महाराष्ट्राची शोकांतिका

अलिकडच्या राजकीय आरोप-प्रत्यारोपाने महाराष्ट्रामधील राजकारण गढूळ झाले आहे. सत्ताधारी कोण आणि विरोधी पक्ष कोण यात फरक जाणवत नाही, अशी अवस्था झाली आहे. एकमेकांवर हजार लाखांचा आरोप आता चिल्लर बाबझाली आहे. पाचशे हजार कोटींचा घोटाळाकरण्यात आल्याचे आरोप रोज झाडले जात आहेत. पत्रकारांना गोळा करूनआणि तथाकथित ब्रेकिग न्यूज देणा-या चॅनलच्या दांडक्यांसमोर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. आरोप खरेच असतील तर असंख्य तपास यंत्रणा आहेत. त्यांच्याकडे जाऊन रितसर गुन्हे दाखल करावेत. तपास यंत्रणा तपास करण्यास उत्सुक नसेल किंवा टाळाटाळ करीत असेल तर; न्यायालयाचा पर्याय उपलब्ध आहे. संजय राऊत, नारायण राणे, नाना पटोले, किरीटसोमय्या, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील अशी अनेक नावे सांगता येतील.

           दररोज आरोप-प्रत्यारोप चालू आहेत. विधिमंडळाच्या पटलावरदेखील अशी आरडा ओरडीचीच भाषा असते. ही महाराष्ट्राची परंपरा आहे का?- आजतर १०५ सदस्यांचा भरभक्कम विरोधी पक्ष विधानसभेत आहे. यशवंतराव चव्हाण यांचे राजकारण चालू होते तेव्हा सर्वांत मोठा विरोधी-पक्ष शेतकरी कामगार पक्ष होता आणि जास्तीत जास्त वीस-बावीस सदस्य होते; पण एकापेक्षा एक अभ्यासू होते.सरकारला सळो की पळो करून सोडत होते. गणपतराव देशमुख, केशवराव धोंडगे, कृष्णराव धुळप, दि.बा.पाटील, त्र्यं.सी.कारखानीस, प्रा.एन.डी.पाटील, केशवराव पवार अशी अनेक नावे घेता येतील. समृद्ध लोकप्रतिनिधींची परंपरा असलेला महाराष्ट्र आज कोठे आणून ठेवला आहे ? याचा विचार करणे गरजेचे आहे.

            औद्योगिकरण, शहरीकरणाची गती पकडलेली राज्य, कापूस, सोयाबीन, आंबा, संत्री, केळी, ऊस, भात, ज्वारी आदींच्या उत्पादनावर आघाडीवर असलेले राज्य म्हणून नावलौकिक होता. शिवाय तुलनेने उत्तम प्रशासन असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकिक होता. अनेक सामाजिक सुधारणांचा आग्रह धरणारे राज्य म्हणून ओळख होती.

     आज अनेक प्रकल्प किंवा विकास कामांमध्ये टक्केवारी ठरविणारे असंख्य लोकप्रतिनिधीउदंड झाले आहेत.- पैशाच्या जोरावर निवडणुका लढविणारी घराणी तयार झाली. शैक्षणिक संस्था आणि सहकारातील नेते पुढे आले.

          ‘एक पोलीस आयुक्तमहाराष्ट्रात येतो आणि गृहमंत्र्यांवर शंभर कोटींचा आरोप करतो. यात नेत्यांची ‘‘बेअब्रू‘‘ आहेच; मात्र हा महाराष्ट्राचा किती मोठा अपमान आहे !! ‘‘असे नेते‘‘ आणि ‘‘बेबंद अधिकारी‘‘ उघडपणे ही भूमिका घेत असतील तर? त्याच अधिका-यांच्या हजारो कोटींच्या संपत्तीची वर्णने माध्यमांमध्ये आली आहेत, येत आहेत.- वाझेसारख्या एक दबंग ‘‘साध्या पोलीस निरीक्षकाचा‘‘ किती दबदबा? हे सर्व राजधानीत जाणा-या लोकप्रतिनिधींना दिसत नसेल? महाराष्ट्राच्या गृहसचिव, पोलीस महासंचालक, मुख्य सचिव यांना दिसत नसावे यावर विश्वास बसत नाही. एकही प्रामाणिक आणि तडफदार आमदार विधिमंडळात नसावा की, जो याचे वाभाडे काढेल.

       चंद्रकांतदादा म्हणतात, ‘केंद्राने मजुरांना गावी पाठविण्यासाठी रेल्वेगाड्या पाठविल्या म्हणून काय झाले ? त्या रिकाम्या परत पाठवायच्या.या नेत्यांना राजकारणाने इतके ग्रस्त केले आहे की, त्यात त्यांचे हृदय संवेदनाही, जाणिवाही हरविल्या असाव्यात का? म्हणून यशवंतराव चव्हाण या ‘‘सत्ताधारी‘‘ आणि ‘‘त्यावेळच्या विरोधी नेत्यांची‘‘ आठवण आज होते आहे. संजय राऊत आणि किरीटसोमय्या यांनी आरोपांची राळ उडवून दिली आहे.

    भाजपने पाच वर्षे मुख्यमंत्रिपदासह सत्तेवर राहण्याची चव काय चाखली, त्यांना आयुष्यातील अनेक वर्षे विरोधी पक्षात होतो, याचा विसर पडला आहे. १०५ आमदार असणा-या विरोधी पक्षाने लोकांच्या प्रश्नांवार रान उठविले पाहिजे. पण जनतेच्या प्रश्नांवर ते निवडूनच येत नाहीत. जनताही आपल्या प्रश्नांना भिडणा-याला निवडून देत नाही. भगवा, हिरवा, निळ्या रंगाचा आवाज काढणा-याला मते दिली जातात. सोबत खाणे-पिणे आहे. पैसे वाटणे झाले. जातीपातीचे राजकारण धर्माचे ‘‘शुद्धिकरण‘‘ थोडेच करायचे असते! त्याचे ‘‘स्तोम‘‘ माजवायचे असते.

     निवडणुकीतील हिंसाचार संपला. गैरप्रकार संपला. बोगस मतदान संपले; पण धर्म-जात यांचा प्रभाव आणि पैशाचा वापर संपविण्याचे आव्हान कोणी पेलायचे? यामुळेच बॅ.नाथ पै, केशवराव धोंडगे, गणपतराव देशमुख, प्रा.एन.डी.पाटील अशी मंडळी आता इतिहासाच्या पानावरच राहणार का? असा प्रश्न पडतो आहे.

     अलिकडच्या राजकीय आरोप-प्रत्यारोपाने राजकारण गढूळ झाले आहे. सत्ताधारी कोण आणि विरोधी पक्ष कोण यात फरक जाणवत नाही, अशी अवस्था झाली आहे. वाढलेली महागाई, लॉककडाऊनमुळे गेलेल्या नोक-या, कुटुंबाने गमावलेली आपली माणसे या सर्वांतून मार्ग काढून सामान्य मतदार माणूस जगण्याचा प्रयत्न करू पाहतोय. पण त्याला पाठबळ देण्याचं सोडून सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे काही बोलभांड नेते एकमेकांवर आरोप करून तात्कालिक राळ उठवण्यात मग्न आहेत ही महाराष्ट्राची शोकांतिका म्हणावी लागेल.

 

Leave a Reply

Close Menu