पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते किरात दिवाळी अंकाचे प्रकाशन

      प्रतिथयश साहित्यिकांसोबत नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या किरात साप्ताहिकचा दिवाळी विशेष अंक 2021 पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते पिंगुळी-गुढीपूर येथील त्यांच्या निवासस्थानी प्रकाशित करण्यात आला. यावेळी संपादक सीमा मराठे, चित्रकथीचे आकर्षक मुखपृष्ठ आपल्या कुंचल्यातून साकारणारे चित्रकार प्रा. सुनील नांदोस्कर, किरातचे विश्‍वस्त तथा नगरसेवक प्रशांत आपटे, शशांक मराठे, केदार आपटे उपस्थित होते.
पोटाची भ्रांत आणि सामाजिक अवहेलना सोसून द्विधा मनस्थितीत परशुराम गंगावणे आणि ठाकर समाजाने चित्रकथी ही पारंपरिक लोककला जपली आहे. 1960 पासून ठाकर समाजाच्या सर्वच कलांना उतरती कळा लागली. मासेमारी, मोलमजूरी अशी कामे करुन उदरनिर्वाह चालविणे क्रमप्राप्त झाले. अशा संघर्षमय परिस्थितीत आपली कला ही संवर्धन झाली पाहिजे या भावनेने श्री. गंगावणे यांनी सातत्याने प्रयत्न केले. आज या चित्रकथीला पद्मश्री देत शासनानेही त्याची दखल घेतली. या लोककलांना नवसंजीवनी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. कला ही माणसाला कशासाठी जगावे याचे भान देते, असे मत परशुराम गंगावणे यांनी व्यक्त केले. शताब्दी वर्षात पदार्पण करणाऱ्या किरातविषयी गौरवोद्गार काढत प्रसिद्धी माध्यमांचे आभार मानले. चित्रकार सुनील नांदोस्कर यांनी गंगावणे कुटुंबियांचे ही लोककला जगविण्यात मोठे योगदान असल्याचे सांगत किरात दिवाळी अंक मुखपृष्ठाच्या माध्यमातून परशुराम गंगावणे यांना मानवंदना देत असल्याचे सांगितले. प्रशांत आपटे यांनी गंगावणे यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शशांक मराठे यांनी स्वागत केले, सीमा मराठे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Close Menu