कोकणची संस्कृती असलेल्या दशावतार कलेकडे दिवसेंदिवस युवा वर्गाचा कल वाढत आहे. एकट्या वेंगुर्ला तालुक्यातच सुमारे 70हून अधिक जत्रौत्सव साजरे होतात. दशावतारी नाटकांशिवाय या जत्रा अपुऱ्याच ठरतात. दशावतारी नाटकांचा एक वेगळा रसिक वर्ग आजकाल निर्माण होताना दिसत आहे. साधारण वर्षातील 8 ते 9 महिने चालणाऱ्या या नाटकांच्या माध्यमातून आपली कला जोपासताना तरुणाईला व्यासपिठाबरोबरच एक रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. काही प्रथा, परंपरा आणि मर्यादा यामुळे दशावतारी नाटकांमधून स्त्री सहभाग नसायचाच. परंतु, काही वर्षांपूर्वी महिलांनीही यात पाऊल टाकत आपली कला यशस्वीपणे सादर केली होती. वेंगुर्ला शिक्षक कलामंचातर्फे स्त्री-पुरुष यांचा समावेश असलेला ‘भौमासूर वध’ हा दशावतार नाट्यप्रयोग देखील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवून गेला. दशावतारी कलाकार नसून सुद्धा शिक्षकांनी सादर केलेली कला ही दशावतारी कलेला संजिवनी मिळण्याचेच संकेत देत असल्याचे चर्चिले गेले. मात्र, आतापर्यंत होणाऱ्या नाटकांमधून संगीत साथ ही पुरुषांनीच दिली आहे. खानोली येथील कु. भाविका लक्ष्मण खानोलकर या बारावीच्या विद्यार्थीनीने दशावतारी नाटकात पखवाज वादन करुन रसिक मनावर गारुड निर्माण केले आहे. त्यामुळे दशावताराच्या इतिहासात कु. भाविका ही पहिली ‘स्त्री’ पखवाज वादक ठरली आहे.
कु. भाविका ही भजनातून पखवाज वादन करताना सर्वप्रथम लोकांसमोर आली. तिचे आजोबा कै. काका मठकर व तिचे काका कै. घन:श्याम खानोलकर हे दशावतारात पखवाज वादन करायचे. भाविकाचे वडील लक्ष्मण खानोलकर यांचीही इच्छा होती की, आपल्याही मुलीने तो वारसा छंद म्हणून जोपासावा. अखेर त्यांची ती इच्छा दाभोली येथील गौतमेश्वर दशावतार नाट्य मंडळातून पूर्ण झाली. खानोली येथे 3 डिसेंबर रोजी पार पडलेल्या गौतमेश्वर मंडळाच्या दशावतारी नाटकात भाविका हिने पखवाज वादन करीत उपस्थितांची मने जिंकली.
भजनातून पखवाज वादन करता करता दशावतारात वाजविले जाणाऱ्या पखवाजाबद्दल कु. भाविकाला आकर्षण निर्माण झाले. आपणही असेच पखवाज वादन करावे असे तिला वाटू लागले. यासाठी युट्युबवर उपलब्ध असलेल्या दशावतारी नाटकातील विविध पखवाज वादकांचा व्हिडीओंच्या माध्यमातून तिने वादनाचा बारकाईने अभ्यास केलाच पण गौतमेश्वरचे हार्मोनियम वादक प्रल्हाद हळदणकर यांनी तिला दशावतारी पखवाज वादनाचे संपूर्ण ज्ञान दिले. त्यामुळे तिचा आत्मविश्वास आणखीनच प्रबळ बनला आणि प्रारंभीच सहज अगदी न घाबरता तिने उत्कृष्ट पखवाज वादन केले.
तीन साडेतीन तास चालणाऱ्या दशावतारी नाटकात आपल्याला जमेल की नाही याचे दडपण होते. पण नाटक सुरु झाल्यावर ती भीती आपोआपच कमी झाली. दशावतारात पखवाज वादन केल्यानंतर रसिकांनी जी मला दाद दिली त्याने आपण भारावून गेले असून नाटकातील पखवाज वादन हा आपण छंद म्हणून जोपासणार असल्याचे भाविका हिने सांगितले.
भाविका ही निलेश पेडणेकर यांच्याकडे पखवाज वादनाचे शास्त्रीय धडे घेत असून यापूर्वी पखवाज वादनाच्या तीन परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. भाविका हिची एक बहिण भजनांमध्ये हार्मोनियम वादन तर दुसरी बहिण तबला वादन करीत आहेत. घरातील हा सांस्कृतिक वारसा जोपासताना युवा पिढीलाही एका छंदाची झलक या पखवाजातील थापेच्या निमित्ताने पहायला मिळाली आहे.