कोरोना इज बॅक!

कोरोनाचा संसर्ग ओसरत चालला असतानाच ओमिक्रॉननावाने नव्याने आफ्रिकेत आलेल्या कोरोनाने संपूर्ण जग हादरून गेले आहे. अनेक देशात या नव्या कोरोनाचा संसर्ग झालेले रूग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर काही देशात पुन्हा कडक लॉकडाऊन लागू झाला आहे. आपल्या देशात या नव्या ओमिक्रॉनकोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य शासनांनी सतर्क होऊन जनतेला आवाहन केले आहे. शिथिल झालेले निर्बंध पुन्हा लागू केले जात आहेत.

      दीड-दोन वर्षांच्या कालावधीत कोरोनोच्या दोन लाटा येऊन गेल्या. जगभरात लाखो मृत्यू झाले. दीड वर्षाच्या लॉकडाऊनमुळे सर्व व्यवस्था कोलमडून पडल्या. वैद्यकीय व्यवस्थेचे तकलादूपण उघड झाले. वैद्यकीय व्यवस्था बळकटकरण्यासाठी आणि कोरोना प्रतिबंधासाठी मोठ्या  प्रमाणावर प्रबोधन आणि उपचारासाठी कोट्यावधी रूपये खर्च झाला. लॉकडाऊनचे नियम हळूहळू शिथिल करण्यात आले. कोरोनाची रूग्णसंख्या घटली आहे. लसीकरणानेही गती घेतली आहे. पहिल्या टप्प्यात या आजारावर कोणतेही उपचार नव्हते. लसीचे संशोधन सुरू होते. गेल्या वर्षभरात देशात लसीकरणाची मोहिम राबविण्यात आली. पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या १०० कोटींच्या घरात पोहोचली आहे. दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ५० कोटींच्या घरात आहे. लहान मुलांच्या लसीकरणाचा कार्यक्रम राबविला जाणार आहे.

       शिक्षण, अर्थ, वैद्यकीय सेवा, उद्योग-व्यवसाय अशा सर्वच घटकांना दोन वर्षाच्या काळात जबर फटका बसला. यामध्ये शेती उद्योग काहीसा सावरला असला तरी सातत्याने येणारी वादळे, महापूर, अतिवृष्टी यामुळे शेतीउद्योग सुद्धा संकटात सापडला. एकाच वेळी चहुबाजूंनी संकटांनी घेरल्याची स्थिती आपण अनुभवली आहे. या सा-या पार्श्वभूमीवर ओमिक्रॉननावाने आलेल्या कोरोनाची धास्ती तर आहेच यासाठी विदेशातून येणा-या नागरिकांवर कडक लक्ष ठेवण्यात येत आहे. केंद्र शासनाकडून सर्वच राज्यांना याबाबत निर्देश देण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील आघाडी शासनाने काही निर्बंध लागू केले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जनतेला कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन करताना पुन्हा लॉकडाऊन नको असेल तर नियमांचे गांभीर्याने पालन करा, असा इशारा दिला आहे.

      गेल्या काही दिवसांपासून पर्यटकांसाठी मोठ्या संख्येने लोक बाहेर पडले आहेत. लसीकरण झाल्यामुळे कोरोनाची भीती कमी झाल्याची मानसिकता पहायला मिळते. शाळा आणि शिक्षण याबाबत अजुनही संभ्रमावस्था आहे. याहीपेक्षा राजकीय पक्षांचे कार्यक्रम, त्यांचे मेळावे, त्यांच्या सभा, निवडणुका यामध्ये होणारी गर्दी आणि कोरोना नियमांची पायमल्ली या गोष्टींवर प्रथम निर्बंध घातले पाहिजेत. नियम फक्त सामान्य नागरिकाला आणि यातून राजकारण्यांची सुटका यामुळे जनतेतून तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी याची गांभिर्याने नोंद घेऊन केंद्र आणि राज्य शासनाने दिलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन करण्याबाबत कार्यकर्त्यांना सूचना देण्याची गरज आहे. ही परिस्थिती बदलण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण, यापूर्वी नियम पायदळी तुडवून झालेल्या सभा, आंदोलने जनतेने पाहिले आहेत. परंतु, आता ओमिक्रॉननावाने आलेला विषाणू पूर्वीपेक्षा चार पटीने संसर्ग वाढवितो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लसीकरणाला सुद्धा हा विषाणू दाद देत नाही. चकवा देऊ शकतो. त्यामुळे आपल्या देशातील आणि महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेऊन जनतेनेच अधिक सतर्कतेने काळजी घेतली पाहिजे. इतर कोण काय करतो, याकडे लक्ष न देता आपले कुटुंब सुरक्षित ठेवण्यासाठी नियमांचे पालन करून या परिस्थितीला सामोरे जाण्याची गरज आहे.

        राजकीय पक्ष काय करतात? शासनाचे आदेश काय आहेत? यापेक्षाही आपल्या कुटुंबाची सुरक्षितता अधिक महत्त्वाची आहे. यापूर्वीच्या दोन लाटात कुटुंबप्रमुख गमावल्याने कुटुंबाची काय अवस्था होते, याचा अनुभव जवळ जवळ प्रत्येकाने आपले नातेवाईक वा मित्रमंडळींच्या बाबतीत घेतला आहे. त्यामुळेच पुन्हा पुन्हा काळजी घेतली पाहिजे. ओमिक्रॉनहा विषाणू घातक असला तरी आपल्या देशात व महाराष्ट्रात लसीकरण ब-यापैकी झाल्याने आपण व्यवस्थित नियमांचे पालन केले तर घाबरून जाण्याचे कारण नाही.

Leave a Reply

Close Menu