पोषण आहार अर्थात मध्यान्ह भोजन

मानवाच्या आवश्‍यक गरजा कोणत्या? असा जर आपण प्रश्‍न विचारला तर अन्न, वस्त्र आणि निवारा असंच उत्तर आपल्याला मिळेल. पण याही पलिकडे जाऊन विचार केला तर आजच्या विज्ञान युगात मला वाटतं की शिक्षण ही सुद्धा मानवाची खरी व आवश्‍यक गरज आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची गोडी लागणं फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक मूल शाळेत आलं पाहिजे आणि ते शाळेत टिकलं पाहिजे. मूल शाळेत टिकण्यासाठी, त्याला शाळेची व शिक्षणाची गोडी लागण्यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनाने शाळा स्तरावर वेगवेगळे उपक्रम राबविलेले आहेत. मुलींना उपस्थिती भत्ता, सावित्रीबाई दत्तक पालक योजना, मोफत पाठ्यपुस्तके, मागासवर्गियांसाठी विशेष प्राविण्य शिष्यवृत्ती योजना, विकलांग मुलांसाठी त्यांच्या गरजेनुसार साहित्य वाटप, गणवेश वाटप, आरोग्य तपासणी, चावडी वाचन अशा विविध उपक्रमांबरोबरच अतिशय महत्त्वाचा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने गरजेचा असा गेल्या काही वर्षात महाराष्ट्र शासन राबवित असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे माध्यान्ह भोजन, यालाच दुसरे नाव आहे पोषण आहार. हा उपक्रम इतर उपक्रमांप्रमाणेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच यशस्वी ठरला.

      पोषण आहार या उपक्रमाबद्दल प्राथमिक स्तरावर सांगायचे झाले तर सर्वच विद्यार्थी, शिक्षक व पालकवर्ग खूपच उत्साही आणि आनंदी दिसून आला. जेव्हा या उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ व माता पालक संघ या सर्व स्तरावरील समित्यांसमोर पोषण आहार हा शासनाचा उपक्रम मांडण्यात आला तेव्हा सर्वांचेच चेहरे आनंदाने खुलून आलेच. शिवाय या उपक्रमाबद्दल कोणाचेही दुमत न होता एकमताने या उपक्रमाचे सर्वांकडून स्वागतच करण्यात आले.

      प्राथमिक शाळेच्या कामकाजाची सकाळी 10.30 ते सायंकाळी 4.45 ही वेळ लक्षात घेता दुपारी 1 ते 2 या वेळेत विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार शालेय विद्यार्थ्यांच्या पटसंख्येप्रमाणे भोजन शिजविण्यासाठी गावातीलच गरजू व उत्सुक महिलेची नेमणूक करण्यात आली. त्यासाठी विद्यार्थ्यांचे जेवण शिजविण्यासाठी व जेवणासाठी लागणारे भांडीयुक्त साहित्यही शासनाकडून पुरविण्यात आले. या सर्व गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाहीतून विद्यार्थ्यांसमोर ज्यावेळी गरमागरम ताजंताजं भोजनाचं ताट वाढण्यात आलं त्यावेळचं दृश्‍य अतिशय आनंदाचं आणि समाधानाचं होतं. खरंच पोषण आहार या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आरोग्याच्या चांगल्या सवयी लागल्या. जेवायच्या वेळेची शिस्तही लागली. जेवणापूर्वी रांगेत उभे राहून हात साबणाने स्वच्छ धुणे, इयत्तांवार बैठका घालणे, वर्गवार बसणे, मांडी घालून बसणे, जेवणापूर्वी प्रत्येक वाराचे महत्त्व लक्षात घेऊन श्‍लोक म्हणणे, जेवताना गडबड न करता शांतपणे जेवणे, आपल्याला गरज असेल एवढेच पदार्थ मागून घेणे, अन्न वाया न घालवणे, ताटाच्या बाहेर अन्न न सांडणे, जेवून झाल्यावर लहान मुलांना गरजेनुसार मदत करणे, सहभोजनाचा आनंद मिळवणे अशा कितीतरी गोष्टी ज्या जीवनामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत, त्या गोष्टी या पोषण आहाराच्या योजनेतून विद्यार्थी शाळेतच शिकला. सध्याच्या धावपळीच्या यंत्रयुगात पालकवर्गही शेती, इतर व्यवसाय, नोकरी, इतर घरकाम यासाठी जास्त वेळ घराच्या बाहेरच असतो. तसेच शासनाच्या कुटुंबनियोजन या मोहिमेनुसार प्रत्येक घरात एक किंवा दोनच मुले असतात. याला विभक्त कुटुंब पद्घती सुद्धा कारणीभूत ठरू शकते. त्यामुळेच मुलांना एकत्रित बसून जेवणाचा योग घरी येतच नव्हता. पण या मध्यान्ह भोजन उपक्रमामुळे शाळेत भावंडांचं, मित्रांचं प्रेम, सहकार्याची भावना, आईच्या ममतेने वाढणारी पोषण आहार शिजवणारी गावातीलच बाई आणि अतिशय ममतेने विचारपूस करून, लक्ष ठेवणारा शिक्षकवर्ग या सर्व गोष्टी ज्या घरात मिळणार नव्हत्या त्या विद्यार्थ्याला शाळेत मिळू लागल्या. त्यामुळे शासनाच्या नियमानुसार दर तीन महिन्यांनी चाचपणी करता विद्यार्थ्यांची उंची व वजन वाढलेले दिसून आले. एकंदरीत या सर्व बाबींचा विचार करता मध्यान्ह भोजन योजना खूपच फायदेशीर ठरली एवढे नक्की.

