असाही एक लोकनेता (भाग-8)

या विभागातील सर्व भाषणे एका विशिष्ट गतीने दहा मिनिटात पूर्ण व्हावीत अशा अपेक्षेने लिहिलेली आहेत.

      भाषण करणाऱ्या विद्यार्थ्याची बोलण्याची विवक्षित गती विचारात घेऊन संहितेत बदल करणे आवश्‍यक असते. पाहिजे तेव्हा बंद करता येणारे घड्याळ (स्टॉपवॉच) सरावाच्या वेळी वापरणे व त्यानुसार संहितेत बदल करणे श्रेयस्कर ठरेल.

  1. बॅ. नाथ पै : लोकनेता

 अध्यक्ष महाशय, आदरणीय परीक्षक वर्ग आणि रसिक हो,

      पु.ल. देशपांडे यांनी बॅ. नाथ पैंचं वर्णन विद्वज्जन सभेतला विद्वान आणि सामान्य जनांमधला साधा माणूस असं केलं आहे. जनसामान्यांचे कैवारी असलेले नाथ पै लोकनेते म्हणून कसे होते, हे सांगण्याचा प्रयत्न आज मी करणार आहे.

      नाथ पै राजापूर मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी होते. त्यांनी मतदारांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांनी या मतदारसंघाचं पालकत्व मनोमन स्वीकारलं होतं आणि लोकांनीही त्यांना अनभिषिक्त राजेपण बहाल केलं होतं. रघुवंशात राजा दिलीपाचं वर्णन कालिदासानं केलं आहे. या आदर्श राजाविषयी कालिदास लिहितो-

प्रजानां विनयाधानात्‌ रक्षणात्‌ भरणात्‌ अपि

स पिता पितरस्तासां केवलं जन्महेतवः॥

      हा राजा साऱ्या प्रजेचा पिता. या प्रजेचे जन्मदाते वडील हे केवळ जन्म देण्यापुरतेच. एरवी भरणपोषण करणाऱ्या पित्याची भूमिका राजा दिलीपानं निभावली. नाथ पैंनी मतदारसंघाचं पालकत्व स्वीकारलं ते राजा दिलीपाला आदर्श ठेवून. लोकनेता म्हणून किती डोळसपणे आपली जबाबदारी ते पार पाडीत होते, हे यावरून समजू शकेल.

      नाथ पैंच्या व्यक्तिमत्त्वाची उभारणीच काही विशिष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेवून झाली होती. त्यांचा जन्म आणि बालपण कोकणातलं. इथल्या निसर्गाची श्रीमंती त्यांनी डोळे भरून पाहिली. समुद्राकडून त्यांनी गांभीर्य घेतलं. उंच माडाकडून महत्त्वाकांक्षा घेतली. फुलांकडून कलासक्ती घेतली. फळांकडून रसवत्ता घेतली. हे पाथेय त्यांना आयुष्यभर पुरलं. लहानपणी त्यांनी कोकणी प्रजेचं दारिद्य्र पाहिलं. हे दारिद्य्र दूर करण्याचा मी प्रयत्न करीन अशी मनोमन प्रतिज्ञा केली. पुढच्या शिक्षणासाठी ते बेळगावला गेले.

      शाळा-महाविद्यालयात शिकत असतानाच त्यांचं नेतृत्व घडत होतं. उत्तम वक्तृत्व हा नेतृत्वाचा पाया असतो, हे त्यांनी जाणलं होतं. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी गोखले करंडक वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला आणि ही स्पर्धा जिंकली. अलाहाबादची उत्स्फूर्त इंग्रजी वक्तृत्व स्पर्धाही त्यांनी जिंकली. फर्ग्युसन कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचं पार्लमेंट असे आणि मंत्रिमंडळसुद्धा असे. नाथ पै या फर्ग्युसन मंत्रिमंडळात पुरवठामंत्री होते. मुलाचे पाय पाळण्यात दिसावेत, तसाच हा प्रकार होता. शिवाजी महाराजांच्या काळात मित्रामित्रांच्या लुटूपुटीच्या लढाया चालत. नाथ पै आपल्या मित्रांबरोबर वैचारिक युद्ध खेळत. लोकनेता होण्यासाठीचा त्यांचा पूर्वाभ्यास याप्रकारे झाला.

