असाही एक लोकनेता (भाग-6)

आठ भाषणे

      या विभागातील सर्व भाषणे एका विशिष्ट गतीने दहा मिनिटात पूर्ण व्हावीत अशा अपेक्षेने लिहिलेली आहेत.

      भाषण करणाऱ्या विद्यार्थ्याची बोलण्याची विवक्षित गती विचारात घेऊन संहितेत बदल करणे आवश्‍यक असते. पाहिजे तेव्हा बंद करता येणारे घड्याळ (स्टॉपवॉच) सरावाच्या वेळी वापरणे व त्यानुसार संहितेत बदल करणे श्रेयस्कर ठरेल.

  1. बॅ. नाथ पै : वक्ता दशसहस्रेषु

   अध्यक्ष महाशय, परीक्षक वर्ग आणि श्रोते हो,

शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पण्डितः।

वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वा न वा ॥

      संस्कृतमधलं हे प्रसिद्ध सुभाषित. शंभरामध्ये एखादा शूर असतो, हजारांमध्ये एखादाच विद्वान असतो, दहा हजारांमध्ये एखादाच उत्तम वक्ता असतो आणि दाता तर असतो वा नसतोच, असं सागणारं हे सुभाषित मुळात दात्याच्या प्रशंसेचं, दानप्रशंसेचं आहे. पण ते वक्त्याचीही महत्ता अधोरेखित करणारं आहे. चांगला वक्ता दहा हजारात एखादा, अत्यंत दुर्मिळ असतो, असं हे सुभाषित सुचवतं. नाथ पै असे उच्च श्रेणीचे वक्ते मानले जात.

      लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनातली नाथ पैंची काही भाषणं होतात न होतात तोवर नवभारत टाइम्सच्या दिल्ली आवृत्तीनं त्यांच्या वक्तृत्वाची दखल घेत म्हटलं, “ते बोलू लागले म्हणजे संगीताच्या ध्वनिलहरीच उमटत असल्याचा भास होतो. त्यांच्या मताशी एरवी सहमत नसलेले लोकही प्रभावित होतात. लोकसभा अधिवेशनात ते जेव्हा जेव्हा बोलले तेव्हा तेव्हा भारतीय लोकसभा मंत्रमुग्ध झाली. नाथ पैंच्या वक्तृत्वाविषयी ज्येष्ठ समीक्षक ईश्‍वरदत्त यांनी म्हटलं की केवळ वक्तृत्वाच्या बाबतीत बोलायचं तर नाथ पैंच्या तोडीचं वक्तृत्व प्रजासमाजवादी पक्षातच काय पण प्रा. हिरेन मुखर्जी यांचा अपवाद सोडला, तर लोकसभेतही आढळणं कठीण आहे! मित्रहो लक्षात घ्या, की हा गौरव जेव्हा नाथ पैं ना लाभला, तेव्हा ते अवघे पस्तीस वर्षांचे होते! कसं घडलं असेल हे सगळं ?

      नाथ पैंचा जन्म कोकणातला. कोकणच्या निसर्गानं त्यांच्यावर संस्कार केले. कल्पवृक्ष माडानं त्यांना ताठ मानेनं जगायला शिकवलं. समुद्राची गाज त्यांनी सतत ऐकली. त्याचं गांभीर्य त्यांच्या स्वरात आलं. कोकणच्या लोककलेतले, दशावतारातले उत्स्फूर्त, हजरजबाबी संवाद त्यांनी मनात साठवले. त्यातली उत्स्फूर्तता जपली. हे संस्कार घेऊन नाथ पुढच्या शिक्षणासाठी बेळगावला आले. बेळगावच्या बेननस्मिथ इंग्लिश स्कूलमध्ये दाखल झाले.

      ‘बेननस्मिथ’ मध्ये त्यांना इंग्रजी आणि संस्कृत या दोन्ही भाषांमध्ये रुची निर्माण झाली. या शाळेत मुलांचे इंग्रजीतून वादविवाद होत. बोलताना मुलांच्या चुका होत, पण त्या समजावून दिल्या जात. चर्चेचा समारोप कसा करायचा, ते शिकवलं जाई. संस्कृत हा आवडीचा विषय असल्यामुळे नाथ अनेक सुभाषितांची अवतरणं देत. वक्तृत्वाचं जे मंदिर नाथ पैंनी बांधलं, त्याचा पायाच असा भक्कम आणि सुघटित होता.

      मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर एका वर्षासाठी नाथ पैंनी बेळगावच्याच लिंगराज कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. आता त्यांचं क्षितिज विस्तारलं. महाविद्यालयीन पातळीवरच्या वक्तृत्व स्पर्धांची पारितोषिकं त्यांना मिळाली, आत्मविश्‍वास दुणावला.

