सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनारी वसलेलं एक छोटसं शहरपरंतु शहर छोटं असलं तरी सांस्कृतिकदृष्ट्या या शहराची भव्यता फारच मोठी. कारण गेल्या अनेक वर्षांपासून या शहराला एक सांस्कृतिक वारसा आहे. नाटककार कै. मधुसुदन कालेकर, कवि नाटककार कै. चिंतामणी त्र्यंबक खानोलकर उर्फ आरती प्रभू, कै. मंगेश पाडगावकर, कै. जयवंत दळवी आणि कितीतरी रत्ने याच मातीतलीत्यामुळे हा सांस्कृतिक वारसा पुढे पुढे चालूच राहिला आणि त्यामध्ये एक विलक्षण नाट्यप्रतिभा असणारा तारा या वेंगुर्ल्यामध्ये उदयास आला. प्रा. शशिकांत यरनाळकर

      येथील बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयामध्ये ते नोकरीच्या निमित्ताने आले आणि बघता बघता अस्सल वेंगुर्लेकर बनून गेले.

      वेंगुर्ल्यातील अनेक नाट्यप्रेमी आपापल्या वाडीमध्ये वस्त्यांमध्ये पडद्याची नाटकं बसवून वेंगुर्ल्यातील नाट्यपरंपरा आणि नाटकांचा वारसा पुढे चालवित होतेच. परंतु शशिकांत यरनाळकर या नाट्यवेड्या माणसाने वेंगुर्ल्यातील रंगकर्मींना आणि नाट्यरसिकांना एकत्र करूनकलावलय’, वेंगुर्ला या नाट्यसंस्थेची निर्मिती केली. 15 ऑगस्ट 1978 साली या संस्थेची निर्मिती आणि स्थापना करण्यात आली.एकांकिका आणि नाटक या माध्यमातून या संस्थेने वेंगुर्ल्यातच नाही तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपला असा एक वेगळाच ठसा प्रभावीपणे उमटवायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळामध्येभोवरा’, ‘काळे बेट लाल बत्तीयासारखी नाटकं सादर करून एक उत्कृष्ट नाट्यानुभव वेंगुर्लेवासीयांना दिला. कणकवली येथे दरवर्षी होणाऱ्या बॅ. नाथ पै एकांकिका स्पर्धांमध्ये दरवर्षी एकापेक्षा एक अशा सरस एकांकिका सादर करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील नाट्यप्रेमींना एक स्वतःची अशी ओळख या संस्थेने निर्माण केली.

      या स्पर्धेमध्ये 1981 साली सादर केलेल्यारिप्लेसमेंटया एकांकिकेने एक नवा विक्रम प्रस्थापित केला. सर्वोत्कृष्ट अभिनय, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट तांत्रिक अंग आणि सर्वोत्कृष्ट एकांकिका या पाचही प्रकारामध्ये प्रथम क्रमांक मिळवून जो विक्रम प्रस्थापित केला तो आजही अबाधित आहे.

      त्यानंतर अनेक स्पर्धांमध्ये दरवर्षी वेगवेगळ्या दर्जेदार अशा एकांकिका या संस्थेने सादर करून नाट्यरसिकांची वाहवा आणि भरभरून पारितोषिके मिळविली. त्यामध्येपहाटे चार वाजून दहा मिनिटांनी’, ‘दार कुणी उघडत नाही’, ‘तमाशा ऑफ ह्युमॅनिटी’, ‘होळी’, ‘ढोल वाजतोय’, ‘परिवर्तन’, ‘नाटकातल्या नाटकात नाटक’, ‘अब्द शब्दआणिखेळ खेळीयाचाया नाट्यकृतींनी तर चार चांद लावले. या सर्व एकांकिकांना सर्व स्पर्धांमध्ये भरपूर यश मिळाले आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

      दिग्दर्शक यरनाळकर सर यांच्या एकांकिका किंवा त्यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकासाठी प्रेक्षकवर्ग हाऊसफुल्ल गर्दी करीत असत. त्याकाळात स्वतः यरनाळकर सरांच्या विविध एकांकिकांमधील भूमिका म्हणजे अभिनयाच्या परिसीमा ठरल्या आहेत.

      त्यानंतर यरनाळकर सरांच्या दुःखद निधनामुळेकलावलयला थोडा सेटबॅक सहन करावा लागला. परंतु यरनाळकर सरांनी घडविलेल्या त्यांच्या शिष्यांनीकलावलयची धुरा यशस्वीपणे सांभाळत जोरदार पुनरागमन करीत नाट्यरसिकांची मने पुन्हा एकदा जिंकण्यास सुरुवात केली.

      नाटकांच्या विविध अंगांवर प्रकाश टाकणारा आणि रंगकर्मींना मार्गदर्शक ठरणारा असारंगमेळाहा कार्यक्रम या संस्थेने आयोजित करुन जिल्ह्यातील नाट्यप्रेमींना एक उत्कृष्ट अशी नाट्यमेजवानी दिली.

