‘ज्याची त्याची दिवाळी…’

मनामनाला पुलकित करीत आनंदाची उधळण करीत अखेर दिवाळी आपल्या दाराशी येऊन उभी आहे. खरे तर दिवाळी म्हणजे एक सण सोडला तर विशेष काही असे आता राहिले नाही. कारण तसेही वर्षभर आपण आपल्याला जसा वेळ मिळेल तशी दिवाळी वेगवेगळ्या रुपात साजरी करीतच असतो. पूर्वी घरातील माणसाना, स्त्रियांना, बच्चेकंपनीला दिवाळीच्या निमित्ताने नवीन कपडे घेतले जायचे. घरामध्ये गोडधोड केले जायचे. नवीन वस्तूंची खरेदी केली जायची. फटाके दिवाळीतच उडवले जायचे. पण आता काळ बदलला आहे. जणू वर्षभर दिवाळी असते. तुम्हाला वाटेल तेव्हा दिवाळी. मोठमोठ्या शहरात हल्ली मोठमोठे मॉल उघडले आहेत. दिवाळीसारखा लखलखाट तेथे रोजच असतो. खरेदी करणाऱ्यांची झुंबड असते. लागणाऱ्या वस्तू आणि न लागणाऱ्या वस्तू दोन्हींची खरेदी केली जाते. कारण खरेदीचा आनंद वेगळाच असतो. विविध वस्तूंवर सूट जाहीर केलेली असते. काही ठिकाणी सेल असतो. त्यातून खरेदी केली की स्वस्तात वस्तू घेतल्याचा, खरेदी केल्याचा आणि पैसे (खर्च झाल्यापेक्षा) वाचल्याचा केवढा आनंद असतो! निदान आपण तरी तसे मानून घेतो! आणि आपली पाठ थोपटून घेतो! वर्षभरात कधीही आपण पाहिजे तेव्हा नवीन कपडे घेऊ शकतो, गोडधोड खाऊ शकतो आणि नवीन वस्तूंची खरेदी करू शकतो. फटाके सुद्धा वर्षभर कोणत्या ना कोणत्या निमित्ताने फोडले जातात.

     पण तरीही दिवाळीचा आनंद काही औरच! कारण दिवाळीच्या निमित्ताने सणाचा आनंद, उत्साह काही वेगळाच असतो. बाहेरगावी शिकणारी, नोकरी करणारी मुले मुली सुटीत घरी दिवाळीसाठी येतात. आईवडील त्यांची वर्षभर वाट पहात असतात. तेही आपल्या घरी जाण्यासाठी, आईवडील, भाऊबहिणींना भेटण्यासाठी उत्सुक असतात. मुले घरी आली की घर आनंदाने भरून जाते. इतके दिवस सुने सुने वाटणारे घर जणू आनंदाचे   गाणे गाऊ लागते. घरात या निमित्ताने फराळाचे केले जाते. पै पाहुणे येतात. कोणाचे शुभ मंगल ठरते. सगळीकडे आनंदाचे उधाण येते. दिवाळी जणू आनंदाचेच वाटप करते. संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळेस पणत्यांची आरास किती सुंदर दिसते! वर टांगलेला आकाशकंदील आपला वेगळाच तोरा मिरवत असतो. तर घरावरील विद्युत रोषणाईने घर उठून दिसते! अंगणातील रांगोळी आल्यागेल्याचे स्वागत करते, पाहणाऱ्याला आणि काढणाऱ्याला आनंद देते! सकारात्मक उर्जा प्रदान करते. पण ही झाली तुमची आमची दिवाळी.

      पण समाजात अनेक घटक असे असतात की ज्यांना मनासारखी दिवाळी कधीच साजरी करता येत नाही. काही  मंडळी अशी असतात की ज्यांना वर्षभर चांगले खायला प्यायला मिळत नाही. असेल त्यावर गुजराण करावी लागते. नवीन कपडे घेण्याची आशा फक्त दिवाळीच्या निमित्तानेच त्यांना असते. चांगले गोडधोड पदार्थ त्यांना फक्त दिवाळीच्या निमित्तानेच मिळतात. काही अशा लोकांची मनोगते जाणून घेऊ या. ही प्रातिनिधिक आहेत.

      अंगणवाडी सेविका :  दिवाळीचे काय विशेष म्हणून विचारता व्हय? अहो भाऊ, सरकारकडून फक्त पाच हजार रुपये पगार मिळतो. तो बी चार महिने झाले मिळाला न्हाई बघा. पदरी दोन पोरं हाएती. नवरा व्यसनान खंगून गेलाय. त्याच्या आजारपणातच समदा पैसा खर्च होतोय बघा. सावकाराकडून मागच्या महिन्यात व्याजान पैसे आणलेत. तो बी व्याज मागून राहिलाय. कुठून आणू पैसे? साहेब, कसली दिवाळी अन कसलं काय?

      खाजगी कंपनीत काम करणारी स्त्री : दिवाळी तर साजरी करावीच लागते. पण फक्त बारा हजार रुपये मिळतात महिन्याकाठी. हे एका ठिकाणी अकौंटंट म्हणून काम करतात. त्यांना पंधरावीस हजार रुपये हातात पडतात महिन्याकाठी. मुलगी लग्नाची झाली आहे. मुलाचे कॉलेजचे शिक्षण चालू आहे. तुम्ही सांगा कशी करायची दिवाळी? मुलांची फी भरायची आहे, कपडे घ्यायचे आहेत. घराचे भाडे, लाईट बील, फोन बील तर भरावेच लागते. महागाई तर गगनाला भिडली आहे. कुठे कुठे तोंड देणार आणि कशी करणार दिवाळी?

      अशीच व्यथा अल्पभूधारक शेतकऱ्याची आहे. या वर्षी पाऊस चांगला झाला पण नंतरच्या पावसाने सगळ्या  हातातोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान केले. शेतीसाठी सावकाराकडून कर्ज घेतले त्याच्या परतफेडीची चिंता आहे. हातात रोख पैसा नाही. कसेतरी दिवाळीचे चार दिवस पार पाडायचे. नुकतेच काही सैनिक दहशतवाद्यांशी लढताना धारातीर्थी पडले. अगदी दिवाळीच्या तोंडावर. त्यांच्या घरच्यांची दिवाळी अंधारातच! कशी साजरी करणार ते दिवाळी?

      अशी शेकडो नव्हे हजारो नव्हे तर लाखो मंडळी आहेत की जी उद्याच्या आशेकडे डोळे लावून बसली आहेत. कुणाच्या पायात चप्पल नाही, कुणाला कपडे नाहीत, कुणाला शाळेत जायला ड्रेस, वह्यापुस्तके नाहीत. उपाशीपोटी दिवस काढणारी, अर्धपोटी राहणारी माणसे आहेत. देता येईल का अशा माणसांना मदतीचा हात? पुसता येतील का त्यांच्या डोळ्यातील अश्रू? धीर देणारा हात फिरवता येईल का त्यांच्या पाठीवर? त्यांची एखादी तरी दिवाळी आनंदात जाईल असे काही करता येईल का? असा आनंद, असे समाधान एखाद्याच्या चेहेऱ्यावर जरी आपण फुलवू शकलो तर ती खरी दिवाळी साजरी केल्यासारखे होईल! आनंद हा वाटल्यानेच वाढतो. चला आनंदाचे वाटेकरी होऊ या!                            – विश्‍वास देशपांडे,चाळीसगाव-  9403749932

Leave a Reply

Close Menu