      वयाच्या ऐन विशीत ते स्वातंत्र्यलढ्यात उतरले. शिक्षणाला तात्पुरता रामराम ठोकून. क्रांतिमार्गाचं आकर्षण होतं. मॅझिनी, गॅरिबाल्डी, भगतसिंग, सावरकर यांची चरित्रं वाचलेली होती. आजूबाजूला तरुण मित्र होते. बेळगावला इंग्रजी लष्कराची छावणी होती. इंग्रजांना सळो की पळो करून सोडायचं या हेतूनं नाथ आणि त्यांच्या मित्रांनी या छावणीतल्या गवताच्या गंजीला आग लावली. या प्रकरणात नाथ पैंना अटक झाली. नाथ पैंची आई त्यांना म्हणाली देखील की “राजा, जरा विचार करून वागत जा.” नाथ तिला म्हणाले, “आई, तू काही मला एकटीच आई नाहीस. मला अशा वीस कोटी आया आहेत आणि त्यांच्यासाठी मला लढलं पाहिजे.” स्वातंत्र्याचा कैफ नाथ पैंच्या तोंडून बोलत होता. क्रांतिमार्गावर असताना नाथ पैना अटक झाली. तुरुंगवास घडला. या तुरुंगवासात त्यांना रावसाहेब पटवर्धनांचा सहवास लाभला. मार्गदर्शन मिळालं. ‘लोकनेता’ बनण्यासाठी ही अपूर्व संधी होती. नाथ पैंनी संधीचं सोनं केलं.

      स्वातंत्र्य मिळालं त्याच वर्षी नाथ पदवीधर झाले. बॅरिस्टर होणं हे त्यांचं स्वप्न होतं. नेहरू, गांधीजी, सावरकर हे त्यांचे ज्ञानमार्गातले आदर्श होते आणि हे तिघेही बॅरिस्टर होते. ‘बॅरिस्टर’ ही कायद्याची पदवी. कायद्याचा अभ्यास लोकनेतृत्वासाठी पोषक ठरणार होता. बॅरिस्टर होण्यासाठी नाथ पै इंग्लंडला गेले. कोणालाही वाटेल की ज्या इंग्रजी सत्तेविरुद्ध नाथ पै झगडले, त्याच इंग्लंडमध्ये ते शिक्षणासाठी का बरं गेले? इथं एक गोष्ट आपण लक्षात घेऊ. नाथ पैंचा झगडा इंग्रजी जुलमी सत्तेबरोबर होता, इंग्रज परकीय होते म्हणून होता. तो इंग्रजांच्या सद्गुणांशी नव्हता. इंग्रजांकडून घेण्यासारखंही खूप होतं. मुख्य म्हणजे ज्या लोकशाही व्यवस्थेविषयी नाथ पैंना आदर होता, ती लोकशाही व्यवस्था सातशे वर्ष इंग्लंडमध्ये राबविली जात होती. या व्यवस्थेचा परिपूर्ण अभ्यास इंग्लंडमध्ये होणार होता.

