वेंगुर्ल्यातील पत्रकारांची निःपक्षपाती पत्रकारिता अभिमानास्पद

वेंगुर्ला तालुका पत्रकार समितीतर्फे ६ जानेवारी रोजी पत्रकार संघाच्या कार्यालयात माजी नगराध्यक्ष दिलिप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी सभापती अनुश्री कांबळी यांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जिल्हा कार्यकारीणी सरचिटणिस प्रसन्ना देसाई, तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष प्रदिप सावंत, उपाध्यक्ष के. जी. गावडे, दाजी नाईक, जिल्हा कार्यकारीणी सदस्य भरत सातोस्कर, सचिव अजित राऊळ, सहसचिव विनायक वारंग, सिमा मराठे, दिपेश परब, अजय गडेकर, प्रथमेश गुरव, योगेश तांडेल, आपा परब, प्रसाद परुळकर आदी उपस्थित होते.

      दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर व केसरीकार लोकमान्य टिळक यांचा पत्रकारीतेचा वारसा वेंगुर्ल्यातील पत्रकार निःपक्षपाती करुन पुढे चालवीत आहेत, हे अभिमानास्पद आहे असे प्रतिपादन सभापती अनुश्री कांबळी यांनी केले. तर त्याकाळात शासनावर अंकुश ठेवण्यासाठी व सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाटी दूरदृष्टी ठेवून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरु केले आणि त्यांचा वारसा आजही पत्रकार जोपासत आहेत असे गौरवोद्गार माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी काढले. तसेच प्रसन्ना देसाई यांनी वेंगुर्ल्यातील पत्रकार सर्वसमावेशक पत्रकारीता करीत असून त्यांचा तालुक्यातील विकासामध्ये योगदान असल्याचे सांगितले. यावेळी प्रदिप सावंत यांनी पत्रकार दिनाची पार्श्वभूमी व आजच्या पत्रकारीतेची आव्हाने यावर माहिती दिली.

      यावेळी कुडाळ पत्रकार समितीचा व्याधकार ग.म.तथा भैयासाहेब वालावलकर जिल्हास्तरीय उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल दै. तरुण भारतचे तालुकाप्रतिनिधी के.जी.गावडे व सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचा जेष्ठ पत्रकार पुरस्कार दै. तरुण भारतचे तुळस प्रतिनिधी महादेव उर्फ आपा परब यांना मिळाल्याबद्दल दिलिप गिरप व सभापती अनुश्री कांबळी, प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन के.जी.गावडे व आभार दाजी नाईक यांनी मानले.

Leave a Reply

Close Menu