‘माझा वेंगुर्ला’ लोकचळवळ : सकारात्मक कार्याचा नवा आयाम

             कोरोनाच्या पहिल्या लाटेची केवळ झळ बसल्यानंतर दुसऱ्या लाटेचा तडाखा कोकणासाठी त्सुनामी सारखा होता. अशावेळी शासनाच्या मर्यादांना बळ निर्माण करण्यासाठी सामाजिक संस्था, व्यक्तींच्या पुढाकारातून खऱ्या अर्थाने कोरानाच्या लढाईला प्रारंभ झाला. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या चळवळीसाठी प्रत्येकाने आपले योगदान देण्याचा प्रयत्न केला. या देशाच्या योद्ध्यांच्या पंगतीत ‘कोरोना योद्धा’ हे नवे पालुपद रुजु झाले. हे सर्व घडत असतांना अशा काही चळवळी होत्या की ज्या केवळ शासनाला सल्ले देण्याचे व शासनाच्या मर्यादांवर बोट ठेवून त्याचे आकांडतांडव करीत स्वतःची पाठ थोपटविण्यात धन्यता मानत होत्या. आम्ही खूप काही करू इच्छीतो पण शासनाच्या मर्यादेमुळे फारसे करू शकत नाही याचे डांगोरे पिटत मदतीपेक्षा अडथळे निर्माण करण्याचे कार्य इमाने-इतबारे करीत होत्या.

      अशावेळी शासनाच्या मर्यादा नेमक्या हेरून त्यांना मदत करणाऱ्या, सरकारी यंत्रणा व गरजु रुग्ण यांच्यामधे मदतीचा पूल म्हणून काम करणाऱ्या अनेक व्यक्तींच्या, संस्थांच्या सकारात्मक कार्याची दखल नक्कीच घ्यावी लागेल. या मधील उल्लेखनीय व अत्यंत समंजस पध्दतीने समाजावरील संकटाला समाजाच्या सहयोगाने लोकचळवळ उभारुन एक सकारात्मक कामाचा आयाम देणारी चळवळ म्हणून माझा वेंगुर्ला या संस्थेची ‘आम्ही वेंगुर्ला सक्षम’ अभियानाची गाथा अनुकरणीय आहे. यात शंका नाही.

      साधारणतः मार्च 2021 अखेरीस कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने रौद्ररुप धारण करून हाःहाकार उडवला. अशावेळी कोरोना होणे म्हणजे केवळ मरण अशी आणीबाणीची अवस्था निर्माण झाली होती. ऑक्सीजनचा तुटवड्यासोबत जिल्ह्यातील सरकारी व खाजगी रुग्णालये उपचारासाठी कमी पडू लागली होती. कोरोना झाल्यावर आपल्यावर उपचार होणार नाही या धास्तीनेच लोकांचे बळी जात होते. आधीच डॉक्टरांची व इतर आरोग्य सेवकांची भासणारी तुटपुंजी व्यवस्था पूर्णतः कोलमडून पडली होती. अशावेळी कोरोना आजाराबाबत गैरसमज दूर करून त्यांना प्राथमिक उपचार व मानसिक आधार देण्याची नितांत गरज भासत होती.

      सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी यासाठी अनेक सामाजिक संस्थांना आवाहन करून लोकांचे दूरध्वनीद्वारे समुपदेशन करण्यासाठी हाक दिली. या हाकेला प्रतिसाद देऊन ‘माझा वेंगुर्ला’ या वेंगुर्ल्याच्या अस्मितेसाठी कार्य करणाऱ्या संस्थेने या कामात उडी घेतली, वेंगुर्ला मेडिकल असोसिएशनच्या सहयोगाने दूरध्वनीच्या माध्यमातून गृहविलगीकरण असणाऱ्या रुग्णांसाठी कोरोनाच्या पहिल्या लाटेत हाती घेण्यात आलेल्या समुपदेशनाच्या कार्यक्रमास पुन्हा एकदा नव्या दमाने 1 मे 2021 पासून सुरुवात करण्यात आली.

