जागतिकीकरण आणि कोकणातील ग्रामीण स्त्री

निसर्गाने सौंदर्याची मुक्त उधळण करत कोकणच्या भूमीला सुंदरसे रुपडे बहाल केले आहे. पण निसर्गसौंदर्याची श्रीमंती लाभलेल्या या भूमीतील समाजाला मात्र दारिद्य्र, अज्ञान, अंधश्रद्धा अशा अनेक प्रश्‍नाना अजूनही तोंड  द्यावे लागत आहे. वंचित आणि सबल वर्गातील दरी अजून मिटलेली नाही. जागतिकीकरणामुळे स्त्री-पुरुष समानता, धर्मनिरपेक्षता, महिलांचे हक्क याबाबत सतर्कता आली आहे. पण अजून हे विचार या भूमीतील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले आहेत का? याचा विचार करण्याची गरज आहे. साधारण 1991 नंतर जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले. शासन नियंत्रित अर्थव्यवस्थेकडून खुल्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल चालू झाली. साहजिकच त्याचा परिणाम म्हणून कोकणातील विशेषतः ग्रामीण भागातील महिलांच्या आयुष्यात प्रचंड वेगाने परिवर्तन घडू लागले. त्याचे काही सकारात्मक तर काही नकारात्मक परिणाम दिसू लागले. म्हणूनच त्यांचा मागोवा घेताना वेगवेगळ्या आयामातून विचार करावा लागेल.

      ग्रामीण जीवनाचा कणा म्हणजे ‘शेती! वास्तविक करियर वैगेरे कोणतेच अवडंबर न माजवता खेड्यातील स्त्री घर, संसार आणि शेती तितक्याच सक्षमपणे फार पूर्वीपासून सांभाळत होती. पुरुषांच्या बरोबरीने ती शेतात राबत होतीच. पण जागतिकीकरणाचा परिणाम म्हणून इथल्या तरुणांना शहरामध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आणि पुरुषवर्ग शहराकडे वळला. साहजिकच शेतीचा बराचसा भार घरातील महिला आणि प्रौढ व्यक्तींवर पडलेला दिसतो. पण तरीही या महिलांनी हे शिवधनुष्य सक्षमपणे पेलले आहे. यातही नंतरच्या काळात त्यांना शिक्षणाची जोड मिळाल्यामुळे काही महिलांनी करियर म्हणून शेतीकडे पाहायला सुरुवात केली. शेतीबरोबरच शेतीपूरक धंद्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. बचतगटांचे सक्षमीकरण, कुशल रोजगारासाठी प्रशिक्षण आणि कायद्याचे योग्य मार्गदर्शन, काही NGO याच्या मदतीने येथील काही महिलांनी स्वतंत्र व्यवसाय उभे केले. विशेष उल्लेखनीय म्हणजे सध्याच्या लॉकडाउनच्या काळातही अशा काही महिला आत्मनिर्भर झाल्या आहेत. ही जशी सकारात्मक बाजू झाली तशी याची नकारात्मक बाजू अशी म्हणता येईल की शिक्षण मिळाल्याने मुलींना शहरात रोजगार उपलब्ध झाले. त्यामुळे बऱ्याच तरुण मुलींचा शहराकडे ओढा वाढला. कमी कष्टात अधिक पैसा हातात खेळू लागला आणि शेतीला दुय्यम स्थान मिळू लागले. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. चंगळवादी वृत्ती वाढली.  आचार-विचार यामध्ये अंधानुकरण सुरू झाले.

      शैक्षणिक क्षेत्राचा विचार करता बारावीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण मिळू लागले.   दहावी किंवा बारावी झालेल्या मुलींना नोकरीच्या संधी उपलब्ध होत असल्यामुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते हे पालकांच्या लक्षात आले. शिवाय दहावी किंवा बारावी झालेल्या मुलींनी एखादा शिवणकाम – कॉम्प्युटर कोर्स केला तर लग्नाच्या बाजारात तिचा भाव वधारू लागला. त्यामुळे शिक्षणाकडे बघण्याचा पालकांचा दृष्टिकोन बदलला. काही वेळा या मुली स्वतः नोकरी करुन कुटुंबाला  हातभार लावतातच; पण आपले शिक्षण झाले नाही तरी लहान भावंडाना शिक्षण पूर्ण करण्यास मदत करताना दिसतात. मात्र काही वेळा फार लहान वयात सहज पैसा मिळू लागल्यामुळे असे हे अर्धवट शिक्षण ही आवड न राहता लवकर  पैसा मिळवण्याचे साधन बनले. अशिक्षित किंवा अर्धशिक्षित समाजात हे चित्र दिसत असताना सुशिक्षित समाज मात्र डोळसपणे आपल्या मुलींचे भवितव्य घडवताना दिसत आहे. सर्व शैक्षणिक सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात म्हणून मुलींना अगदी दहावीनंतरही शहरात ठेवण्याची त्यांची मानसिकता दिसून येते. त्याचा परिणाम म्हणून आज कोकणातील अनेक तरुणी वेगवेगळ्या क्षेत्रात चमकताना दिसून येतात.

