जिल्हा महासंघाचे आदर्शवत काम करेन – रमण वायंगणकर

भंडारी ऐक्यवर्धक मंडळाने जी कौतुकाची थाप दिली, त्याबाबत मी आभारी आहे. आपल्यावर जिल्ह्याची जबाबदारी आल्यामुळे वेंगुर्ल्याप्रमाणे जिल्हा महासंघाचे आदर्शवत काम करेन, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे नूतन अध्यक्ष रमण वायंगणकर यांनी सत्काराला उत्तर देताना केले.

      भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्लचे विद्यमान अध्यक्ष रमण शंकरराव वायंगणकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या अध्यक्षपदी, मंडळाचे विद्यमान सचिव विकास हरिश्चंद्र वैद्य यांची जिल्हा महासंघाच्या सचिवपदी व जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणून जयप्रकाश नारायण चमणकर यांची निवड झाली. त्यानिमित्त भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्ला व समाज बांधवांकडून तिन्ही पदाधिका-यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन वेंगुर्ला येथे भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर माजी आमदार शंकर कांबळी, ज्येष्ठ साहित्यिका वृंदा कांबळी, भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळाचे उपाध्यक्ष अॅड.शाम गोडकर, जिल्हा भंडारी महासंघाचे माजी सचिव राजू गवंडे, प्रा.आनंद बांदेकर, प्रा.सचिन परुळकर आदी उपस्थित होते. 

      भंडारी समाजामध्ये चांगली रत्ने घडून गेली आहेत. रमण वायंगणकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले, त्याचा फायदा गोरगरीब, शिक्षणापासून वंचित असलेल्या, आर्थिक कोंडीत, दुर्बल घटक अशा लोकांना मदत करण्याचे काम जिल्हास्तरीय मंडळाने करावे, असे प्रतिपादन माजी आमदार शंकर कांबळी यांनी वेंगुर्ला येथे केले.

      वेताळ प्रतिष्ठान तुळस व सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी पतसंस्थाच्या वतीने तिन्ही जणांचा शाल व श्रीफळ देऊन, तसेच वायंगणकर कुटुंबियांच्या व बहुसंख्य भंडारी समाजबांधव यांच्यावतीने तिन्ही पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. अॅड.शाम गोडकर यांनी प्रास्तविक व सूत्रसंचालन तर प्रा.सचिन परुळकर यांनी आभार मानले.

 

Leave a Reply

Close Menu