५० वर्षावरील कलाकारांना मानधन मिळण्यासाठ प्रयत्न सुरु – परशुराम गंगावणे

कलावलय वेंगुर्ला आयोजित बी.के.सी.असोसिएशन, मुंबई पुरस्कृत स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २०२२चे उद्घाटन पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते ७ जानेवारी रोजी झाले. नगरपरिषदेच्या नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात सुरू असलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटनाला व्यासपिठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष ख्यातनाम चित्रकार अरुण दाभोलकर, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, प्रा.यरनाळकर यांच्या कन्या समिता यरनाळकर, कलावलयचे अध्यक्ष सुरेंद्र उर्फ बाळू खांबकर, परीक्षक संजय हळदीकर, सुहास भोळे यांच्यासह कलावलयचे संजय पुनाळेकर, सुनील रेडकर, जितेंद्र वजराठकर, दिगंबर नाईक, दाजी परब, पंकज शिरसाट, चतुर पार्सेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

          प्रगतीकडे झेपावणा-या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कलागुण संपन्न कलाकार रुपी एक एक रत्न आता बाहेर पडायला लागली आहेत. त्यातील एक माझ्यासारख्या सामान्य कलाकाराला पद्मश्री पुरस्कार मिळाला. माझ्यातील कला आणि कलागुण मी जिवंत ठेवले त्यामुळे मला हा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार माझा नसुन तो सिंधुदुर्गचा आहे आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. माझी कला जोपासताना जिल्ह्यातील ५० वर्षांवरील दशावतार, भजन, नाटककार अशा सर्व कलाकारांना शासनाकडून मानधन मिळावे यासाठी मी आता प्रयत्न करीत असून कलाकारांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे, असे प्रतिपादन पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे यांनी केले.

      एखादी कला ही फक्त कला न रहाता ती व्यवसाय बनतो तेव्हा ती कला आणखीन चांगली करण्याचा प्रयत्न करतो. वेंगुर्ला प्रा.यरनाळकर सरांची ही विद्यार्थी मंडळी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना या संस्थेच्या माध्यमातून गेली पंचवीस वर्षे त्यांच्या कलेच्या ठेव्याची जपणूक केली हे वाखाण्याजोगे असल्याचे मत चित्रकार अरुण दाभोलकर यांनी व्यक्त केले. तर माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी संस्थेच्या २५ व्या वर्षी माझ्या कारकिर्दीतील या चांगल्या सभगृहात एकांकिका होत आहेत, हे पाहून समाधान वाटत असल्याचे सांगितले.

      यावेळी संस्थेतर्फे सर्पमित्र महेश राऊळ आणि रांगोळीकार पिंटू कुडपकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच सहभागी संघांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पुनाळेकर यांनी तर आभार सुनील रेडकर यांनी मानले.

 

Leave a Reply

Close Menu