सुटकेलाही मन घाबरते

‘नमस्कार, कोविड 19 अनलॉक कि प्रक्रिया अब पुरे देश मे शुरु  हो गयी है।’ अशी काहीशी  रिंगटोन मध्यंतरी आपल्या  खूप कानी  पडत होती. यातून दिलासा नक्कीच मिळत होता. पण अजूनही एक कदाचित खुप बारकाईने न पाहिल्यास लक्षातही येणार नाही अशी  मानसिक अवस्था जवळपास थोड्या बहुत  प्रमाणात आपल्या सगळ्यांच्याच अनुभवास येत होती आणि ती म्हणजे सगळं सुरळीत चालू होण्याविषयीची एक भीती. हो, एक अशी भीती की आता गोष्टी पूर्वीप्रमाणे चालू होतील तर व्हायचं कसं? मानसशास्त्रामध्ये ‘स्टॉकहोम सिन्ड्रोम’ नावाची एक संकल्पना आहे. ही संकल्पना खरंतर ओलीस धरलेल्या बंदिवान लोकांच्या बाबतीत वापरली जाते. अशा वेळी त्या बंदिवासातील लोकांमध्ये त्यांच्या त्या तशा अवस्थेला कारणीभूत गुन्हेगारांच्याच बाबतीत एक वेगळं आपुलकीचं नातं निर्माण होतं आणि त्यांना त्या स्वतःच्या तसल्या बंदिस्त अवस्थेविषयीसुद्धा प्रेम वाटू लागतं.

      ज्या गोष्टीची चीड यावी आणि त्याविरुद्ध पेटून उठावं अशा ठिकाणी आपलेपणाची भावना निर्माण होऊ शकते? हे  आपल्याला खरंतर पचणं अवघड आहे. पण असं वाटत राहून आपण आपल्याच कोशात अडकून जाऊ शकतो; याविषयी जागरूकता बाळगणं तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण मानसशात्रात वैज्ञानिक प्रयोगाअंती अशा संकल्पनेचा उल्लेख केला गेला आहे. जवळपास हे गेलं दीड वर्ष आपण एवढे प्रतिबंधित आणि मर्यादित जगात वावरतो आहोत की निवांतपणा हा नेमका अंगवळणी पडलाय. कोणतीही स्पर्धा, कोणतेही नवे उपक्रम नाहीत, स्वतःला सिद्ध करण्यासाठी कोणत्या संधी नाहीत,  परीक्षा एकतर लांबणीवर  तरी पडतायत, रद्द तरी होतायत किंवा मग ऑनलाईन घेऊन सारवासारव केली जात आहे. एकूणच आपल्या असहायतेला कुठेतरी एक ठोस कारण मिळालं होतं – लॉकडाऊन आहे त्यामुळे सगळं असंच.

      ‘चुकलं माकलं कोरोनाला चिकटवलं’ अशा काहीशा दिवसांमधून आता परत जबाबदारीचे दिवस येणार, दोष देण्यासाठी आतापर्यंत हाताशी असलेली  ती परिस्थिती बदलणार आणि संथ – सुस्त झालेल्या आयुष्यात कुठेतरी परत जोरदार उधाण येणार ही कल्पना थोडी त्रासदायक नक्कीच असू शकते. रोगप्रसाराच्या भीतीने का होईना पण आपण सगळ्यांनी परीस्थितीला अनुरूप अशी एक जीवनशैली आत्मसात केली होती. दरम्यान आर्थिक फटका सहन करत उपजीविकेची साधनं टिकवून ठेवण्याकरिता किंवा नव्याने शोधण्याकरिता आपण आपली शक्ती पणाला लावली पण शेवटी मानवी मनाची पण एक मर्यादा आहे आणि असहाय्यता सहन करण्याची एक परिसीमाही आहे. आणि म्हणूनच नाही नाही म्हणता म्हणता माणूस म्हणून आपल्या प्रत्येकाच्या क्रयशक्तीवर मध्यंतरीच्या काळात बरीच आवरणं चढलेली आहेत हे निश्‍तित.

      अशातच झालेलं आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी सगळ्या बाजूंनी कुरघोडी सुरू होणार, पूर्वीपेक्षा जास्त ताकदीनिशी उतरलो नाही तर आपला  निभाव कसा  लागणार, अजूनपर्यंत दुर्लक्षित होत असलेली गुणवत्ता आता वेळोवेळी सिद्ध करावी लागणार ह्या विचारांच्या वादळाने लॉकडाऊनचा शाप कुठेतरी दिलासादायक वाटून त्यापासून आता सुटका होणं हे कुठेतरी त्रासाचं वाटू शकतं. गंमतीगमतीत शालेय विद्यार्थी अथवा कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या तोंडून अशा अर्थाचं  संभाषण कानी पडणं हे खरंतर ह्याच स्टोकहोम सिन्ड्रोमचंच एक लक्षण आहे.

      माणूस हा सवयीचा गुलाम आहे हे तर आपण जाणून आहोतच त्यामुळे सारं काही आलबेल चालू असताना अचानकपणे ज्या खुबीने आपण लॉकडाऊन जीवनशैली अंगीकारली त्याच पद्धतीने आपण हाही एक बदल अंगीकारणार आहोत याची जाणीव अशावेळी फार महत्त्वाची आहे. सगळं काही सुरळीत चालू होण्याविषयी, त्या प्रक्रियेच्या अनिश्‍चिततेविषयी, स्वतःचा निभाव लागावा म्हणून करायला लागू शकणाऱ्या संभाव्य कष्टांविषयी भीती वाटणं हे खूप नैसर्गिक आहे हे आपण समजून घेऊ. ह्या अशा कबुली मधुनच त्या विचारांना कुरवाळत न बसता त्यावर मात करण्याची क्षमता आपल्यात निर्माण होईल अन्यथा जे चाल्लंय तेच बरं आहे ह्या विचाराने हळूहळू बदलणाऱ्या परिस्थिती सोबत नैराश्‍याकडे वाटचाल सुरू होऊ शकते.

 एकवीसावं शतक हे तंत्रज्ञान, स्पर्धा आणि गुणवत्तेचं तर आहेच पण त्याचबरोबर ते मानसिक खंबीरतेचंही आहे याचा प्रत्यय आपल्याला आलेला आहे. शांततेच्या काळात ज्यांनी नानाविध प्रकारांनी स्वतःला कार्यक्षम ठेवण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकरीता हा नवा अध्याय निःसंशय स्वागतार्ह असेल पण ज्यांनी सुस्तपणाला आपलंसं केलं त्यांच्यासाठी हे थोडं आव्हानात्मक असू शकेल. पण अजूनही वेळ गेलेली नाही, स्टॉकहोम सिंड्रोम ची लक्षणं ही स्वयंप्रेरणेतून क्रियाशील राहूनच जास्त प्रभावीपणे हाताळता येऊ शकतात. अशी मानसिकता फार काळ टिकणं मात्र आरोग्यपूर्ण नाही त्यामुळे क्षणीक अस्वस्थता स्वाभाविक आहे हे लक्षात घेऊन नव्याने अनुभवता येवू पहाणाऱ्या लॉकडाऊन नंतरच्या आपल्या सामान्य जीवनशैली साठी आता असामान्यपणे सज्ज होऊया.                                                      -पियुषा प्रभूतेंडोलकर

MA I/O Psychology

आकेरी,

मो. 7020242216

Leave a Reply

Close Menu