नगराध्यक्ष दिलीप गिरप हे खऱ्या अर्थाने लोकसेवक – ॲड. देवदत्त परुळेकर

जनतेतून निवडून येणारे राजकीय नेते हे लोकसेवक (पब्लिक सर्वंट) असतात. परंतु, सत्ता हाती आल्यावर आपण लोकसेवक आहोत याचा विसर पडतो. सत्तेची धुंदी डोक्यात जाते आणि मनमानी कारभार सुरु होतो. पण या सर्वाला अपवाद ठरले ते वेंगुर्ल्याचे नगराध्यक्ष दिलीप गिरप. पाच वर्षात वेंगुर्ला शहरात पूर्ण झालेली विकासकामे राजकारण बाजूला ठेऊन, सर्वांना सोबत घेऊन केल्याने गिरप यांची कारकिर्द ख-या अर्थाने यशस्वी ठरली आहे. अर्थात, शहराच्या वैभवात भर घालणा-या वैशिष्ट्यपूर्ण वास्तूंची देखभाल आणि देखरेख होणे तितकेच गरजेचे आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक ॲड.देवदत्त परुळेकर यांनी केले.

      वेंगुर्ल्याचे लोकप्रिय नगराध्यक्ष दिलीप गिरप यांचा नागरी सत्कार 22 जानेवारी रोजी येथील साई डिलक्स हॉल येथे संपन्न झाला. यावेळी ॲड.परुळेकर बोलत होते. पुढे बोलताना म्हणाले की, शहरातील विकास कामात राजकारण आणू नये हा दिलीप गिरप आणि त्यांच्या टीमने घालून दिलेला परिपाठ सर्वांसाठी आदर्शवत आहे. जागरुक नागरिकांनी देखील आपण मत घालताना कोणाला निवडून देत आहोत याचेही भान ठेवणे आवश्‍यक आहे. चांगल्ो लोक राजकारणात राहिले तरच नागरिकांच्या अपेक्षेनुसार विकास होऊ शकेल.

      यावेळी व्यासपिठावर दै.तरुण भारतचे आवृत्तीप्रमुख शेखर सामंत, संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक ॲड.देवदत्त परुळेकर, महाराष्ट्र कॅश्‍यू असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर, स्वच्छता दूत सुनिल नांदोस्कर, माजी नगरसेवक सुहास गवंडळकर आदी उपस्थित होते.

      कार्यक्रमाच्या प्रारंभी शहरातील विकासकामांची माहिती देणारे ध्वनीचित्रफित दाखविण्यात आली. नगराध्यक्ष गिरप यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते नागरी सन्मान करण्यात आला. याच कार्यक्रमात नगराध्यक्ष गिरप यांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत असणारे माजी नगरसेवक प्रशांत आपटे, न.प.चे कलादालन साकारणारे, क्रॉफर्ड मार्केट, मच्छिमार्केटच्या भिंती सजीव करणारे चित्रकार सुनिल नांदोस्कर यांचाही शाल, श्रीफळ, मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. माजी नगरसेवक सुहास गवंडळकर यांचा शाल, श्रीफळ देऊन प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला. हे सत्कार समारंभ दिलीप गिरप यांचा मित्रपरिवार आणि हितचिंतक मंडळी यांनी आयोजित केला होता.

      या कार्यक्रमात मोहन होडावडेकर, ॲड.सूर्यकांत प्रभूखानोलकर, सतिश डुबळे, ॲड.सुषमा प्रभूखानोलकर, ॲड.शाम गोडकर, प्रा.वसंत पाटोळे, सचिन वालावलकर, संजय पुनाळेकर, सुरेश बोवलेकर यांनी दिलीप गिरप यांची यशस्वी कारकिर्द आणि साकारलेल्या विकासकामांबद्दल अभिनंदन करुन समाधान व्यक्त करताना यापुढेही त्यांनी राजकारणातून निवृत्त न होता सक्रीय रहावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

      सत्कारमूर्ती सुनिल नांदोस्कर म्हणाले की, आपण केलेल्या या अनपेक्षित सत्काराने मी भारावून गेलो आहे. आपले प्रेम असेच कायम रहावे. शहराच्या कलात्मक मांडणी माझे आणि विद्यार्थ्यांचे योगदान देता आले, याचे आपल्याला समाधान आहे. तर प्रशांत आपटे यांनी आमचे टीम लिडर नगराध्यक्ष गिरप यांच्यामुळेच विकास कामे अपेक्षित वेळेत पूर्ण होऊ शकली.

       त्यांच्यामुळेच हा अनपेक्षित सत्कार मला स्विकारता आला. सर्वसामान्य नागरिकाच्या नगरपरिषदेकडून काही अपेक्षा असतात. हातात अधिकार, सत्ता असताना नागरिकांच्या भल्याच्या गोष्टी होत का नाहीत? विकासकामे पूर्ण  होताना नेमक्या काय अडचणी असतात? असे प्रश्‍न नागरिक बोलून दाखवत असतात. नगरसेवक म्हणून कार्यरत असताना नेमक्या प्रशासकीय, राजकीय अडचणी लक्षात आल्या आणि पाच वर्षाच्या काळात नगरसेवक पदाला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले.

      नगराध्यक्ष गिरप यांनी माझ्या मित्रपरिवाराने आयोजित केलेला आजचा हा अनपेक्षित सत्कार समारंभ आहे, तशाचप्रकारे अनपेक्षितरित्या नगराध्यक्ष पदासाठी माझे नाव सुचविले गेले. कुठलाही पूर्वानुभव नसताना जनतेने दाखविलेला विश्वास सार्थ करण्याची संधी मला आणि आमच्या टीमला मिळाली. या पाच वर्षात कुटुंबातील सर्व सदस्य विशेष करुन पत्नी अक्षया यांची पूर्ण साथ मिळाल्यानेच झोकून देऊन काम करता आले. काम करताना जरी अडचणी आल्या तरी शक्यतो कुठेही वाद होणार नाहीत याची दक्षता घेतली. आपल्या हातात पाच वर्षेच आहेत हे लक्षात घेऊन नियोजन केलेले जास्तीत जास्त प्रकल्प पूर्ण होतील याची काळजी घेतली. त्यामुळे या कामांबद्दल नागरिक समाधानी असल्याची पोचपावती मिळते अशा भावना श्री. गिरप यांनी व्यक्त केल्या.

      प्रमुख पाहुणे शेखर सामंत यांनी दिलीप गिरप यांच्या कारकिर्दीत साकारलेली विकासकामे पाहून वेंगुर्लावासीय म्हणून खूप आनंद झाल्याने सांगितले. पाच वर्षाच्या कालावधीत अशाप्रकारची कामे जिल्ह्यातील कोणत्याही नगरपरिषदेत झाली नसल्याचेही सांगितले. माजी नगराध्यक्ष स्व.मोहन खानोलकर यांच्या कारकिर्दीनंतर शहराचा पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी निशाण तलावाची उंची वाढविणे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास जात असल्याने पुढील वीस-पंचवीस वर्षे शहरात पाणी टंचाई भासणार नाही याबाबत समाधान व्यक्त केले.

      मानपत्राचे वाचन सीमा मराठे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार ॲड. शशांक मराठे यांनी केले.

Leave a Reply

Close Menu