      याकरिता या संस्थानी निश्‍चित मूलभूत अडचण आहे हे अभ्यासून आजाराची गंभीरता समजून घेण्यास होणारा उशीर, प्रत्येकाला कौटुंबिक डॉक्टर उपलब्ध नसल्याने नेमके उपचाराचे मार्गदर्शन मिळण्यात होणारी समस्या, गृहविलगीकरणात स्वत: रुग्ण व नातेवाईक यांनी घ्यावयाची काळजी व जबाबदाऱ्या, योग्य उपचार पध्दती व निरीक्षण, आजारामुळे निर्माण होणारी भीती अथवा ‘माका काय होवचा नाय’, असा अती आत्मविश्‍वास याबाबत माणसाला नीट समजून समुदपदेशन करण्यासाटी तज्ज्ञ समुदपदेशकांची फळी उभारली. यामध्ये वेंगुर्ला येथील सध्या मुंबई कौटुंबिक न्यायालय येथे विवाह समुपदेशक म्हणून कार्यरत असणारे शशांक मराठे, मुळ सावंतवाडी येथील सध्या मुंबई कौटुंबिक न्यायालय येथे विवाह समुपदेशक म्हणुन कार्यरत असणारे ओेंकार तुळसुलकर, सावंतवाडी येथील ॲड. नम्रता नेवगी, महिला बालविकास केंद्र, कुडाळ येथील कार्यरत ओरसची कु. समृद्धी मळेकर, सावंतवाडी महिला व बालविकास विभाग अंतर्गत सावंतवाडी समुपदेशन केंद्रात कार्यरत सौ. अर्पिता वाटवे व मालवण येथील समुपदेशक सचिन बांदकर या तज्ज्ञ कार्यकर्त्यांची मदत घेण्यात आली. ही सर्व मंडळी आपल्या नियमित व्यवसायीक कामाच्या पलिकडे जाऊन वैयक्तीक उरलेल्या वेळेत अविरत फोन करून रुग्णांचे आजपावेतो समुपदेशन करीत आहेत.

      हे काम शास्त्रशुध्द, शिस्तबध्द होण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्‍विनी माईणकर यांचे कोरोना बाधीत रुग्णांची यादी प्राप्त करून देण्यासाठी फार मोठे सहकार्य लाभले आहे. अशी यादी प्राप्त झाल्यानंतर त्यांचे प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय्य महिला-पुरुष असे वर्गीकरण करून दररोज समुपदेशकांना पुरविण्याचे काम कुडाळ येथील प्रशांत काराणे अत्यंत चोखपणे बजावत आहेत. समुपदेशक प्रत्येक रुग्णाला फोन करून त्याच्या तब्येतीची विचारपूस करणे, त्यांच्या इतर कुटुंबीयांची आरोग्य दृष्ट्या पार्श्‍वभूमी तपासणे, उपचाराची माहिती घेणे, गृहविलगीकरणाचे महत्त्व समजावून सांगणे, त्याची पध्दत समजून देणे, शासनाचे निर्धारीत नियम त्यांना वॉटसॅपद्वारे पाठवणे, डॉक्टर सल्ला गरज व महत्त्व समजून सांगणे, ज्यांना कौटुंबिक डॉक्टर उपलब्ध नाही अशा व्यक्तींचा केसपेपर तयार करणे व डॉक्टरना शिफारस करणे याबाबी हाताळत आहेत.