      या नाट्यमेळ्याकरिता सर्वश्री मोहन आगाशे, सतिश आळेकर, रघुवीर तळाशीलकर, कमलाकर नाडकर्णी, समर नटवाते, बाबुलनाथ कुडतरकर, विष्णू सूर्या वाघ, राजीव शिंदे, इत्यादी दिग्गज दिग्दर्शक, लेखक, अभिनेते, रंगभूषाकार यांचे परिसंवाद ठेवण्यात आले. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नाट्यसंस्था, रंगकर्मी आणि नाट्यप्रेमींना आमंत्रित करण्यात आले. सरांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. मुलांसाठी आणि तरुणांसाठी नाट्यप्रशिक्षण शिबीरे घेण्यात आली. त्यामध्ये सर्वश्री संजय हळदीकर, सचिन गोस्वामी, सचिन मोटे, विनायक दिवेकर, बाबा शिंदे . दिग्गज रंगकर्मींचे मार्गदर्शन मुलांना मिळाले.

      हे सर्व चालू असताना नाटक बसविणे आणि सादर करणे हे कार्य सुरुच होते. त्यामध्येकागपंथ’, ‘सभ्य गृहस्थ हो’, ‘माकड’, ‘प्रवास आठवणींचाही नाटके या संस्थेने सादर करून महाराष्ट्र राज्य हौशी राज्य नाट्यस्पर्धेसाठी आपल्या संस्थेची एक सुंदर नाट्यानुभव देणारी संस्था अशी ओळख निर्माण केली. सन 2017 सालामध्ये 57 व्या राज्य नाट्यस्पर्धेमध्ये तर या संस्थेने प्राथमिक फेरीमध्ये सादर केलेल्यानिखारेया नाटकास द्वितीय क्रमांक मिळाला. तसेच दिग्दर्शनाचे द्वितीय पारितोषिक, एक रौप्य आणि एक प्राविण्य पदक प्राप्त होऊन अंतिम फेरीमध्ये या नाटकाची निवड झाली.

      सिंधुदुर्गच्या नाट्यइतिहासामध्ये अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारीकलावलयही जिल्ह्यातील पहिली संस्था ठरली. तत्पूर्वी 57 वर्षांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकही संस्था राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरली नव्हती, तो बहुमानकलावलयया संस्थेस प्राप्त झाला.

      यरनाळकर सरांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती चिरंतन रहाण्यासाठीकै. शशिकांत यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धावेेंगुर्ल्यातील ओेंकार कलाक्रीडासांस्कृतिक मंडळ आणि कलावलय यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आली. काही वर्षानंतर आयोजनाची पूर्ण जबाबदारी कलावलय संस्थेने स्वीकारली. मुंबई, पुणे, रत्नागिरी, सांगली, सातारा, कोल्हापूर, गोवा याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुद्धा नाट्यसंस्था दर्जेदार अशा एकांकिका या स्पर्धेमध्ये सादर करून नाट्यरसिकांना एक चांगला नाट्यानुभव देत असतात.

      ‘कलावलयया संस्थेने 2019 मध्येसिनेकथाकिर्तनया संस्थेचे सर्वेसर्वा निर्माते, लेखक, दिग्दर्शक श्री. अमरजीत आमले यांनी कलावलयतर्फे नवोदित मुलांसाठी दर महिन्याला कार्यशाळा आयोजित केल्या. या कार्यशाळेतून मुलांना फिल्म प्रोसेसिंगची सर्व माहिती देण्यात आली. सिनेमॅटोग्राफी, दिग्दर्शन, एडीटींग, डबिंग, लाईटस्‌, कलर्स या सिनेमातील विविध अंगांची विस्तृत माहिती श्री. आमलेसर, विजय कलमकर आणि त्यांची सर्व टीम दर महिन्यामध्ये 2-3 दिवसांसाठी मुंबईतून वेंगुर्ल्यात येऊन ही कार्यशाळा जवळ जवळ वर्षभर देत असत. त्यानंतर याचसिनेकथाकिर्तनच्या निर्मितीचाकुर्लाटूवेंगुर्लाहा चित्रपट तयार करणेत आला. त्याचे 90 टक्के चित्रीकरण वेंगुर्ला येथे झाले. या चित्रपटनिर्मितीमध्येकलावलयची सर्व मुले (प्रशिक्षणार्थी) सहभागी झाले होते. तसेचकलावलयच्या काही ज्येष्ठ रंगकर्मीना या चित्रपटामध्ये रोल देण्यात आले. लवकरचकुर्लाटूवेंगुर्लाहा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

      यावर्षी या एकांकीका स्पर्धेचे 25 वे वर्ष दिमाखात साजरे झाले. कै. यरनाळकर सरांच्या पश्चात सरांचे सर्व शिष्यकलावलयचे शिवधनुष्य यशस्वीपणे आणि समर्थपणे सांभाळून यरनाळकर सरांच्या आत्म्यास मानवंदना देत आहेत.

      कै. शशिकांत यरनाळकर यांनी लावलेल्या या रोपट्याचे रुपांतर आता वटवृक्षामध्ये झालेले आहे. त्याचा शाखा विस्तार वाढत राहो आणिकलावलय’  संस्थेचा अधिकाधिक नावलौकिक उत्तरोत्तर वाढत जावो हीच याप्रसंगी नटराजाच्या चरणी विनम्र प्रार्थना.

– संजय पुनाळेकर

उपाधध्यक्ष- कलावलय,

9422434874

Leave a Reply

Close Menu