वेंगुर्ला तालुक्यातील १० ग्रामपंचायतींमधील ११ जागांसाठी २१ डिसेंबर रोजी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आल्याची माहिती तहसीलदार प्रविण लोकरे यांनी दिली.

      तालुक्यातील आणसूर, पाल, केळूस, खानोली, दाभोली, मोचेमाड, मेढा, उभादांडा, भोगवे या नऊ ग्रामपंचायतीमध्ये रिक्त असलेल्या प्रत्येकी १ जागेसाठी आणि आसोली येथील रिक्त असलेल्या २ जागांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा कालावधी ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर, नामनिर्देशनपत्र छाननी ७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता तर ९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम वेळ आहे आणि याच दिवशी निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

      ज्या ठिकाणी मतदान घेणे आवश्यक असेल तेथे २१ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायं. ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. तर २२ डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Close Menu