      याचा पुढचा महत्त्वाचा आयाम म्हणजे आरोग्य! अंधश्रद्धा, दारिद्रय आणि गैरसमजुती याचा प्रचंड पगडा येथील स्त्रीजीवनावर दिसून येतो. विशेषतः गर्भवती महिलांचे प्रश्‍न, मासिक पाळीसंबधी आजार आणि स्त्रियांचे आजार याविषयी पूर्वी उघडपणे बोलले जात नसे. बऱ्याचदा स्त्रीरुग्ण आपले स्त्रीरोगविषयक आजार पुरुष डॉक्टरांकडे सांगण्यास संकोच करत  असत. त्यामुळे ते दुखणे अंगावरच काढले जाई आणि मग काहीवेळा त्याच्या गंभीर परिणामांना त्यांना तोंड द्यावे लागत असे. कधीतरी स्थानिक नर्सच्या सल्ल्याने त्यावर जुजबी उपचार केले जात असत. मात्र या काही वर्षांत महिला डॉक्टरही येथे वैद्यकीय सेवा करु लागल्या आहेत. शिवाय दळण-वळणाच्या सुविधा, सोशल मीडियाचा प्रभाव आणि शिक्षण यामुळे महिलांचा बाह्य जगाशी संपर्क वाढला. परिणामी आत्मविश्‍वास वाढला आणि आता त्या डोळसपणे आपल्या आरोग्याची खबरदारी घेऊ लागल्या आहेत. शरीरसौंदर्य, स्वच्छता, नीटनेटकेपणा याबाबत त्या जागरूक झालेल्या दिसतात. कुटुंबाचा आकार लहान झाल्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला वाव मिळू लागला आहे. तरीही काही मूलभूत प्रश्‍न अजूनही कायम आहेत. लैगिंक अत्याचार, कुमारीमाता, स्त्रीभ्रूणहत्या यासारखे प्रश्‍न अजूनही येथील समाजाला भेडसावत आहेत. पाळीसंबधी असणाऱ्या अंधश्रद्धेमुळे अकारण घेतल्या जाणाऱ्या गोळ्या स्त्रियांच्या आरोग्यावर दुष्परिणाम करत आहेत. याला केवळ अशिक्षित महिलाच नाही तर सुशिक्षित महिलासुद्धा अपवाद नाहीत.

      या काही वर्षात सोशल मीडियाने तर महिलांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवले आहेत. अगदी दुर्गम खेड्यात राहणारी म्हातारी आईसुद्धा सहज मोबाईल हाताळू लागली आहे. शहरात राहणाऱ्या आपल्या मुलांशी ती क्षणार्धात संपर्क साधू शकते. शिवाय दूरदर्शनसारख्या प्रभावी दृक्श्राव्य माध्यमाने तिचे आयुष्यच पूर्ण बदलून टाकले आहे. घरबसल्या अनेक गोष्टी तिला सहज अवगत होत आहेत. पण शहरी जीवनशैलीच्या प्रभावाने तिचा जगण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. मात्र स्मार्ट फोन, इंटरनेट यांचा वापर करणाऱ्या आजच्या पिढीतल्या तरुणी काही वेळा अपप्रवृत्तीच्या शिकार बनत आहेत. व्यक्तिवाद, उपभोक्तावाद आणि चंगळवादी वृत्ती फोफावत चालली आहे. सामाजिक बांधिलकी, स्वसंस्कृती, राष्ट्रहित यासारख्या मूल्यांची घसरण होत चालली आहे.

       काही वर्षांपूर्वी महिलांसाठी वर्ज्य असणाऱ्या ‘राजकारण’ या क्षेत्रातही महिलांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आणि या क्षेत्रात त्यांचा सहभाग वाढला. पूर्वी केवळ नामधारी आणि नाईलाजाने यात सहभागी असणाऱ्या महिला आता डोळसपणे या क्षेत्रात वावरताना दिसत आहेत. केवळ राजकारणच नव्हे तर कंडक्टर, ग्रामसेवक, पोलिस, वनअधिकारी यासारख्या पदांवर केवळ पुरुषांची मक्तेदारी असे. तिथे याच महिला तितक्याच समर्थपणे ही जबाबदारी सांभाळताना दिसत आहेत. पूर्वी नगण्य असणारी ती आता कुटुंबातील एक जबाबदार सदस्य बनू लागली आहे. जागतिकीकरणाचा जसा तिच्यावर प्रभाव पडला तसा येथील पुरुषांवरही पडला. त्याचा परिणाम म्हणून समाजात स्त्रियांना बऱ्याच अंशी समान दर्जा मिळू लागला आहे. तरीही काही श्रद्धा-अंधश्रद्धांचा पगडा अजूनही इथल्या समाजावर पर्यायाने स्त्रीजीवनावर आहे. मासिक पाळीच्या दिवसात पाळावे लागणारे जाचक नियम अजूनही तितक्याच श्रद्धेने पाळले जातात. पिढ्यान्‌ पिढ्या मनावर झालेल्या या संस्कारातून ही स्त्री अजून बाहेर पडू शकली नाहीये. विधवा स्त्रिया – त्यांचे पुनर्विवाह, अपत्यहीन स्त्रिया – त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला असला तरी अजूनही पूर्ण स्वीकारला गेलेला नाही. मुख्य म्हणजे स्वतः ती स्त्रीसुद्धा या विचारांच्या पगड्यातून स्वतःला सोडवून घेऊ शकत नाही. जातीव्यवस्था,  अस्पृश्‍यता याच्या विळख्यातून अजून ती पूर्णपणे बाहेर पडलेली नाही. म्हणूनच नव्या-जुन्याच्या सीमारेषेवर उभी राहिलेली अशी ही आजची कोकणातील ग्रामीण स्त्री आहे असे मला वाटते.

– डॉ. मेधा फणसळकर,

मो. 9423019961

Leave a Reply

Close Menu