      भारतात कामगारवर्ग वाढत होता. अजून तो संघटित नव्हता. औद्योगिक क्रांतीमुळे युरोपमध्ये कामगारवर्ग मोठ्या संख्येनं होता. तो संघटित होता. कामगारवर्गाला अनुकूल असं मजूरपक्षाचं सरकार इंग्लंडमध्ये सत्तेवर होतं. कामगारांच्या समस्यांचा, कामगार चळवळीचा अभ्यासही लोकांचं नेतृत्व करताना उपयोगाचा होता. नाथ पैंना कामगार चळवळीचा अभ्यास करण्यासाठी ऑस्ट्रिया या देशाकडून शिष्यवृत्ती मिळाली. ते व्हिएन्नाला गेले. तिथे जर्मन भाषा शिकले. ऑस्ट्रियन वृत्तपत्रांमधून लेखन करू लागले. आंतरराष्ट्रीय समाजवादी युवक संघटनेचं काम ते बघतच होते. या चळवळीचं त्यांनी नेतृत्वही केलं. ‘लोकनेता’ म्हणून नाथ पै अत्यंत पक्क्या पायावर उभे होते. नंतर ते भारतीय राजकारणात आले तेव्हा ‘ते आले, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलं’ या श्रेणीचं धवल यश त्यांना लाभलं. त्यासाठी घेतलेले कष्ट फलदायी ठरले.

      लोकनेतृत्वासाठी सिद्ध होण्यापूर्वी रावसाहेब पटवर्धनांनी त्यांना एक बहुमोल सल्ला दिला. बरीच वर्षे शिक्षणासाठी नाथ पै परदेशात होते. त्यांनी भारत पाहावा, त्यासाठी भ्रमंती करावी, लोकांचे प्रश्‍न जाणून घ्यावेत आणि नंतर राजकारणात यावं, अशी रावसाहेबांची सूचना होती. नाथ पैैंनी या सूचनेचं पालन केलं. ही सूचना उपयुक्त ठरली. 1957 च्या लोकसभा निवडणुकीत नाथ पै राजापूर मतदारसंघातून भरघोस बहुमतानं निवडून आले. नाथ पै कोकणचे भूमिपुत्र होते. त्यांचं बालपण या मतदारसंघातच गेलेलं होतं. हा मतदारसंघ ‘मनिऑर्डरचा जिल्हा’ मानला जाई. उत्पन्न अगदी तुटपुंजं. मुंबईतून येणाऱ्या चाकरमान्यांच्या मनिऑर्डरवर इथल्या लोकांची उपजीविका चाले. हीच आपली नियती आहे, असं लोकांनी गृहीत धरलं होतं. आपण नियतीची ही रेषा बदलू शकतो, असं नाथ पैंनी लोकांना ठामपणे सांगितलं. त्यासाठीच्या आपल्या योजना सांगितल्या. लोकांचा त्यांच्या शब्दांवर विश्‍वास बसला. असं सांगतात की कुणकेश्‍वरच्या जत्रेतल्या पहिल्याच सभेत त्यांना मिळालेला प्रतिसाद बघून काँग्रेसचे उमेदवार मोरोपंत जोशी यांनी आपला पराभव मान्य केला. आपल्याला निवडून देणाऱ्या मतदारांची प्रतारणा नाथ पैंनी कधीच केली नाही.

      खासदार म्हणून नाथ पैंना अनेक प्रश्‍न सोडवावे लागत. भारताचे संरक्षणविषयक प्रश्‍न बिकट होते. चीन आपल्यावर युद्ध लादणार हे स्पष्ट दिसत होतं. केंद्र सरकार अत्यंत गाफील होतं. नाथ पै लोकसभेत सरकारला जागं करण्याचं काम करीत. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये नाथ पैंना लक्ष घालावं लागे. लोकांवर अन्याय होत होता. या अन्यायाच्या निवारणासाठी नाथ पै लढत होते. बेळगावचा सीमाप्रश्‍नही सुटणं आवश्‍यक होतं. या सर्व ठिकाणी नाथ पै हे लोकांचं आशास्थान होतं. नाथ पै कामांमध्ये पूर्णपणे व्यग्र होते आणि तरीही त्यांचं चित्त सतत आपल्या मतदारसंघाकडे लागलेलं होतं.

