पृथ्वीची काळजी!

ओमायक्रॉननावाच्या कोरोना विषाणूने संपूर्ण जग हादरून गेले आहे. जगभरात यापूर्वी दोन, काही ठिकाणी तीन लाटा येऊन गेल्या. आपल्या देशाचा विचार करताना इथे सुद्धा दोन लाटा येऊन गेल्या. पहिल्या लाटेत मनुष्यहानी बरोबरच सर्व व्यवस्था उद्ध्वस्त करून टाकल्या. वर्षभर लॉकडाऊनचा अनुभव घेतला. उद्योगधंदे, कंपन्या बंद पडल्या. अनेकांचे रोजगार गेले. जगण्याचाच प्रश्न सामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसमोर उभा ठाकला. या कोरोना प्रतिबंधासाठी लसीचा शोध लागला. देशात व्यापक प्रमाणावर लसीकरणाची मोहिम राबविली जात आहे. उद्धवस्त झालेली आरोग्य यंत्रणा बळकटकरण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून प्रयत्न झाले.

      कोरोनाचा अर्थव्यवस्थेलाही फटका बसला. शिक्षण व्यवस्थेची वाट लागली. कोरोनाचा प्रभाव ओसरू लागल्याने सर्व व्यवहार आणि जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच आता ओमायक्रॉननावाने कोरोना परत फिरला आहे. त्यामुळे जगाची धास्ती वाढली आहे. या विषाणूचा संसर्ग पूर्वीपेक्षा अनेकपटीने अधिक असल्याने सर्वच स्तरावर चिंतेचे वातावरण आढळते. पुन्हा कडक निर्बंध लावण्याचा विचार सुरू आहे. लॉकडाऊन हा उपाय नव्हे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळून व्यवहार करावेत, असे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर निसर्गाचा समतोल का बिघडला. विकासाच्या नावावर अफाट जंगलतोड, जमिनीच्या भू-भागातील पाण्याचा प्रचंड उपसा, खाणीतून होणारे उत्खनन या सा-याचा परिणाम निसर्गाचा समतोल बिघडण्यात झाला आहे. यातूनच सातत्याने वादळे येऊन धडकत आहेत. अवकाळी पाऊस आता नियमित होऊ पाहत आहे. ढगफुटी सारखा पडणारा पाऊस शेती उद्योग, बाग-बागायती यांना  हानीकारक ठरत आहे. याचा गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

      जागतिक स्तरावर तापमान वाढ आणि निसर्गाचा बिघडलेला समतोल राखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत गांभिर्याने चर्चा सुरू आहे. आपल्या देशातही विविध प्रकाराने नैसर्गिक संकटे सातत्याने येत आहेत. या पार्श्वभूमीवर जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी दिलेला इशारा या संदर्भात महत्त्वपूर्ण आहे. पृथ्वीची काळजी तुम्ही घ्याल तर ती तुमची काळजी घेईल.भूजलाचा उपसा कमीत कमी केला पाहिजे. पाण्याच्या चक्राशी कृषी चक्राला जोडले पाहिजे. पाण्याच्या किमान वापरात अधिकाधिक उत्पादन हा पॅटर्न विकसित केला पाहिजे. भविष्य वाचवायचा प्रयत्न तंत्रज्ञान करीत नाही. पाण्याचे पट्टे वाढविण्याचे काम नियोजनबद्ध झाले पाहिजे. या गोष्टी राजेंद्रसिंह सातत्याने सांगत आहेत. प्रबोधनाच्या आघाडीवर त्यांचा हा एककलमी कार्यक्रम सुरूच आहे. कोल्हापूर येथे अलिकडेच एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास देशी बियाणांचे संरक्षण आणि संवर्धन करणा-या पद्मश्री राहीबाई पोपेरे या उपस्थित होत्या.

      त्यांच्या भाषणाचे सूत्रही वरीलप्रमाणेच होते. मानवी चुकांमुळेच नैसर्गिक आपत्ती येत आहेत. मानव बदलला म्हणूनच निसर्ग बदलत आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. संकरीत वाणाने प्रगती झाल्याचे चित्र दिसते. पण ते खरे नाही. देशी वाणांचे संरक्षण झालेच पाहिजे. काळाच्या ओघात मानवाच्या जगण्यात संकरित बियाणांचे अन्न आले. प्रगतीच्या मागे धावतांना निसर्गावर आक्रमण होत आहे. परिणामी आपल्याला विविध नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्याचे परिणाम आपण अनुभवतो आहोत. मानवी जीवनात खूप महत्त्व आहे. पण आता संकरित बियाणांकडेच शेतकरी वळला आहे. देशी वाणाचे जतन करण्यासाठी प्रत्येक गावात बियाणांच्या बँका तयार झाल्या पाहिजेत. ही एक चळवळ आहे. निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी ही चळवळ बळकट करण्यासाठी प्रत्येकाने यामध्ये सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. निसर्गाच्या संवर्धनासाठी अनेक संस्था आणि कार्यकर्ते सजगतेने प्रयत्न करीत असले तरी हे प्रयत्न अजुनही अपुरे आहेत. विकासाच्या मागे धावताना आपण निसर्गाची हानी करत आहोत, याचे भान उरलेले नाही. त्यामुळेच आजची परिस्थिती निर्माण झाली आहे. पृथ्वीची काळजी घेतली नाही तर यापेक्षाही भयंकर आव्हानांना भविष्यात सामोरे जावे लागणार आहे. याची खूणगाठ प्रत्येकाने बांधली पाहिजे.

Leave a Reply

Close Menu