दशावतारया लोककलेला सुमारे ८०० वर्षांपेक्षाही अधिक समृद्ध वारसा आहे. रात्री राजा आणि सकाळी डोक्यावर बोजाअसणा-या कलावंतांनी आत्तापर्यंत अनेक स्थित्यंतरे पाहिली. दशावतार या लोककलेचे जतन करणा-या मंडळांना शासनाने प्रोत्साहन दिले आहे. त्याचबरोबर दशावताराला तळकोकण आणि गोव्यामध्ये मोठा लोकाश्रय आहे. त्यामुळे या कलेविषयी नविन पिढीलाही आस्था आहे. सिधुदुर्गात शेकडो दशावतार मंडळे आहेत. तर एकट्या वेंगुर्ला तालुक्यात ४० पेक्षा जास्त दशावतारी मंडळे कार्यरत आहेत. या कलेसाठी शिक्षणाची अट नाही, खुप मोठ्या पूर्वानुभवाचीही गरज नाही. फक्त आवश्यक आहे ते त्या कलेची मनापासून आवड असणे. कुठल्याही वेळी एखादे पात्रं रंगविण्याची तयारी या कलेत असणा-या कलाकाराला आवश्यक असते. भाषेचा अडसरही या लोककलेला येत नाही. मालवणी बोलीभाषा असणारे कलाकार उत्तम मराठीत संवाद फेक करुन दशावतार रंगवतात. लोककलेचे अभ्यासक कै.तुलसी बेहरे यांनी तर दशावतारी नाटक दिल्लीच्या राष्ट्रीय व्यासपीठावर सादर केले. दशावतारामध्ये कालानुरुप बदल होत गेले.  महिला दशावताराचा प्रयोग, स्त्री-पुरुष एकत्रित असा नाट्यप्रयोग आणि पखवाज वादन करणारी मुलगी कु. भाविका खानोलकर असे बदल स्विकारले जात आहेत.

       विशेषतः स्त्री भूमिका रंगविणा-या पुरुष पात्राला नाटकात सहज दाद मिळते. परंतु, समाजात अशा भूमिका करणा-या कलाकारांना काही अडचणींना सामोरे जावे लागते. विशेषतः तरुण कलाकारांची लग्न न जमणे ही समस्या असल्याचे कलावंत सांगतात. पिगुळी येथील मंडळी या संस्थेने बिलिमारोया एकांकिकेतून या समस्या नेमकेपणाने मांडल्या आहेत. ज्या प्रमाणे बिलिमारो हे उपेक्षित पात्र, त्याप्रमाणे हे विशेषण शिक्षणात विशेष प्रगती करु न शकणा-या व्यक्तीला वापरले जाते. मंडळी हे नाव वापरुन संस्थेने तथाकथित मापदंडांना सुरुंग लावले आहेत.

        या एकांकिकेने परिक्षकांसोबत रसिक प्रेक्षकांची मने जिकली आहेत. आत्तापर्यंत या एकांकिकेला कणकवली, वेंगुर्ला, इचलकरंजी येथील राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धांमधून प्रथम क्रमांक तर मुंबई येथील अटल करंडक स्पर्धेत बिलिमारोया एकांकिकेने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. पिगुळी-कुडाळ येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एकांकिकेत लोककलावतांच्या व्यथा प्रभाविपणे मांडताना कुठेही भावनातिरेक होणार नाही याची काळजी घेतली आहे.

        दशावतारी नाटक म्हणजे नेमके काय हे सांगताना बिलिमारोया पात्राला प्रकाशझोतात आणले आहे. तळी घेऊन उपस्थित रसिकांमध्ये फिरुन गणपतीचा आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहचवण्याबरोबरच बॅगा उचलणे, जेवण करणे, इतर कलाकारांना सहकार्य करणे अशी कामे हा बिलिमारोसाकारणारी व्यक्ति करते. बिलिमा-याच्या तळीत प्रत्येकजण स्वईच्छेने पैसेही ठेवतात. या पैशाचा विनियोग दशावतारी पेटा-यात असलेल्या गणपतीच्या तेलवातीसाठी केला जातो. रसिकांच्यादृष्टीने या बिलिमारा-याला इतर कलाकारांएवढे महत्त्व नसते. मात्र, ‘मंडळींनी एकांकिकेच्या माध्यमातून बिलिमारोया पात्राचे महत्त्व अधोरेखित केले आहे. खरेतर कुठचीही भूमिका ही लहान किवा मोठी असा भेदभाव न करता ती आत्मियतेने साकारणे हे ख-या कलावंताचे काम आहे. परंतु, प्रमुख भुमिकाच लक्षात ठेवणारे आपल्यासारखे भरपूर जण बिलिमारोची दखल फक्त तळीमध्ये पैसे ठेवण्यापुरतेच मर्यादित ठेवतात.

बिलिमारोच्या निमित्ताने मानवी मनाचे भावतरंगच जणू काही समोर आले आहेत. प्रसंगात खांद्याला खांदा लावून उभे रहाणे, पळून न जाता परिस्थितीनुरुप होणा-या बदलांना खंबीरपणे सामोरे जाणे, संघर्ष करणे, प्रसंगी मनाला मुरड घालणे, कोणत्याही प्रसंगात एकमेकांची साथ न सोडणे हे मानवी स्वभावाचे पैलू आपल्याला नाट्य किवा कुठल्याही लोककलेत दिसून येतात.

        ‘बिलिमारोएकांकिकेने रसिक प्रेक्षकांवर बिलिमारोचे गारुड निर्माण केले आहे. त्याबद्दल ही एकांकिका सादर करणा-या मंडळी या संस्थेतील कलाकारांचे हार्दिक अभिनंदन!

Leave a Reply

Close Menu