      मार्च 2020 पासून पोषण आहार म्हणजेच मध्यान्ह भोजन या उपक्रमातून शिक्षक, पालक व विद्यार्थी यांना मिळणाऱ्या आनंदावर मात्र विरजण पडलं. शालेय पोषण आहार शाळेत मिळेनासा झाला. कारणही तसेच होते. कोरोनासारख्या महामारी संकटाने संपूर्ण जगात थैमान घातले. शासनाला शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला. शाळाच जर बंद झाल्या करण्यात आल्या तर विद्यार्थ्यांना शाळेत भोजन कसं काय मिळणार? हा प्रश्‍न महाराष्ट्र शासन, शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्यासमोर आ वासून उभा राहिला. त्यातून शासनाने एक वेगळाच मार्ग काढून निर्णय घेतला तो म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला दरमहा लागणारा पोषण आहार धान्य रुपाने त्या त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलावून त्यांच्या ताब्यात द्यायचे. त्यानुसार शाळेतील शिक्षकांनी व पालकांनी या निर्णयाचा अवलंबही केला. शासनाने घेतलेला धान्य वाटप हा निर्णय नाखुशी दाखविणारा असला तरीसुद्धा हा निर्णय घेण्यामागे शासनाचा नाईलाज होता. कारण पोषण आहारातून विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले सुधारत असले तरी कोरोना सारख्या प्राणघातक संकटाची भिती सर्वांनाच होती. त्यामुळे धान्यवापट या योजनेला सुद्धा सर्व स्तरातून संमत्ती दर्शविण्यात आली. एकंदरीत शाळेत एकत्रित बसून सहभोजनाचा आस्वाद घेण्याच्या आनंदाला विद्यार्थीवर्ग पूर्णपणे मुकला हे मात्र खरे आहे.

      मार्च 2020 पासून सुरू झालेले कोरोनाचे महामारी संकट आजपर्यंत सुरुच असल्याचे आपण सर्वजण पहातच आहोत. त्यामुळे शाळा बंदच या निर्णयावर शासन अजून ठामच आहे. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण अनियमितपणे घरातच सुरू आहे. अनियमितपणे हा शब्द वापरण्याचा उद्देश एढाच की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची आर्थिक व औद्योगिक परिस्थिती लक्षात घेता ऑनलाईन शिक्षणात कितीतरी अडचणी येत असल्याने विद्यार्थी आनंददायी शिक्षणाला पूर्णपणे मुकला आहे. तसेच शिक्षणापासून वंचित राहीला आहे. त्यात भर पडली आहे ती पोषण आहाराच्या नवीन निर्णयाची. शाळेत मिळणारं मध्यान्ह भोजन बंद झाल्यानंतर दरमहा धान्य वाटपाचा निर्णय शासनाने घेतला खरा पण आता तर शासनाने प्रत्येक विद्यार्थ्याचे बँक पासबुक काढून त्यावर दरमहा पोषण आहाराची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो अंमलातही आणला गेला.

      पोषण आहाराच्या बाबतीत त्या त्या परिस्थितीनुसार शासनाने घेतलेले निर्णय कुठेही चुकीचे ठरलेले नाहीत आणि म्हणूनच निर्णयाची अंमलबजावणीही त्वरीत केली गेली याचं कौतुक केलं पाहिजे. तरीसुद्धा विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक वाढीचा विचार करता असं सिद्ध होतं की, विद्यार्थ्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी शाळा हेच एकमेव आदर्श माध्यम आहे. त्यात त्याच्या आरोग्याचा विचार करता मध्यान्ह भोजन हीच योजना सर्वश्रेष्ठ ठरेल. कारण शाळेमध्ये मिळणारा पोषण आहार हा इतर धान्य वाटप योजना, बँक पासबुक जमा रक्कम या योजनांपेक्षा कितीतरी जास्त फायदेशीर आहे. असे वक्तव्य पालक वर्गाकडूनही ऐकायला मिळाले. कारण शाळेतील गरमागरम व ताजे भोजन हे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने व शारीरिक विकासाला पोषक ठरणारे आहे असे मतही पालकवर्गाने मांडले आहे. सर्वानुमते मध्यान्ह भोजन योजना हाच उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पोषक ठरणारा आहे. कोविड निर्र्बंधांमुळे मुलांच्या बँक खात्यावर पैसे जमा करणे हा पर्याय कायमस्वरुपी स्विकारु नये. असे केल्यास मूळ योजनेच्या उद्दीष्टालाच हरताळ फासल्यासारखे होईल. स्थिती पूर्ववत झाल्यावर शाळेत पुन्हा पोषण आहार वाटप सुरु करावे हीच समस्त पालकवर्गाची अपेक्षा आहे.

 – स्वाती वालावलकर,

मुख्याध्यापक,

श्रीदेवी सातेरी हायस्कूल, वेतोरे, 9421260750

Leave a Reply

Close Menu