टी-20 विश्वचषक 2021 आढावा

भारतवर्षात विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामना म्हणजे रविवारी आलेला सणच. क्रिकेट हा धर्मच मानणारे सायंकाळी टीव्हीशी जोडले गेले. सुपर संडे दुबई इंटरनॅशनल मैदानावरील सायंकाळच्या विद्युत  झोतातील कमी उंचीच्या रोषणाईत रंगणारा भारत विरुद्ध पाकिस्तानचा टी-20 सामना सुरू झाला. कट्टर प्रतिस्पर्धी-धर्मयुद्ध किंबहुना हाय व्होलटेज ड्रामा सुपर 12 संघांच्या स्थानासाठी. सोबत दोन्ही देशांतर्गत तणावपूर्वक राजकीय परिस्थिती – दुबईत सुपर संडे – आपल्याकडे संकष्टी चतुर्थी. आजवर भारताने जिंकलेल्या सर्वच सामन्यांच्या दिवशी महागणपतीचा संदर्भ आढळेल. त्याची अवकृपा झाल्यास निर्णय आपल्या विरूद्ध जावू शकतो व शेवटी गेलाच.

      यापूर्वीचे भारतीय संघ बलाढ्य होते. म्हणून टी-20 विश्वचषक स्पर्धेत सलग सात विजय प्राप्त झाले. आय.सी.सी.च्या क्रमवारीत दुस-या क्रमांकावर आमच्या संघातील खेळाडूंचे वास्तव्य आय.पी.एल.मुळे तेथेच होते. वातावरणात रूळले होते. नुसता सराव नाही तर स्पर्धा सामन्यांचा सराव झाला. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या खेळाच्या तिन्ही विभागात कोणतीही कमतरता असण्याचे कारण नाही. प्रतिस्पर्धी संघांपेक्षा या तीनही क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावता आली तर विजयाचा मार्ग सुकर होईल. हे केवळ या सामन्यापुरते मर्यादित नाही. आपला स्वत:चा स्वत:वरील असलेला विश्वास अढळ, अबाधित असणे अत्यंत महत्त्वाचे, सामन्यातील 20 षटके पाच गोलंदाजांना, दहा क्षेत्ररक्षक तसेच दोन्ही बाजूचे दोन्ही पंच यांचा सहभागाचा मानसिक दबाव मनावर आपल्या खेळातील कृतीवर आल्यास किंबहुना हाताळता आला तर असाध्य ते साध्य करता येईल. प्रतिस्पर्ध्यांस कमी लेखल्यास खोट्या रंगरुपी अति आत्मविश्वासाने आपल्या स्वत:च्या संघाचा घात होवू शकतो, निर्णय विरूद्धही जावू शकतो. यातील सत्यता सामना निर्णयाने दाखवून दिली.

      दोन्ही कर्णधारांसाठी नाणेफेक तसेच त्यावर घेण्यात येणारा निर्णय सामन्याचा निर्णय ठरवू शकतो. रात्री सामन्या दरम्यान मैदानात पडणारे दव सामन्यास कलाटणी देवू शकते. शेवटी गोलंदाजच संघास विजय मिळवून देतात. कप्तान संघात चार गोलंदाज घेतो की पाच. त्यांचे प्रकार कारण येथील खेळपट्ट्या फिरकीस मदत करतील. जलद गती, मध्यम गतीचे फारसे चालणार नाही. 140 ते 160 जास्तीत जास्त 190 पर्यंत धावसंख्या होईल. खेळपट्टीवर गोलंदाजाने टाकलेला चेंडू थांबून फलंदाजांकडे येईल. त्यामुळे फटके मारणे वाटेल तेवढे सोपे नाही. संघाच्या धावसंख्येवर नक्कीच मर्यादा येतील. हे सर्व संपूर्ण स्पर्धेचे चित्र असेल. या स्पर्धेत सहभाग असलेल्या सर्व संघांनी 20 षटकांत आपली धावसंख्या जास्तीत जास्त 160 ते 180 पर्यंत नेलेली आढळेल. 200 किंवा त्याच्यापुढेचा अर्थ सामना जिंकण्याची संपूर्ण खात्रीच.