      1960 ते 1966 या सहा वर्षांच्या काळात त्यांच्या मतदारसंघात तीन वेळा वादळं झाली. घरं पडली. झाडं मोडली. रस्तेवाहतूक बंद पडली. रेल्वे तर तेव्हा कोकणात नव्हतीच. सगळी संपर्क यंत्रणाच थंडावली. वादळाचं वृत्त कळताच, प्रत्येक वेळी नाथ पै तातडीनं मतदारसंघात आले. कधी होडीनं, कधी पोहत, चालत, जमेल तसे तसे पुढे जात गावोगावी पोहोचले. लोकांची विचारपूस केली. मदतकार्याला चालना दिली. साऱ्या गोरगरिबांना वाटलं की हा आपला बांधव! ‘राजद्वारे श्‍मशाने च यस्तिष्ठति स बान्धवः’ हे सुभाषित नाथ पैंनी आपल्या वर्तनानं सिद्ध केलं. लोकनेत्याची कसोटी इथेच असते. नाथ पै कसोटीला उतरले.

      कोकणात पोस्ट ऑफिसं अपुरी होती. तार ऑफिसं त्याहूनही कमी होती. रेल्वे नसल्यामुळे बोट वाहतुकीवर जनता अवलंबून होती. बंदरांची देखभाल नीट होत नव्हती. पावसाळ्यात अपरिहार्यपणे बोटी बंद असत. नाथ पैंनी या प्रत्येक प्रश्‍नात लक्ष घातलं. अभ्यास केला. अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. कोकणाला अधिकाधिक सोयी कशा प्राप्त होतील, याचा सतत विचार ते करीत राहिले.

      कोकणच्या विकासासाठी त्यांनी कोकणविकास परिषदांचं आयोजन केलं. कोकणचे प्रश्‍न राज्यकर्त्यांसमोर मांडले. कोकणविकासासाठी स्वतंत्र महामंडळ असावं, यासाठी आग्रह धरला. चिंतामणराव देशमुख, धनंजयराव गाडगीळ अशा अर्थतज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं. प्रदेशविकासाची आत्यंतिक आच असल्याशिवाय हे शक्य नव्हतं.

      दशावतार ही कोकणची लोककला. तिचा विकास व्हावा म्हणून नाथ पैंनी दशावतारी नाट्यस्पर्धांचा प्रारंभ केला. कलावंतांच्या दुःस्थितीकडे संबंधितांचं लक्ष वेधलं. ख्रिश्‍चन बांधवांचेही प्रश्‍न समजून घेतले आणि ते सोडवले.

      कोकण रेल्वेचा पाठपुरावा त्यांनी सतत केला. कै. अ. ब. वालावलकर यांनी कोकण रेल्वेची मागणी अनेक वर्षांपूर्वी केलेली होती. या मागणीला नाथ पैंनी राजकीय पाठबळ दिलं. नाथ पैंच्या निधनानंतर प्रा. मधु दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी कोकण रेल्वेचं स्वप्न पूर्ण केलं. ‘ये सुखात कोकणात गात हर्षगीत तू’ असं म्हणत कोकणवासीयांनी कोकण रेल्वेचं स्वागत केलं.

      बेळगाव सीमाप्रश्‍न सोडविण्यासाठी नाथ पैंनी अहोरात्र परिश्रम केले. बेळगावातल्या सभेनंतरच, 17 जानेवारी 1971 ला रात्री त्यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. निधनापूर्वी एक दिवस, त्यांनी मालवण तालुक्यातल्या चौके हायस्कूलला आपला एक महिन्याचा पगार देऊ केला होता. निधनापूर्वी काही क्षण आधी, त्यांनी आपल्या जन्मभूमीत, वेंगुर्ल्याला जाण्याचा निर्धार व्यक्त केला होता. या लोकनेत्याचा अखेरचा श्‍वासही मातृभूमीच्या स्मरणात गुंतला होता.

      लोकनेते नाथ पै यांच्या स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो. त्यांच्या स्मरणाची ही संधी मला या स्पर्धेमुळे लाभली. मी आयोजकांचे आणि सर्व श्रोत्यांचे आभार मानतो.

धन्यवाद!

(बॅ. नाथ पै असाही एक लोक नेता – डॉ. विद्याधर करंदीकर)

– क्रमशः

Leave a Reply

Close Menu