अशोकाचा फुनॅल आणि आरवलीचो वेतोबा….!

राऊळांच्या वाड्यातील एक व्यक्ती विशेष म्हणजे कोलगावकरांचे धाकटे चिरंजीव अशोक ऊर्फ अशोकराव कोलगावकर. मध्यम चणीचा बांधा, गोरा वर्ण, तीष्ण नजर, चालीत सदैव पाठीला बाक आणि चौकस वृत्ती. शरीर लहानपणापासुन किरकोळ. बालपणीच्या आजारपणापासुन शरीर सुधारले नाही. कोकणातल्या वातावरणाप्रमाणे धार्मिक वृत्ती. सतत बदलत जाणारी. ‘अमक्या कडे तमका झाला’, बातमी पहिल्यांदा अशोककडे येणार. पण एक बरे होते, बातमीची शहानिशा केल्याशिवाय अशोकाने बातमी कधी प्रकाशित केली नाही. पूजा म्हणु नको की लग्न समारंभ. अशोकची स्वारी हजर. टापटीप कसे रहावे हे या बालब्रम्हचाऱ्याकडुन शिकुन घ्यावे. जितका बेरका तितकाच मायाळू आणि हळवा. आज किरातच्या जाहिराती तोच गोळा करतो. लहानपणी आई गेली वडीलांच्या छत्र छायेत बालपण गेले. तरुणपणात काही वर्षे वडीलांचा आबांचा सहवास लाभला, पुढे तेही वारले. मोठ्या भावाचे प्रभाकरचे अकाली निधन झाले, नंतर सुरु झाले वहिनीचे राज्य. पण माऊली त्याला लाख मिळाली. शिस्तबद्ध वहिनीने तीन मुली आणि एका मुलाला सांभाळले. अशोकराव अधुनमधून खटक्यांचे फटाके फोडायचे. पण ते भांडण क्षणैक असायचे. ही व्यक्ती कमालीची भाविक. या भाविकपणाच्या वेडातुन आंबे खणात ह्याने नवनाथांची घुमटी बांधली इतका हा भाविक. जत्रा असो की इतर कार्यक्रम असो सोबत जर कोण असेल आणि त्याची सोबत शेवटपर्यंत मिळत असेल तरच बॅटरी घेऊन घराबाहेर पडणार.. अनंत प्रकारे मिळकत कमावण्याचे झाले पण यश काही आले नाही. शेवटी अशोकाने निर्धार केला व एकदिवस रेकॉर्ड प्लेअर आणि भोंगा स्पिकर घेऊन आला. दोन दिवसांनी वेंगुर्ल्यात समजले अशोकने फुनॅल आणले. तो स्पिकर फुनेलाच्या आकाराचा असल्याने लोकांनी त्याचे बारसे   परस्पर फुनॅल नाव देऊन केले. गणपती आणि काही प्रासंगिक कार्यक्रम वगळता हा प्रयत्न सुद्धा फसला. शेवटी श्रीधर मराठे यांच्याकडे अशोक कोलगावकर किरातमध्ये चिकटले. बरेच पावसाळे पाहिले, बरेच अनुभव घेतले. अनंत दुःखे पचवली. परंतु परिस्थितीला शरण न जाता अजुनही अशोक वेंगुर्ल्यात चालतो आहे. चेहऱ्यावर नेहमी हास्य. गोड बोलण्याची लकब.. आणि स्वामी समर्थांचे ओठावर असणारे सतत नाव ह्या शिदोरीवर त्याची जीवननौका आजही विहरते आहे. कधी साटम महाराज, कधी गगनगिरी महाराज, कधी स्वामी समर्थ, राऊळ महाराज, गजानन महाराज, नामदेव महाराज यांचे उत्सव कधीही न चुकवणारा अशोक वेंगुर्ल्याचे हेरिटेज वैशिष्ट्य आहे. बाबांनो कधी गेलास वेंगुर्ल्यात तर राऊळवाड्यातील कोलगावकरांच्या अशोकाला भेटण्यास विसरू नका. अशोक ही शब्दबध्द करणारी व्यक्ती रेखा नाही, तो वेंगुर्ल्याचा चालताबोलता बातमीदार आहे. प्रत्यक्ष बघण्याचा आणि अनुभवायचा.

      आरवलीच्या वेतोबा देवळापासुन चालत वेंगुर्ल्यात येण्याची पैज मारणारा आणि वीस मिनिटात मला रिक्षाने घरी घेऊन जा सांगणारा अशोक स्वभावाने सालस तर कोकणी इरसालपणा असणारा, परंतु मनात काही नसणारा माणुस. खरोखरच वेंगुर्ला अनुभवायचा असेल तर त्याका भेटा. मित्रा सदैव भिऊ नको, मी तुमच्या पाठीशी आहे म्हणुन तत्पर! अशोक तुला उदंड आयुष्य देव रामेश्‍वर मानसीवयल्याने देवो ही प्रार्थना!

– उमेशचंद्र प्रभू, वरळी

9892833584

Leave a Reply

Close Menu