      140 ते 160  दोन्ही संघांना जिंकण्याची समसमान संधी 160 ते 180 धावा विजयासाठी झगडावे लागणार. आय.पी.एल. च्या स्पर्धेदरम्यान असेच चित्र अनुभवले गेले. चेन्नई सुपर किंग्सच्या महेंद्रसिंग धोनीने अंतिम सामन्यातून मिळवलेले विजेतेपद सर्व साक्षीच आहे. भारतीय संघातील अनेक खेळाडू आज अरब अमिरातीतच वास्तव्यास आहेत. सामने खेळणे तर कर्तव्य-कर्मच आहे. स्पर्धेचेच अंग आहे, परंतु याच खेळाडुंनी स्पर्धाही यशस्वीरीत्या हाताळली आहे. कोणत्याही व्यावसायिक खेळाडूस सबब देण्याची मुभा नसते. खेळाच्या महत्त्वाच्या नियमानुसार नाणेफेक करण्यापूर्वी /होण्यापूर्वी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी स्पर्धेतील आमचा प्रत्यक्ष त्यादिवशी जो संघ खेळणार किंवा मैदानात उतरणार आहे त्यांची नावे एकमेकास लेखी स्वरूपात देणे गरजेचे असते. नाणेफेकीनंतर कर्णधारास संघात खेळाडू बदलता येत नाही. संघात 9 खेळाडुंचे चेहरे नवीन होते. चाळीशीकडे आलेले हफिज व मलिक हे दोघेच केवळ अनुभवी पण निवड योग्य ठरली.

      पाकिस्तान संघाचा कर्णधार नाणेफेक जिंकला तेथेच अर्धा सामना तो जिंकला होता. ‘तुम्हे याद होगा कभी हम मिले थे। वर्ल्ड कप की राहोंमे मिलकर चले थे।” असे भारतीय संघास ऐकवत.

      भारताने विजयासाठी पाकिस्तानला 152 धावांचे आव्हान दिले. तत्पुर्वी सामन्या दरम्यान पाकिस्तानने आवश्‍यक तो सराव नसतानाही समाधानकारक क्षेत्ररक्षण केले. भारताच्या दीडशेच्या धावसंख्येत क्षेत्ररक्षकांनी, गोलंदाजांनी 12 अवांतर धावांची भेटदिली. संघातील यष्टीरक्षकाचे बाईज, लेग बाईज, गोलंदाजांनी वाईड-नोबॉल क्षेत्ररक्षकांनी ओव्हर थ्रो यावरील नियंत्रणावर विशेष सराव करून धावा वाचविण्यासाठी कला अवगत करणे गरजेचे आहे. यात यश मिळाल्यास विश्वचषक फार दूर नक्कीच नाही. विभागणीनुसार पाकिस्तान, भारत, न्युझीलंड, अफगाणिस्तान, नामिबीया, स्कॉटलंड असे सहा देशांचे संघ एका ग्रुपमध्ये आहेत तर दुस-यात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका हे देश व त्यांचे संघ समोरा समोर उभे आहेत.

      फलंदाजीत भारतास गडी तसेच काही चेंडू राखून हरवले. हाही पाकिस्तान संघाने केलेला ऐतिहासिक विक्रमच आहे.

      पाकिस्तान सोबतच्या सामन्याचे भाकित करावयाचे झाल्यास नाणेफेक होणे यातला कौल जिंकणे व त्यानंतर पसंतीचा निर्णय घेणे व तो म्हणजे प्रतिस्पर्धी संघात प्रथम फलंदाजीस आमंत्रित करणे याचे कारण 20 षटकांत त्यांची किती धावसंख्या ते करू शकतात यावर दुसरा संघ आपले आराखडे बांधू शकतो. विजयाची माळ गळ्यात धारण करू शकतो. रात्रीच्या दवाचा आपल्या गोलंदाजांना काडीमात्र संबंध येत नाही.

      विचार करावा की गेल्या 13 सामन्यात दुसरी फलंदाजी करणारे विजयी झालेले आहेत. खेळपट्टी फिरकीस मदत करेल. चेंडू खेळपट्टीवर पडल्यावर फलंदाजाकडे धीम्या गतीने आल्याने फटके मारणे सोपे नाही. अर्थात मोठी धावसंख्या होवू शकणार नाही. आशिया खंडातील संघांची कामगिरी या स्पर्धेत उल्लेखनीय होत आहे. तेच समोरासमोर येत आहेत असे चित्र पहावयास मिळत आहे.

      पाकिस्तान संघाकडून भारत, न्यूझिलंड तसेच अफगाणिस्तान या तिन्ही देशाचे संघ पराभूत झाले. पुढचे पुढे पाहिले जाईल. परंतु, या तीनही संघातील खेळाडू एकमेकांकडे पाहून ‘तेरा जाना दिल के अरमानों का लुट जाना  सभी देखे मन के तकदीरों का मीट जाना॥ हे गाणे म्हणणे नक्कीच पसंद करतील.

– अभय गोवेकर

राष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षक, स्तंभलेखक

मुंबई/वेंगुर्ला, (022) 24330330, 9969620700

Leave a Reply

Close Menu