एसटीच्या मरणकळा

    एसटी शहरातील आणि गाव-खेड्यातील लोकजीवनातील अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणेच जीवनावश्यक साधन बनून राहिलेली. हिच्या रंगावरुन हिला दिलेलं लाडकं नाव ‘लालपरी!‘

    एकेकाळी पु.ल.देशपांडे यांनीही आपल्या लिखाणातून एसटीतून प्रवास करताना येणा-या गंमतीजंमती विषद केल्या होत्या. त्याकाळी एसटीचाही एक वेगळा रुबाब होता. मुंगीलाही शिरायला जागा मिळणार नाही एवढी खचाखच एसटी भरलेली असायची. ‘गाव तेथे एसटी‘   गेल्याने मुलांना शिक्षणाच्या सोईसाठी तालुक्याच्या ठिकाणी जाता येऊ लागले. त्यासाठी तिकिटांच्या दरात त्यांना सवलतीही मिळाल्या. नोकरदारांना, पत्रकारांना, आमदार, खासदार, दिव्यांग अशा सुमारे सत्ताविस प्रकारच्या सवलती एसटी महामंडळ आपल्याला देत आहेत. एवढेच नव्हे तर मतपेट्या, लग्नाचे व-हाड यासाठी एसटीच सोईची वाटू लागली. इतके एसटीने सर्वांशीच जिव्हाळ्याचे नाते जपले. प्रसंगी जनसामान्यांचा उद्रेकही एसटीने सहन केला. ‘आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी‘ याप्रमाणे समाजातील होणा-या दंगलींमध्ये काडीचा संबंध नसताना एसटीची मोठ्या प्रमाणात झालेली तोडफोड सुद्धा तिने सहन केली. वस्तीच्या ठिकाणी असलेल्या अपु­­-या सोईसुविधांमुळे एसटीप्रमाणेच वाहक आणि चालकांनीही तेथील गैरसोय अनुभवली. ठिकठिकाणचे खराब रस्ते, खराब हवामान, वादळी वारापाऊस यांना तोंड देत प्रवाशांची सुखरुप ने-आण करण्याचे व्रत एसटीने नेहमीच जपताना सुरक्षित प्रवासाची हमी दिली आहे. पण राजकीय हस्तक्षेप आणि भ्रष्टाचाराच्या घटनांमुळे एसटीच्या नशिबी उपेक्षितांचे जीणे आले. खरेतर पासच्या स्वरुपात वर्ष किवा महिन्यांची आगाऊ रक्कम एसटीकडे आधीच जमा होते. असे असतानाही एसटीचे कंबरडे नेहमीच मोडलेले का? असा प्रश्न निर्माण होतो. मोडकळीस आलेल्या एसटीलाच मुलामा देताना बिल मात्र नविन खरेदीचे लावत राजरोसपणे एसटी कशी तोट्यातच आहे याचे गोडवे गायले गेले. ‘ना नफा, ना तोटा‘ या तत्त्वावर आपला रुबाब सांभाळत आत्तापर्यंत एसटी तग धरुन होती.

    परंतु, आता भिती वाटू लागली. कारण, माणुस हा सवयीचा गुलाम आहे. भलेही कोरोना काळात सुरुवातीला जीव मुठीत घेऊन एसटीने सेवाभावी वृत्ती जपली. मात्र, सर्वच जेव्हा ठप्प झाले तेव्हा विश्रांती घेण्यापलिकडे एसटीकडे पर्यायच उरला नाही. यातून सावरत असतानाच संपाने डोके वर काढले. शासनाने पगार वाढ केली पण, तिही नविन कर्मचा-यांचा पगार हा जुन्या कर्मचा-यांच्या पगाराबरोबरच ठेवला. साहजिकच २५ ते ३० वर्षे सेवा करुनही वाढलेल्या या तुटपुंज्या पगारामुळे कर्मचा-यांच्या भावना या दुखावल्याच. शिवाय, कर्मचा-यांचा आत्तापर्यंतचा अनुभव असा की, ‘एसटी तोट्यात आहे, आता थोडे अॅडजेस्ट करा‘ असे सांगत एक-दोन वर्षापूर्तीच मर्यादित राहताना भविष्यात ती  पगारवाढ कागदावरच रहाते. त्या कर्मचा-यांच्या बँक खात्यात काही येत नाही. प्रश्न उपस्थित होतो हा सर्व पैसा जातो कुठे? आणि कसा?

