केंद्र शासनाच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्व्हेक्षण २०२१चा निकाल जाहीर झाला आहे. यात वेंगुर्ला शहराचा देशात पश्चिम विभागात १७वा क्रमांक तर महाराष्ट्र राज्यात १६वा क्रमांक आला आहे. स्वच्छतेच्या बाबतीत आपले सातत्य टिकवून ठेवताना वेंगुर्ला शहर सलग दुस-या वर्षी संपूर्ण देशातील सर्वोत्तम २० शहरात येण्याचा बहुमान पटकाविला आहे. तसेच प्रेरक दौर सन्मान अंतर्गत सुवर्ण शहरम्हणून मानांकनही मिळविले आहे.

      केंद्र शासनामार्फत स्वच्छ भारत अभियानतर्गत दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण हा स्वच्छता सर्वे घेण्यात येतो. यात शहराची घनकचरा संकलन व व्यवस्थापन प्रणाली, सांडपाणी व्यवस्था, सार्वजनिक शौचालय आदी घटकांचे बारकाईने सर्वेक्षण केले जाते. स्वच्छ सवेक्षण २०२१मध्ये देशभरातील ४३२० श्हारांचे सर्वेक्षण करण्यात आले. पश्चित विभागात गोवा, महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश आणि राज्यस्थान या राज्यांचा समावेश होता. यात वेंगुर्ला शहराने १७वा क्रमांक पटकाविला.

      स्वच्छ सर्वेक्षण क्रमवारी बरोबरच स्वच्छ सर्वेक्षण २०२१मध्ये घनकचरा व्यवस्थापनात सर्वोत्तम कामगिरी करणा-या शहरांना प्रेरक दौर सन्मान अंतर्गत शहरांच्या कामगिरीनुसार दिव्य, अनुपन, उज्वल, उदीत, आरोही शहर म्हणून मानांकन दिले गेले. या घटकात शहराची दैनंदिन कचरा संकलन, घनकचरा प्रक्रिया केंद्र, हागणदारी मुक्त दर्जा या मानांकावर गुणवारी ठरते. यात वेंगुर्ला शहराला अनुपन (सुवर्ण) शहर म्हणून मानांकन मिळाले असून अशी कामगिरी करणारी वेंगुर्ला नगरपरिषद जिल्ह्यातील एकमेव नगरपरिषद ठरली आहे. कोकण विभागात सर्वोत्तम वर्ग नगरपरिषद ठरली. तसेच हागणदारी मुक्त शहर म्हणून ओडीएफ डबल प्लस दर्जा मिळविण्यात वेंगुर्ला नगरपरिषद सलग तिस-या वर्षी यशस्वी झाली आहे.

      वेंगुर्ला शहर स्वच्छतेच्या बाबतीत सुवर्ण शहरम्हणून मानांकित होणे हे वेंगुर्ला शहरातील नागरिकांची स्वच्छतेच्या बाबतीत असलेली आग्रही भावना आणि सातत्य यामुळेच हे शक्य झाले. यात अनेक संस्थांसह सर्व लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून मोठा सहभाग व सहकार्य मिळाले असे मत नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी व्यक्त केले. तसेच मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे, स्वच्छ भारत अभियान नोडल अधिकारी सचिन काकड, स्वच्छता निरीक्षक वैभव म्हाकवेकर, शहर समन्वयक सुस्मित चव्हाण, सर्व सफाई कर्मचारी यांच्यासह अन्य सर्व कर्मचारी यांनी वर्षभर केलेल्या कामाचे हे फलित असल्याचे सांगत नगराध्यक्ष गिरप यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Close Menu