      वेंगुर्ला मेडिकल असोसिएशनचे डॉ. प्रल्हाद मणचेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. राजेश्‍वर उबाळे, डॉ. वामन कशाळीकर, डॉ. प्रसाद प्रभूसाळगावकर, डॉ. शिवशरण, डॉ. नामदेव मोरे, डॉ.वसुधा मोरे, डॉ. श्रीराम हिर्लेकर, डॉ. अमेय खानोलकर, डॉ. श्री. व सौ. काळे, डॉ. क्लारा होडावडेकर ही 14 डॉक्टरांची टीम सेवाभावी उद्देशाने समुपदेशकांनी पाठविलेल्या केसपेपर प्रमाणे प्रत्येक डॉक्टर 5 पेशंट या प्रमाणात रुग्णांना स्वतः फोन करून वैद्यकीय मार्गदर्शन व उपचार करण्यासाठी सहयोग देत आहेत. तसेच तातडीच्या आरोग्य मदतीसाठीही ही मंडळी 24 तास रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. या कार्यक्रमाचा प्रभाव खऱ्या अर्थाने संभ्रमावस्थेत असणाऱ्या रुग्णांना व नातेवाईकांना मोठ्या प्रमाणात होत असून आजपर्यंत या उपक्रमात 1903 रुग्ण व त्यांच्या कुटुंबाचे समुदपदेशन करण्यात आले आहे तर 79 रुग्णांना डॉक्टरी सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुमारे 126 रुग्णांचा नियमीत पाठपुरावा ही समुपदेशकांनी केला आहे. एकूणच गृहविलगीकरणात रुग्णांना केलेल्या या मार्गदर्शन व उपचारामुळे रुग्णांना घरच्याघरी स्वास्थ्य मिळवून देण्यात मोलाची मदत झाली आहे. तसेच या आजाराच्या प्रसाराला मोठा आळा बसला असून शासकीय रुग्णालयाचा व आरोग्य व्यवस्थेचा ताण हलका होण्यास मदत झाली आहे.

      वेंगुर्ला शहर व तालुक्यात आजच्या घडीला कोणतेही सक्षम असे आरोग्य सुविधा असणारे रुग्णालय नाही. साध्यासुध्या आजारातही अन्य ठिकाणी येथील जनतेला धावावे लागते. त्यात कोरोनाच्या महामारीत या तालुक्याची सर्वार्थाने मुस्कटदाबी झाली आहे. बाहेर जायचे तर तिथे आज मूळातच उपचारासाठी जागा नाही. स्वतःच्या तालुक्यात सुविधा नाही, अशा विचीत्र कोंडीत गरीब व सर्वसामान्य जनतेला आपले मरण आपल्या डोळ्याने पहाणे एवढाच पर्याय हाती राहिला होता.

      समुपदेशनाचे कार्य करीत असताना जनतेच्या समस्याही पुढे आल्या. रुग्ण अत्यावस्थ झाल्यास तालुक्यात ऑक्सीजन बेड उपलब्ध नाही किंबहुना त्याला जिल्ह्यात अशी सुविधा मिळण्यासाठी करावी लागणारी धडपड व त्याकाळात त्याची तातडीच्या ॲम्बुलन्स, ऑक्सीजन, कॉन्सट्रेटर आदी सुविधांअभावी होणारी परवड लक्षात घेत या संस्थेने ‘स्वनिधीतून व लोकसहभागातून’ या सुविधा उपलब्ध केल्या. यात ऑक्सीजन बँकेचा उपक्रम हाती घेतला. आतापर्यंत ऑक्सीजन बँक व कॉन्सट्रेटरचा तालुक्यातील 55 रुग्णांना लाभ झाला. पहिल्या टप्प्यात अतितातडीच्या रुग्णांना व कोवीड आजारातून बाहेर आल्यानंतर पूर्ण बरे होण्याच्या कालावधीत आजही या सुविधांचा लाभ तालुक्यातील गरजूंना होत आहे.

