संघर्षाचा प्रत्येक दिन, समजू नका मज दीन!

आपल्याला देव जन्माला घालतो, तेव्हा एखाद्या साच्याप्रमाणे सगळ्या गोष्टी आपल्याला अपेक्षित असतात. पण प्रत्येकाच्याच बाबतीत असं घडतच असं नाही.  एखादा जन्मतःच अपंगत्व घेऊन जन्माला येतो तर धडधाकट जन्माला येऊनही पुढे जाऊन अपघाताने किंवा भयंकर व्याधीमुळे एखाद्याला अपंगत्व आलेलं असतं. खरंतर यात कुणाचाही दोष नसतो. त्यामुळे आलेल्या या अपंगत्वावर मात करत समोर ध्येय ठेऊन कुठलेही काम केलं तर असाध्य असं काहीच नाही, याची साक्ष देणारी हेलन केलर, लुईस ब्रेल, सुधा चंद्रन अशी अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत.

      अशीच एक म्हणजे मुंबईतील ग्रँट रोड येथे राहणारी गौरी कवठणकर. हिचा जन्मापासून ते आतापर्यंतचा थक्क करणारा प्रवास पाहता गौरी खरंच दिव्यांग आहे का? तर याचं उत्तर तिला ओळखणारी प्रत्येक व्यक्ती ‘नाही’ असंच देईल. जन्मतःच सुदृढ असणाऱ्या गौरीला तिसरीत असताना पाठीला गाठ आल्याचं निमित्त झालं आणि शस्त्रक्रियेनंतर दुर्दैवाने त्याचं पर्यवसान म्हणजे तिला कमरेच्या खाली विकलांगता आली. पण गौरीने आपल्या शारीरिक व्यंगावर यशस्वीपणे मात करून ठामपणे स्वतःचं अस्तित्व स्वतःच निर्माण केलं. खेळात, चित्रकलेत तसेच गाण्यातही तिने अनेक पारितोषिक मिळवलीत. गाणं म्हणजे गौरीचा श्‍वास. ती उत्तम गायिका असून तिने ‘रुकना नहीं’ पुरस्कार, राज्यस्तरीय पुरस्कार, ‘बाईक बेस्ट सिंगर’ पुरस्कार, ‘ग्लोबल वुमन एमपॉवरमेन्ट’ पुरस्कार मिळवले आहेत.

      यावर्षी भारताने पॅरालिम्पिक खेळात आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड तोडत तब्बल 19 पदकं मिळवून देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. ही निश्‍चितच खूप आनंदाची गोष्ट आहे. मात्र याकडे अजूनही लक्ष देणं खूप गरजेचं आहे. याविषयी मुंबईच्या ‘लक्ष्य आर्ट फाउंडेशन’ या संस्थेतील दिव्यांग मुलांना स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभं करण्यासाठी सतत धडपडणाऱ्या संस्थेच्या संस्थापिका सोनाली घाटे-बाणे म्हणाल्या की, “व्हीलचेअरवर बसून तलवारबाजीचं संपूर्ण प्रशिक्षण या मुलांना घेता यावं यासाठी मुंबई विद्यापीठाने त्यांना जागा तसेच प्रशिक्षण या दोन्ही गोष्टी मोफत उपलब्ध करून दिल्या. परंतु जेव्हा कुठे स्पर्धा असतील तेव्हा तिथे जाण्यायेण्याचा खर्च करण्यासाठी आवश्‍यक असलेला निधी या गोष्टीकडे मात्र फारसं लक्ष दिलं गेलं नाही. दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांनीही यासाठी कितीही आवाहन केलं तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.“

     अपघातात एक पाय गमावलेला प्रतीक गुप्ता हा एक अष्टपैलू  व्यक्तिमत्त्व असलेला मुलगा. प्रतीक राष्ट्रीय जलतरणपटू तर आहेच पण त्याचबरोबर भारतीय क्रिकेट संघामधून तो भारत-बांगलादेश टी-ट्वेन्टी विश्‍वचषक क्रिकेट खेळलेला आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावर तलवारबाजीही खेळलेला आहे. त्याचबरोबर सायकलिंग, ट्रेकिंग करतो, मॅरेथॉनमध्ये भाग घेतो. सध्या तो एका क्लबमध्ये पोहण्याचे धडे देतो. अपंगानाही मोफत शिकवितो. तो म्हणतो, “निधीअभावी आम्हाला खूप अडचणी येतात. अपंगांना खेळाच्या बाबतीत खूप डावललं जातं. व्हीलचेअर अभावी कुठे जाता येत नाही. एके ठिकाणी मी पोहण्याच्या स्पर्धेसाठी जात असता, तू येऊ नकोस. बुडून जाशील. या शब्दात मला सुनावलं गेलं. असे अतिशय वाईट अनुभव येतात. आम्हाला बिचारा न म्हणता सामान्य माणसांसारखीच वागणूक द्यावी, अशी आमची साधी अपेक्षा आहे.“

