निसर्ग संवर्धन आणि व्यावसायिक दृष्टीचा संगम

मनोहर उर्फ रोहित रघुवीर आजगावकर (मो. 7588902953) यांचे काळसे-धामापूर येथील आजगावकर आजी किचन अँड इको स्टोअर हे दुकान सोशल मिडियावर चर्चेत आलं आहे. शिवाजी विद्यामंदिर काळसे येथे शालेय शिक्षण घेऊन भारतीय विद्यापीठ, मुळशी येथून मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेल्या रोहितला कोरोना लॉकडाऊनमुळे नोकरी गमवावी लागली. नोकरीची संधी असतानाही गावात असताना शहराची ओढ असलेल्या या मुलाला शहरात जाऊन शिकून वास्तव अनुभवल्यावर समृद्ध अशा गावातच खूप काही करण्यासारखे आहे, फक्त आपली इच्छाशक्ती कमी पडते आहे याची जाणीव झाली. यातूनच रोहितने सरळ आपले निसर्गसंपन्न गाव गाठले. आपल्या वडिलांप्रमाणे सुरुवातीची काही वर्ष एल.आय.सी.चा व्यवसायही केला. पण या व्यतिरिक्तही आपण काय करु शकतो या शोधात असताना त्याची अवस्था काखेत कळसा आणि गावाला वळसा अशी झाली असे तो सांगतो. कारण आई रुपाली आणि आजी पुष्पलता या दोघीही गेली 20-25 वर्ष कुळीथ पीठ, पारंपरिक मालवणी मसाले यांचे उत्पादन घरगुती स्वरुपात घेत होत्याच. या मालवणी उत्पादनाला आधुनिक दृष्टी दिली. लोकांपर्यंत उत्तम दर्जेदार चव पोचविण्याचे काम रहात्या घरी केलेल्या आजगावकर आजी किचन अँड इको स्टोअर निर्मितीतून केले. या उत्पादनाचे आजीलाच ब्रॅँड ॲँबेसिडर बनविले.

      अनुभ्ावी हातांच्या साथीने उचललेले हे पाउल नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे. उच्च डिग्री घेऊन महिन्याला ठराविक पगार घेणं सहज शक्य असताना कष्टातून कुटूंबासोबत रहात कुटुंबाला हातभार लावण्याचा वेगळा दृष्टीकोन रोहितने आत्मसात केला आहे. स्वयंपाकघरावर स्त्रियांचे अधिराज्य असले तरीही आजकालच्या मुलांकडूनही स्त्री-पुरुष असा भेदभाव न करता सर्व घरातील कामे समान तत्वाने होताना दिसतात. तरीही काही ठिकाणी विशेषतः गावाकडे स्त्रियांची कामे पुरुष करु लागले तर त्याची चेष्टा होईल या भितीने कामाला सुरुवातच केली जात नाही. पण या सर्व भितीवर मात करीत कुटुंबाने दिलेल्या विश्‍वासाला सार्थ ठरवत जिल्ह्यातील संपन्न असणाऱ्या खाद्य संस्कृतीची ओळख रोहितच्या या इको स्टोअरमधून होत आहे. निसर्ग संवर्धन आणि व्यावसायिक दृष्टीचा संगम साधत रोहितने जणू आत्मनिर्भर सिंधुदुर्गचा नारा दिला आहे.

      कोकणातील कुळीथ, तांदूळ,  कोकम, आंबा, फणस, काजू, जांभूळ, करवंद तसेच अन्य अद्वितीय स्थानिक अन्नस्त्रोतांपासून घरगुती असे पारंपारिक आणि नाविन्यपूर्ण अन्नपदार्थ या इकोस्टोअरमध्ये उपलब्ध आहेत. याशिवाय सिंधुदुर्गमधील गृहउद्योगातील दर्जेदार अन्नपदार्थांसोबत कलाकुसरीच्या वस्तू, हस्तशिल्पे अशा गोष्टीही त्यांनी विक्रीसाठी ठेवल्या आहेत. आपले स्थानिक संसाधने वापरून केलेल्या पारंपारिक आणि नाविन्यपूर्ण गोष्टी इथे खरेदी करता येतील असा हा स्टोअर. इथे आपल्याला कुळीथ लाडू, कुळीथ पिठ, घरगुती मालवणी मसाले, हळद आणि फणसाचे लोणचे, नैसर्गिक हळद पावडर, बेलफळ आणि जास्वंद  सिरप, कशाय, कोकम बटर, काजू-कोकम बटर, आंबापोळी, फणसपोळी असे पारंपारिक आणि नाविन्यपूर्ण खाद्यपदार्थ तसेच नारळाच्या करवंटीपासून बनवलेले चहा कप, मोबाईल स्टँड, सायकल शिल्प, देशी गायीचे शुद्ध  गोमूत्र, गोवऱ्या, धूपकांडी अशा इतर गोष्टी खरेदी करता येतील.

       खोटे दिखावे, प्रतिष्ठा, तथाकथित विकासाच्या नादात आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर आपला परिसर सजगपणे अभ्यासण्याची गरज निर्माण झाली आहे. रोहितच्या या स्टोअरमुळे नवतरुणांना एक वेगळा मार्ग मिळाला आहे. आणि अर्थात आपल्याला सुखी समाधानी आयुष्य जगायचं असेल आणि तेच पुढील पिढीला हस्तांतरित करायचं असेल तर शाश्‍वत जीवनशैली आणि व्यवसायांना पर्याय नाही.

Leave a Reply

Close Menu