      याच कालावधीत स्थानिक आमदार श्री. दिपक केसरकर यांनी जुन्या इमारतीमध्ये समर्पित कोवीड सेंटर सुरू करण्यासाठी महत्त्वाचा पुढाकार घेतला. पण शासनाच्या मर्यादामुळे प्रत्यक्ष पायाभूत सुविधा निर्माण करण्यात अडथळे येत होते. कोरोनाच्या अत्यवस्थ रुग्णांना जिल्हा रुग्णालय अथवा खाजगी रुग्णालयाशिवाय पर्याय नव्हता. माझा वेंगुर्लाने नेमक्या मर्यादा जाणून स्वनिधीतून या कोवीड सेंटरसाठी आवश्‍यक सुविधांची व्यवस्था केली. किंबहुना माझा वेंगुर्लाच्या कार्यकत्यांनी हे कोवीड सेंटर स्वतः धुवुन, स्वच्छ करुन, पडदे, बाथरुम, लाईट, फॅन आदी व्यवस्था करून दिल्या. यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्‍न होता या केंद्रासाठी कोरोनाच्या अत्यावस्थ रुग्णांवर उपचार करू शकणाऱ्या अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरच्या उपलब्धतेचा. दै. तरुण भारत मध्ये संस्थेच्या आवाहनास अनुसरुन वेंगुर्ल्याचे सुपुत्र श्री. अविनाश चमणकर यांनी यासाठी पुढाकार घेतला. वेंगुर्लावासीय मुंबईस्थीत डॉ. अमित आजगावकर जे मुंबई येथे स्वतःच्या एका मोठ्या कोवीड सेंटरची जबाबदारी पार पाडत होते. त्यांना वेंगुर्ला येथील सेंटरला अनुभवी डॉक्टर उपलब्ध करून देण्याची विनंती केली. वेंगुर्ल्याच्या अस्मितेला जागुन विशेष प्रयत्नाने त्यांनी वेंगुर्ला येथे डॉ. क्रांती बरासकर यांना सेवा देण्यासाठी प्रवृत्त केले. अर्थात शासन देत असलेल्या मर्यादित मानधनात डॉक्टर सेवा या आणिबाणीत मिळणे अशक्य होते. त्यासाठी ‘माझा वेंगुर्ला’ ने सदर डॉक्टरना अपेक्षीत मानधनाचा फरक व आवश्‍यक सर्व सुविधा देण्याची तयारी दर्शविली. तसेच आवश्‍यक नर्स, वॉर्डबॉय व इतर आरोग्य कर्मचारी यांना शासन मानधनाच्या उर्वरित उत्तेजन मानधन उपलब्ध करून देण्यात यश मिळविले. आमदार दिपक केसरकर यांनी सदर डॉक्टर व इतर सहाय्यक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मानधनातील फरकाची रक्कम देण्याची जबाबदारी घेतली. कॉन्सट्रेटर बायपॅप, व्हेन्टीलेटरसह उपचार सुविधा देणारे जिल्हा रुग्णालयानंतरचे हे जिल्ह्यातील केंद्र ठरले. वेंगुर्ल्याचे ग्रामीण रुगणालयाचे मुख्य डॉ. अतुल मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली या समर्पित कोवीड केंद्राने उल्लेखनीय काम पार पाडले आहे.

      लोकप्रतिनीधी, शासन व समाज यांच्या सहयोगातून उभारलेली ही लोक चळवळ खऱ्या अर्थाने संपूर्ण राज्यासाठी रोल मॉडेल म्हणून परिवर्तनीय आहे. माझा वेंगुर्लाच्या जाहिर आवाहनास अनेक दात्यांनी सढळ हस्ते आवश्‍यकतेप्रमाणे मदत करण्याची तयारी दर्शविली. यामध्ये श्री. रघुवीर मंत्री, श्री. सुरेश बोवलेकर अशा अनेक दात्यांचा सहभाग आहे.

     शासनाच्या मर्यादांना ओलांडून कोरोनाच्या महामारीवर मात करण्यासाठी ‘माझा वेंगुर्ला सक्षम’ अभियानाची ही यशस्वी मोहीम यापुढेही वेंगुर्ल्याच्या आरोग्य चळवळीस अधिक भक्कम करण्यासाठी आता देश विदेशातील वेंगुर्ल्याची नाळ असणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टर व मार्गदर्शकांना संघटीत करण्याचा संकल्प या संस्थेने केला आहे.

    डॉ. विनीत आजगांवकर, डॉ. महेश धारगळकर, डॉ. राजीव रेडकर, आदी डॉक्टरनी याकरीता आपली मोफत सेवा देण्यासाठी तयारी दर्शविली आहे. वेंगुर्लेवासीयांच्या आर्थिक पाठिंब्याने वेंगुर्ल्याच्या अत्यावस्थ रुग्ण व्यवस्थेस पुन्हा एकदा संजीवनी मिळण्याची ही नांदी आहे.                            – मोहन होडावडेकर, 9423884516

Leave a Reply

Close Menu