      आपल्या अपंगत्वावर मात करून वेगवेगळ्या क्षेत्रात ठसा उमटविणारे असे अनेकजण आज स्वाभिमानाने जीवन जगत आहेत. तरीही समाजाची दिव्यांगांकडे बघण्याची दृष्टी पुर्णपणे बदललेली नाही. समाजाने या मुलांवर विश्‍वास दाखवावा. मुलांना व्हीलचेअरवर बघून अनेकजण त्यांनी बनवलेले खाद्यपदार्थ किंवा इतर वस्तू घेत नाहीत. या मुलांना सहानुभूती, देणग्या, पैसे यांची गरज नसून विश्‍वासाची गरज आहे तसेच त्यांच्या कलागुणांना स्वीकारण्याची गरज आहे. जेणेकरून ही मुलं स्वबळावर खंबीरपणे उभं राहतील. तसेच दिव्यांग असूनही जी मुले जन्मजात कलांमध्ये निपुण आहेत त्यांना प्रदर्शनांमध्ये सहभागी करून या मुलांच्या कलागुणांना वाव देणे यातूनच त्यांना हवी असलेली खरी समानता साधता येईल. आजच्या घडीला मॉलमध्ये दिव्यांगांना जाण्यासाठी, फिरण्यासाठी कोणत्याही सुविधा नाहीत. इतरांसारख्या त्यांनाही भावना असतात, याचा विचार करून अशा सुविधा त्यांना उपलब्ध करून देणे आवश्‍यक आहे.

      मुंबईसारख्या बड्या शहरात दिव्यांगांना थोड्यातरी संधी उपलब्ध होतात. परंतु ग्रामीण भागात मात्र फार बिकट परिस्थिती आहे. खरंतर महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यांत दिव्यांगांना प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी कार्यशाळा आहेत. मात्र या सगळ्यांसाठी जिल्हा पातळीवर समायोजन केलेला तसा कोणताही कार्यक्रम नाही. त्यामुळे तिथून जर काही मार्गदर्शक तत्त्वे आली तर यावर निश्‍चितच काम करता येईल, असे मत दिव्यांगांची संस्था चालविणाऱ्या सोनाली घाटे-बाणे यांनी व्यक्त केलं.

      प्रत्येक दिव्यांगाच्या समस्या या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे कुटुंबासाठीही हे एक आव्हानच असतं. अपंगत्वामुळे नुसतं शारीरिकच नव्हे तर मानसिक दृष्ट्याही अपंगत्व आलेल्या व्यक्तीला उभं करणं हे खूप महत्त्वाचं असतं. यातलाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे शुश्रुषा. तसेच ज्यांचं कुणीच नसतं त्यांच्यासाठी रुग्णसेवेला वाहिलेल्या संस्था यांचं कार्य खूप मोलाचं ठरतं. तसेच रुग्णाला लागणाला वॉकर, व्हीलचेअर, श्रवण यंत्र, अंधांसाठी लागणारी काठी अशी रुग्णसाहित्य सेवा करणाऱ्या संस्थांचीही आज समाजाला अत्यंत गरज आहे.

      सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खंबीरपणे उभं राहून आत्मविश्‍वासपूर्ण जगणं जगणाऱ्या प्रत्येक दिव्यांगाला दीन न समजता समानतेची वागणूक दिली तरच खऱ्या अर्थाने जागतिक अपंग दिन साजरा केल्याचे सार्थक होईल.

– अनघा सावंत, लालबाग-मुंबई

 sawant1971a@gmail.com, 8369397340

साथ हवी सन्मानाची, जिद्द भरारी घेण्याची

      केंद्र शासनाचा दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016 अन्वये सर्व सुविधा व संधी उपलब्ध व्हायला हव्यात.  कुटुंब, समाज, शाळा, महाविद्यालय, शासकीय यंत्रणा व सर्व स्तरातील नोकरी सेवा या ठिकाणी दिव्यांगांकडे पाहण्याची निकोप व सकारात्मक दृष्टी हवीय. आज बहुतांश क्षेत्रात खेळ, नोकऱ्या, व्यवसाय याठिकाणी दिव्यांग बांधव सन्माननीय पदे भूषवत आहेत. योग्य उपचार, साधनसुविधा मिळाल्यास व कार्यानुभवावर आधारित अभ्यासक्रम दिल्यास अनेक दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत होईल. त्यांच्याकडे असणाऱ्या इच्छाशक्तीला जर तंत्रज्ञानाच्या प्रगतीची जोड मिळाली तर त्यांचे आयुष्य अधिकाधिक सुसह्य होईल. विशेषतः लहान मुलांमध्ये अपंगत्वाचे निदान लवकर होऊन त्यावर उपचार आणि योग्य प्रशिक्षणाची सोय करणे, तसेच त्यांचे पुनर्वसन व्हावे यासाठीच्या सर्व सेवा-सुविधा फक्त कागदोपत्री न राहता शेवटच्या स्तरावरील दिव्यांगांपर्यंत परिणामकारकरीत्या पोहोचवण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न व्हायला हवेत ही अपेक्षा.

-श्रीम. रुपाली दिपक पाटील,

अध्यक्षा- साहस प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग,

दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्र, सावंतवाडी

Leave a Reply

Close Menu