      शिक्षणासाठी नाथ यानंतर अधिक मोठ्या अवकाशात, पुण्यात आले. त्यातही, फर्ग्युसन कॉलेजसारख्या नामवंत कॉलेजमध्ये दाखल झाले. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा म्हणून इथे अनेक उपक्रम चालत. हुशार विद्यार्थीही खूप आणि त्यामुळे स्पर्धाही तीव्र होती. ‘या पुणेकर बृहस्पतींमध्ये तुझा कुठे निभाव लागणार?’ असंही कोणी कोणी नाथांना म्हटलं. पण जेव्हा सरावाची स्पर्धा, टेस्ट-डिबेट झाली तेव्हा सारं चित्र पालटलं. नाथ पैंचं भाषण संपल्यावर त्या मंत्रभारल्या वातावरणातून बाहेर पडण्यासाठी श्रोत्यांना काही क्षण थांबावं लागलं.

      यानंतर नाथ पैंनी मागे वळून पाहिलं नाही. मानाची गोखले करंडक स्पर्धा त्यांनी जिंकली. अलाहाबादची आंतरमहाविद्यालयीन इंग्रजी उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा जिंकली. फर्ग्युसन कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे पार्लमेंट असे. मंत्रिमंडळही असे. त्यात नाथ पुरवठामंत्री झाले. वक्तृत्वाला अत्यंत आवश्‍यक असं वाचन नाथ पैंनी भरपूर केलं. मुख्य म्हणजे चरित्रं वाचली. मॅझिनी, गॅरिबाल्डी, भगतसिंग इत्यादींची ही चरित्रं होती. सावरकरांच्या चरित्राचाही खूप परिणाम त्यांच्यावर झाला.

      फर्ग्युसनमधलं शिक्षण काही काळ मध्येच सोडून नाथ पैंनी स्वातंत्र्ययुद्धात भाग घेतला. भूमिगत झाले. अटक झाली. तुरुंगातही नाथ पै राजबंद्यांचे अभ्यासवर्ग घेत. आपल्या स्वातंत्र्यचळवळीची कारणपरंपरा त्यांना सांगत. अन्य देशांच्या स्वातंत्र्यचळवळींचा इतिहास सांगत. नाथ पैंचं वक्तृत्व कसं घडत होतं हे जाणून घ्यायचं तर त्यांचे मित्र वासू देशपांडे यांनी लिहिलेल्या ‘लोकशाहीचा कैवारी’ या पुस्तकातला एक वेगळा तपशीलही बघायला हवा. हे नाथ पैंचं चरित्र आहे. वासू देशपांडे यांनी लिहिलं आहे की या तुरुंगवासात नाथ पै रात्रीच्या वेळी ज्ञानेश्‍वरीवर सुरेख प्रवचनं करीत. संस्कृत श्‍लोकांचा, सुभाषितांचा ते प्रवचनांमध्ये उपयोग करीत. त्या काळाच्या संदर्भात ज्ञानेश्‍वरीतल्या ओव्यांचा ते अर्थ लावीत. या प्रवचनांचा रसाळ गुण त्यांच्या एकूणच वक्तृत्वात झिरपत गेला.

      स्वातंत्र्य प्राप्तीनंतर, 1947 मध्ये नाथ बी. ए. झाले आणि कायद्याच्या अभ्यासासाठी, बॅरिस्टर होण्यासाठी, इंग्लंडमध्ये गेले. संसदीय लोकशाहीचा अभ्यास त्यांनी तिथे केला. उत्तमोत्तम इंग्रजी भाषणं त्यांनी ऐकली. अभ्यासली. ऑस्ट्रियामधली एक शिष्यवृत्ती त्यांना मिळाली आणि कामगार चळवळीच्या अभ्यासासाठी ते व्हिएन्नाला गेले. तिथे जर्मन भाषा शिकले. कामगार समस्यांवरची भाषणं त्यांनी ऐकली आणि स्वत:ही केली. म्हणजे एकीकडे उच्चभ्रू पार्लमेंटमधली आणि दुसरीकडे पददलितांची चौररस्त्यावरची अशी विविधांगी भाषणं नाथ पैंना घडवीत होती.

  ‘बॅरिस्टर’ होऊन नाथ भारतात आले आणि रावसाहेब पटवर्धनांच्या सूचनेवरून त्यांनी देशातल्या समस्यांचं अवलोकन केलं. आता नाथ पैंना संसदीय राजकारणात यायचं होतं. 1957 ची निवडणूक त्यांनी राजापूर मतदारसंघातून लढण्याचं निश्‍चित केलं. त्यांचे प्रतिस्पर्धी मोरोपंत जोशी विद्यमान खासदार होते. मतदारांवर त्यांचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या विरोधात नाथ पै निवडून येतील का, याची शंका नाथ पैंच्या काही निकटवर्तीयांनाही होती. त्यात स्वत: रावसाहेब पटवर्धनही होते! प्रचारसभा सुरू झाल्या. त्यातली एक सभा थेट कुणकेश्‍वरच्या जत्रेच्या ठिकाणी होती. नाथ पै नुकतेच परदेशातून परतलेले. मतदारांसाठी नवीन. स्वतः नाथ पैंनाही वाटलं की या जत्रेत आपलं भाषण ऐकणार कोण? पण नाथ पै व्यासपीठावर येऊन बोलू लागले आणि सारी जत्रा व्यासपीठासमोर येऊन बसली. नाथ पैंचे ओघवते शब्द कानात साठवू लागली. जणु तिथेच निवडणुकीचा रंग बदलला. असं सांगतात की या सभेनंतर मोरोपंत जोशींनी कार्यकर्त्यांसमोर आपला पराभव मान्य केला होता. नाथ पैंच्या वक्तृत्वानं अशी विजयी सलामी दिली!

