा शब्द हेतूपूर्वक वापरलाय मी. कारण असे दणका बसलेले आणि त्यामुळे तोंडाला फेस आलेले अनेक पालक मी पाहिले आहेत. आज जेव्हा हा प्रश्‍न परत ऐरणीवर आला त्यावेळी पुन्हा एकदा त्या सगळ्या अनुभवांची उजळणी सुरू झाली मनातल्या मनात आणि त्यावेळी चुकलेल्या गोष्टी आणि काहीवेळा योजलेले, उपयोगी पडलेले तर काहीवेळा निष्फळ ठरलेले उपाय परत मनात येऊ लागले.

      पहिल्यांदाच आठवला तो रुद्राक्ष. रुद्राक्ष हा सहावीत शिकणारा, घरातला एकुलता एक मुलगा. सहावीच्या सहामाहीपर्यंत साधा सरळ असणारा हा मुलगा, सहामाहीनंतर एकदम बदलला. आगाऊ, उद्धट वगैरे वागायला लागला. कोणाला जुमानेसा झाला. पहिल्यांदा शाळेने प्राथमिक उपाययोजना केल्या पण व्यर्थ! शेवटी पालकांना शाळेत बोलावण्याचा निर्णय झाला. त्याप्रमाणे पालक आले. त्यांनी शाळेचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. योग्य तिथे सहमती दर्शविली. शिक्षकांशी सुयोग्य संवाद साधला आणि त्यातून तोडगे, त्यांची अंमलबजावणी यावर चर्चा केली. ही गोष्ट साधारणत: मार्चमधली. पुन्हा जूनमध्ये येताना रुद्राक्ष हा पूर्वीसारखाच साधा, सरळ, समंजस मुलगा होऊन परतला. यात विश्‍वास, निष्ठा आणि सातत्य यांचा खूप मोठ्ठा वाटा आहे. शाळेने रुद्राक्षच्या वागण्यातला बदल सांगितल्यावर पालकांनी अज्जिबात कशावरून आहे हे? माझ्याच मुलाच्या बाबतीत का असं बोलता? तुमचा काहीतरी गैरसमज होत असेल पहा बरं, बघू जमलं तर करू, असं सगळं करायचं आहे का, वेळ कुठेय आम्हाला, पैसा मिळवण्यातच सगळा वेळ आणि शक्ती खर्च होते, हे सारं कुठे करत बसू अशाप्रकारचे कोणतेही आढेवेढे घेतले नाहीत किंवा वर्गातल्या इतर कोणत्यातरी मुलाचं उदाहरण देत, आम्हाला सांगताय मग त्यालाही सांगा की, तो असंतसं करतो तरी तुम्ही काहीही बोलत नाही असा प्रतिवादही केला नाही. हे सगळं इथे लिहितेय कारण पालकांना शाळेत बोलावल्यावर हे सगळं अनेकदा घडत असतं.

      आपल्या मुलांचे लाड करणं म्हणजे त्यांना अतिसंरक्षित करणं असा एक अत्यंत चुकीचा समज गेली काही वर्षं समाजात पसरलेला दिसतो. अतिसंरक्षित मग ते शारीरिक, मानसिक, आर्थिक सगळ्याच दृष्टीने केलं जातं. त्याला कधीच कोणतीही तोशीस पडताच कामा नये यासाठी पालक म्हणून बाळाच्या जन्मापासून पंचवीस सेकंद ते पंचवीस वर्षांपर्यंत पालक सतत सजग असतात. त्यामुळे ‘कमतरता’ हा शब्दच माहीत नसल्याने ‘रिकामं मन सैतानाचं घर’ या न्यायानं मुलांना नको त्या गोष्टी सुचू शकतात. गरज ही शोधाची जननी आहे वगैरे वाक्य आपणच लिहायची आणि मुलांना कधीच कोणतीही गरज पडू नये याची पराकोटीची काळजी घेत त्यांना कोणताच शोध घेण्यापासून परावृत्त करायचं. त्यातून त्या मुलांकडे असलेली शक्ती वाया जाते, त्यांच्या पंखांत बळ येत नाही, ती आहेत तिथेच घुटमळत राहतात. मुलांना काही गोष्टीं स्वत: करू द्या, काही निर्णय स्वत: घेऊ द्या मग त्यांना जी महत्त्वाची शक्ती येईल ती to choose between what is easy and what is right. ही त्यांची आयुष्यभराची पुंजी आहे. आज ज्या गोष्टीमुळे पालकत्वाचा हा विषय परत ऐरणीवर आलाय त्याचं हेच कारण आहे मुलांना सहज कोणते आणि योग्य कोणते ते लक्षात येत नाही आणि ते साहजिकच सहजतेच्या वाटेकडे वळतात आणि फसतात.

      आजकाल सतत एका वाक्याचा मारा सारीकडे पहायला मिळतो तो म्हणजे, ‘आपण आपलं जीवन सतत एन्जॉय करायचं, जग आपल्याबाबत काय म्हणतं याला महत्त्व देण्याची गरज नाही.’ आनंदी जीवनाचा फंडा म्हणून सतत आणि सहज हे वाक्य आपल्याभोवती चकरा मारत असतं पण दुसरीकडे मानसशास्त्र असं सांगतं की वयाच्या पंचविसाव्या वर्षांपर्यंत मुलांचा मेंदू विकसनशील अवस्थेत असतो. त्या वयाच्या मुलांना खरंच असं सांगणं योग्य आहे का? बरं, हे इतर म्हणजे कोण तर मी सोडून सगळे. आजकाल आईवडिलांबरोबर राहणंही एकत्र कुटुंबात राहणं मानलं जातं या पार्श्‍वभूमीवर सतत तुम्ही तुमच्या मर्जीने वागा, लोक काय म्हणतात याकडे दुर्लक्ष करा असं सांगणं किती योग्य आहे बरं? कारण लोक नेहमी आपल्या वाईट बाजूंवरच बोलत नसतात ते आपल्याला न समजलेल्या आपल्या चांगल्या बाजूंवरही बोलतात. ते सगळं तुम्ही व्यवस्थित ऐकून त्यावर योग्य विचार करा हे शिकवणं जास्त संयुक्तिक ठरेल, नाही का?

      माझ्या सासूबाई नेहमी आमचा कौंटुंबिक इतिहास सांगायच्या. पहिल्यांदा मला वाटायचं की कशाला हवंय हे सारं? पण बोलता बोलता एकदा त्या म्हणाल्या “आपलं मूल आपल्या सासरमाहेरचे गुणदोष घेऊन येत असतं सोबत. त्याला उत्तम रितीने वाढवायचं तर हे सगळं माहिती हवंच.” अजूनही ते पदोपदी पटतंच. दुसरं वाक्य नेहमी आठवतं ते माझ्या वडिलांचं, ते म्हणायचे “अर्जुनाला गीता सांगणारा कृष्णही पालकत्वात गाफील राहिला तर तुमची आमची काय कथा!”

      हे सगळं आठवलं कारण हल्लीच एक नवपालक मला भेटत म्हणाली, “मॅडम पालकत्वाच्या अभ्यासासाठीचे काही मुद्दे सांगा बरं. नोटडाऊन करून घेते.”

– मेघना जोशी, मालवण, 9422967825

Leave a Reply

Close Menu