    माणूस सवयीचा गुलाम असल्याने एसटीच्या असण्याची जशी आपल्याला सवय लागली तशीच आता ‘एसटी नाही‘ याची सवय होऊ लागली आहे काय? असं होऊ लागलं असेल तर खरचं काळजीची बाब आहे. कारण, हा संप मुंबईत १९८२ सालात सुरु झालेल्या गिरणी कामागारांच्या संपाची आठवण करुन देतो. त्या सपात गिरणी कामगार कायमचा देशोधडीला लागला. गिरणीच्या भोंग्यावर आयुष्याचे वेळापत्रक आखलेल्या मुंबईकरांना त्याचाही हळुहळू विसर पडला. नविन वातावरणात त्यांनी आयुष्य सुरुही केले. तशी अवस्था आपल्या हक्काच्या ‘लालपरी‘च्या बाबतीत होऊ नये, संप कधी सुरु करावा, कधी संपवावा, शासनानेही किती ताणावे यालाही काही मर्यादा आहेत. गिरणी कामगाराप्रमाणेच होऊ नये यासाठी एसटीचे कामगार, कर्मचारी, संघटनांचे पुढारी व शासनानेही सामोपचाराची भूमिका स्विकारली पाहिजे. दोन्ही पक्षांनी तारतम्याने निर्णय घ्यायला हवेत. असे करताना आपल्या संपाचा लोकजीवनावरही विपरीत परिणाम होतो आहे याचं भानही दोन्ही पक्षांनी बाळगणे आवश्यक आहे.

       एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनीच. तुटपुंज्या आणि कधीही वेळेवर न मिळणा-या पगारासाठी आणि एसटी महामंडळे शासनात विलनीकरण करण्याच्या मागण्यांसाठी २८ ऑक्टोबर २०२१ रोजी एसटी कर्मचारी संघटनांनी संपाचे शस्त्र उचलले. या घटनेला आता दोन महिन्यांपेक्षा आता जास्त काळ उलटून गेला आहे. या दरम्यान, एसटीच्या येण्याजाण्यावर ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसांचं दैनंदिन आयुष्यातील वेळापत्रक साफ बिघडून गेलं आहे. दरम्यान, शासनाने महामंडळाच्या कामगार कर्मचा-यांची पगार वाढीची मागणी मान्य केली असली तरी महामंडळांचे विलनीकरण शक्य नाही असे ठामपणे सांगितले. या संप कालावधीत मिळणारा तुटपुंजा का होईना पगार बंद झाल्याने आणि बडतर्फीची टांगती तलवार डोक्यावर असल्याने झालेल्या कोंडीत सापडून एसटीच्या सुमारे ६० ते ६५ कर्मचा-यांनी आत्महत्त्येचा पर्याय स्वीकारला. म्हणून सद्यस्थितीत एसटीचा हा संप नसून संघटना बाजूला ठेऊन सर्व कर्मचारी वर्गच ‘आमची कामावर जाण्याची इच्छाच आता उरली नाही, आमचे बांधवच आमच्या सोबत नाहीत. आपल्या जवळच्या व्यक्तींचा दुखवटा आम्ही नाही पाळणार तर कोण पाळणार?‘ अशा भावना व्यक्त करण्यासाठी अजून एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले नाहीत. दोन्ही बाजू आपापल्या म्हणण्यावर ठाम आहेत आणि भविष्यात हे सर्व कोणत्या दिशेला जाणार आहे याचा सध्यातरी अंदाज बांधणे अवघड आहे.

    राजकारण बाजूला ठेऊन दोन्ही बाजूने योग्य निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे. एकमेकांप्रती असलेली कटुता, अढी दूर सारणेच एकंदर एसटीच्या भवितव्याच्या दृष्टीने हितावह ठरेल. कालपर्यंत ‘एसटीमय‘ झालेले ग्रामीण भागातील जीवन ‘न एसटीमय‘ व्हायला वेळ लागणार नाही. काहीच सोय होत नाही म्हणून माणूस फार काळ अडकून राहणार नाही. तो पर्यायी मार्ग काढेलच. एसटीचं नसणं लोकांच्या सवयीचं होऊन गेलं सगळंच कठीण होऊन बसेल. एसटीने तग धरावा, त्याच्यावर अवलंबून असलेले कामगार, कर्मचारी यांना योग्य तो न्याय मिळावा. सर्वसामान्य माणसाची जगरहाटी पुन्हा एकदा ‘लालपरी‘ सोबत सुरु व्हावी अशी आम जनतेची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Close Menu