दिनेश पांगम यांच्या ‘कमविण्यास शिका’ पुस्तकाचे प्रकाशन

शेअर मार्केट गुंतवणुकीच्या क्षेत्रात मराठी तरुणांनी उतरुन अगदी कॉलेज जीवनापासूनच याची माहिती करून घेणं आणि यशस्वी उद्योजक, गुंतवणुकदार यासोबत आपलं भावी आयुष्य सुरक्षित करावं हाच कै. दिनेश पांगम यांच्या लिखाणाचा मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन मुंबईतील उद्योजक विनीत शिरसाट यांनी ‘कमविण्यास शिका’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी केले.

      कळसुलकर इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघ आयोजित आणि सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने दिनेश पांगम यांच्या कमविण्यास शिका या अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन प्रख्यात अनुवादक वंदना करंबेळकर यांच्या हस्ते 19 ऑक्टोबर रोजी कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या परुळकर सभागृहात झाले. यावेळी शिरसाट बोलत होते. स्टेट बँकेचे निवृत्त अधिकारी प्रफुल्ल सांगोडकर, माजी शिक्षिका पद्मा फातर्पेकर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष द. म. गोठस्कर, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पै, सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर, पुस्तकाचे मुद्रक किरात ट्रस्टच्या सीमा मराठे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होत्या. शिरसाट म्हणाले की, लर्न टू अर्न या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद करण्यास मी पांगम यांना सुचविले. त्यांनी ध्यास घेऊन लॉकडाऊन काळात पुस्तकाचे भाषांतर पूर्ण केले. परंतु 24 ऑक्टोबर 2020 ला वयाच्या 84 व्या वर्षी ते आपल्यातून गेले. शेअर बाजार, शेअर ट्रेडिंग या क्षेत्रात मराठी तरुण अत्यल्प दिसतात, ही संधी मराठी तरुणांनाही मिळावी यासाठी हे पुस्तक दिशादर्शक ठरेल. त्यांच्या पश्‍चात पत्नी व मुलांनी हे पुस्तक प्रकाशित केले. मराठी तरुणांपर्यंत हे पुस्तक जास्तीत जास्त पोहोचून त्यांनी शेअर मार्केटच्या दिशेने पावले टाकल्यास निश्‍चितच ही त्यांना आदरांजली ठरेल, असे मत व्यक्त केले.

      वंदना करंबेळकर यांनी पांगम काकांची सावंतवाडीशी असलेली नाळ आणि त्यांनी इथल्या परिसराच्या विकासासाठी त्यांनी केलेले काम, आपल्या निरामय संस्थेच्या कार्यासाठी दिलेले प्रोत्साहन या आठवणी सांगत त्यांनी भाषांतरित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यास मिळणे हा बहुमान असल्याचे त्यांनी सांगितले.

      प्रफुल्ल सांगोडकर म्हणाले की, कुठल्याही क्षेत्रात उतरताना कोणीच, कधीच तज्ज्ञ नसतो. परिपूर्ण नसतो. शेअर मार्केट हे असे क्षेत्र आहे की सांगोपांगीपेक्षा स्वतःला येणारा अनुभव, निरीक्षण, संयम आणि स्वतःचे मत असणे हा मुलभूत पाया आहे. यासाठी त्याचा इतिहास जाणून घेणे महत्त्वाचे आहे. पांगम यांनी या पुस्तकात शेअर मार्केट संबंधीचा इतिहास अतिशय रंजक आणि सोप्या स्वरुपात भाषांतरित करुन अनेक उदाहरणं देत सांगून प्रत्यक्ष शेअर मार्केटमध्ये होणाऱ्या चढउतारांचा आलेख दिला आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब अधिक गरीब या मूळ संकल्पनेलाच हे पुस्तक छेद देते आणि वास्तवाकडे डोळस नजरेने पहायला सांगते.

      फातर्पेकर यांनी पांगम काकांच्या आठवणींना उजाळा देत दिनेश पांगम यांच्या पत्नीने इंग्लंडमधून पाठविलेल्या मनोगताचे वाचन केले. श्री. गोठस्कर यांनी सूत्रसंचालन केले. माजी विद्यार्थी संघाचे ओंकार तुळसूलकर यांनी उपस्थितांचा परिचय करुन दिला. डॉ. प्रसाद नार्वेकर यांनी डॉ. त्र्यंबक लेले यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन केले. माजी अध्यक्ष राजन पोकळे, पंचम खेमराजच्या प्रा. निलीमा धुरी, प्रा. केदार म्हसकर, प्रा. एन.डी.कार्वेकर, प्रा. अरुण पणदूरकर, ॲड. दीपक नेवगी, रमेश बोंद्रे, बाळ बोर्डेकर, मधुकर घारपुरे आदी उपस्थित होते. यावेळी विविध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पुस्तकाच्या प्रती विनामूल्य वितरीत करण्यात आल्या.

Leave a Reply

Close Menu