संवदेना जपणारा ‘बाबा‘

क्या कमाया पुछे अगर तू नही कमायी धन की पुंजी घर बनाया प्यार से भरा इज्जत यह दौलत हमारी।इतक्या सहजतेने डॉ. अनिल अवचट उर्फ बाबाहे दोहेलिहित असत. हा तर स्वतःवरच लिहिलेला दोहा. बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचा आदर्श समाजात चिरंतर राहिल असे व्यक्तिमत्व २७ जानेवारी २०२२ रोजी काळाच्या पडद्याआड गेले. सिधुदुर्गातील फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या दौ-यात त्यांनी चार तालुके निवडले होते. त्यात कणकवलीमध्ये गोपुरी आश्रमात गांधी समजून घेतानायावर सिधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना गांधी विचाराकडे पाहण्याचा आजच्या जगाचा दृष्टीकोन सांगितला होता. सावंतवाडी येथे अनिल अवचट यांनी स्वतःचे प्रत्यक्ष जीवन आणि आपण लिहिलेली पुस्तके ही मराठी साहित्यातील कपोलकल्पीत वर्णनं नव्हेत तर ती प्रत्यक्ष समाजातील वेगवेगळ्या स्तरावर कष्ट करणा-या श्रमजीवी जनतेच्या सोबत प्रत्यक्ष अनुभवावर आधारीत आणि प्रखर वास्तव सांगणारे कथन होते. तिसरे व्याख्यान वेंगुर्ल्यात समृद्ध सहजीवनयावर बोलताना ऐसी कळवळ्याची जाती लाभाविण करी प्रितीया तुकाराम महाराजांच्या उक्तीनुसार निरपेक्ष भावनेने जगणे हे माणूस असल्याचे लक्षण सांगत आपल्यातील मुल कसे जपावे याची अनेक उदाहरणे त्यांनी दिली होती. मालवणमधील व्याख्यानात ताणतणावया विषयाने त्यांच्या सिधुदुर्ग दौ-याची सांगता झाली होती.

                      डॉ. अनिल अवचट हे साहित्य, कला, सामाजिक कार्ये आदींमध्ये मुक्त संचार करणारे आणि हाडाचे फिल्डवर्क करणारे पत्रकार होते. वंचित, उपेक्षित, अन्यायग्रस्त, व्यसने हे शब्द समाजात वावरताना आपल्या कानावर पडत असतात. पण त्यांच्यापाशी जात त्या व्यक्ती म्हणजे नेमक्या कोण?, त्यांना येणा-या समस्या काय?, त्यांचे दुःख कमी करण्यासाठी आपण काय करु शकतो? असे सर्व समावेशक लिखाण त्यांनी शब्दबद्ध केले होते. त्यांच्या लिखाणाच्या संवेदनशीलतेमुळे अनेकांच्या आयुष्याला आकार मिळाला. जे अनुभवले, ते तसेच्या तसे त्यांच्या लेखणीत उतरले, हे उतरविताना स्वतःच्याही चुकांबद्दल, न्युनगंडाबद्दल, फजितीबद्दलही त्यांनी लिहिले. माणूस म्हटला की, तो चुकणारच. पण त्या चुका सुधारायच्या कशा हे जाणून घ्यायचे असेल तर अनिल अवचट यांनी लेखनातून मागे ठेवलेला त्यांचा ठेवा जाणून घ्यायला हवा हिच खरी त्यांना श्रद्धांजली!

Leave a Reply

Close Menu