      लोकसभेतली नाथ पैंची भाषणं गाजली. त्यांचा उल्लेख मी या भाषणाच्या सुरुवातीलाच केला. लोकसभेत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संपाविषयीची चर्चा सुरू होती. पंडित नेहरूंचं धोरण कामगारविरोधी आहे, असं नाथ पैंचं म्हणणं होतं. पंडितजींच्याच एका जुन्या भाषणाचा संदर्भ देऊन नाथ पैंनी ‘कोणते नेहरू खरे? ते पूर्वीचे की हे आजचे?’ असा प्रश्‍न केला. सारी लोकसभाच जणु अंतर्मुख झाली. बॅ. नाथ पैंनी लोकसभेची भाषण-परंपरा समृद्ध केली.

      ‘लोकशाहीची आराधना’ या पुस्तकात नाथ पैंची काही महत्त्वाची भाषणं एकत्र केलेली आहेत. जयानंद मठकर यांनीही नाथ पैंच्या तीन इंग्रजी भाषणांचा अनुवाद संपादित केलेला आहे. नाथ पैंच्या भाषणांचा अभ्यास या पुस्तकांवरून करता येतो.

      साधी, सरळ, सोपी भाषा हे नाथ पैंच्या वक्तृत्वाचं वैशिष्ट्य होतं. महाबळेश्‍वरच्या विभागीय साहित्य संमेलनाचं उद्घाटन नाथ पैंच्या हस्ते झालं होतं. आपल्या उद्घाटनपर भाषणात ते म्हणाले, “खऱ्या कलेला, खऱ्या साहित्याला काळाचं बंधन नसतं. जुनी कला, नवी कला ही भाषा अपुरी आहे, अधुरी आहे आणि उपरी पण आहे. काळाच्या सरळ, सलग, अखंड रेषेवर काल्पनिक छेद आम्ही मानव करीत असतो. अन्यथा तिथं छेद नसतात. चांगल्या कलेला, चांगल्या साहित्याला कुठंही काळाचं असं ठिगळ लावता येत नाही. लेबल लावता येत नाही. त्याला बंधन नसतं…“ छोटे छोटे वाक्यांश एकत्र करीत नाथ पै बोलत. साहजिकच या भाषणात संगीताचा भास होई. एखाद्या शब्दाला समानार्थी शब्द घेऊन वाक्य पुन्हा उच्चारण्याची त्यांची लकब होती. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याचा आशय स्पष्ट होई. विद्वत्ता आणि परिणामकारकता यांचं विलोभनीय मिश्रण त्यांच्या भाषणात होतं.

      नाथ पैंचं अखेरचं भाषण बेळगाव सीमा आंदोलनाच्या संदर्भातलं होतं. भाषावार प्रांतरचना हे सूत्र निश्‍चित केल्यानंतर मराठी भाषकांना न्याय मिळणं अगत्याचं होतं. नाथ पैंच्या मतानुसार खरा प्रश्‍न भाषेचा नव्हता, तो न्यायाचा होता. बेळगावच्या आपल्या अंतिम भाषणाच्या अखेरीला ते म्हणाले होते, “सीमाप्रश्‍नाच्या बाबतीत पार्लमेंटचं मत मी महाराष्ट्राच्या बाजूला वळवू शकेन असा मला विश्‍वास वाटतो. कारण सीमेचा प्रश्‍न हा न्यायाचा आहे. नीतीचा आहे. धर्माचा आहे. अखेर न्याय-नीतीचाच जय होतो, असा इतिहासाचा दाखला आहे…” मित्रहो, नाथ पैंचं हे भाषण संपलं आणि अगदी थोड्याच वेळात ते हे जग सोडून गेले.

      त्यांच्या शब्दांना वेदमंत्रांचं बळ होतं. अनेकांना भारून टाकण्याची शक्ती होती. पु. ल. देशपांडे यांनी त्यांचं वर्णन ‘विद्वज्जनसभेतला विद्वान आणि असाधारण वक्ता’ असं केलं होतं. ‘वक्ता दशसहस्रेषु’ हे सुभाषितातलं विधान पु. लं. नी नव्या शब्दांमध्ये मांडलं. नाथ पैंचा गौरव करणारं हे विधान आहे.

      नाथ पैंच्या असामान्य वक्तृत्वाचं स्मरण करण्याची संधी मला या स्पर्धेमुळे लाभली. मी आयोजकांचे आणि तुम्हा सर्व श्रोत्यांचे आभार मानतो.

धन्यवाद!

(बॅ. नाथ पै असाही एक लोक नेता –

डॉ. विद्याधर करंदीकर)

– क्रमशः

Leave a Reply

Close Menu